विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !

By सचिन जवळकोटे | Updated: November 2, 2025 10:14 IST2025-11-02T10:12:40+5:302025-11-02T10:14:37+5:30

मृत्यूनंतरही तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात सत्ताधारी मश्गुल

Special Article oon satara phaltan female doctor death case after death political Story | विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !

विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !

सचिन जवळकोटे, कार्यकारी संपादक, काेल्हापूर

फलटणमधील महिला डाॅक्टरच्या ‘डेथ स्टाेरी’चा दुसरा पार्ट आता जोरात रंगतोय. तिने आत्महत्या नेमकी कशासाठी केली, याचा शोध घेण्यात पोलिस यंत्रणेला अद्याप यश न मिळालेले; मात्र तत्पूर्वीच सत्ताधारी अन् विरोधकांना जणू आपणच ‘तपास अधिकारी’ असल्याचा साक्षात्कार झालेला. तिने गळफास घेतलेल्या दोराचा तुकडा एका माजी खासदारापर्यंत पोहोचविण्यासाठी विरोधक इरेला पेटलेले... मृत्यूनंतरही तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात सत्ताधारी मश्गुल बनलेले. ती मेल्याचं बहुधा कुणालाच दु:ख नसावं, कारण राजकारण भलतंच फोफावलेलं...

एक फौजदार. दुसरा इंजिनीअर. दोघेजण ‘सुसाइड नोट’मध्ये सापडलेले. बदने-बनकर थेट ‘आत’. बनकरच्या मोबाईल-लॅपटाॅपमधून बरीच गुपितं बाहेर येण्याची शक्यता. बदने मात्र कायदा कोळून पिलेला आरोपी. कैक वर्षे अंगावर ‘खाकी’ असल्यानं ‘पोलिसांच्या वाटा पोलिसालाच ठाऊक’ झालेल्या. मात्र, अजूनही तो ‘मला अडकवलंय’ याच भाषेत बोलतोय. तिच्या हातावरची अक्षरं तिची नसल्याची पुस्ती वकिलांनीही जोडलीय. तिच्या घरच्यांपासून विरोधी नेत्यांपर्यंत साऱ्यांनीच यावर शंका व्यक्त केलेली. त्यामुळे ही ‘नोट’ खोटी असेल तर लिहिली कुणी, असा नवा गूढ प्रश्न उभा ठाकलेला.

तिनं आत्महत्या केली बहुधा दुपारच्या सुमारास. हाॅटेलच्या वेटरला कळलं सायंकाळच्या सुमारास. त्यानंतर तिच्या नातेवाइकांची वाट पाहत पोलिस खाते पोस्टमार्टेमसाठी रात्री उशिरापर्यंत ताटकळत होते. डेडबाॅडी त्यांच्याच ताब्यात. तरीही याच कालावधीत हातावरच्या अक्षरांचा फोटो पद्धतशीरपणे बाहेर आला. गुन्हा नोंद हाेण्यापूर्वीच प्रचंड व्हायरल झाला.

तिला टॉर्चर करू पाहणाऱ्या राजकीय नेत्याचा शोध घेण्याची जबाबदारी विरोधकांनीच उचललेली. सुषमा अंधारे अन् महेबूब शेखसह अनेक नेत्यांनी जुन्या भानगडींचा पर्दाफाश करण्याचा सपाटा लावलाय. सुरुवातीला ‘मला या विषयावर बोलायचंच नाही,’ असं ठणकावून सांगणाऱ्या माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना अखेर तोंड उघडावंच लागलं. भांडाफोडची सुरुवात झाली फिट-अनफिटसाठी महिला डाॅक्टरला फोनवरून बोलण्याच्या घटनेनं. आता त्यांच्या साखर कारखान्यातील कथित वेठबिगारी, गुलामगिरी अन् गुंडगिरीची चर्चा उघडपणे सुरू झाली. 

या साऱ्या राजकीय नाट्यात कोण कुणाला कव्हर करतंय, हेच समजायला मार्ग नाही. ‘तिचे पूर्वीपासूनच संबंध होते,’ असं तपासी अधिकाऱ्याच्या थाटात रूपाली चाकणकरांनी परस्पर जाहीर केलं. त्या फलटणमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून आल्या होत्या की सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या? मात्र, त्यांनी अन् त्यांच्या सरकारमधील नेत्यांनी रणजितसिंहांना क्लिन चीट दिली. विरोधकांनीही ‘हे हस्ताक्षर खोटं’ असं सांगून दोन्ही आरोपींना जणू ताकदच दिली, कारण हाच पाॅईंट पकडून आरोपींच्या वकिलांनी कोर्टात न्यायालयीन काेठडी मागितली हाेती. 

महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचे चार कंगोरे...

तळहातावरील सुसाइड नोटनुसार फाैजदार बदने अन् घरमालकाचा मुलगा बनकर यांच्याकडून सखोल माहिती घेण्यासाठी ‘खाकी’ यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेली.
ऊसतोड कामगार आरोपी फिटनेस सर्टिफिकेटसाठी तिच्यावर मानसिक दबाव टाकणाऱ्या राजकीय नेत्याच्या चाैकशीची गरज बनलेली.
कथित खासदाराची मर्जी राखण्यासाठी तिला टाॅर्चर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा मुखवटा टराटरा फाडण्याची वेळ आलेली.
तिच्या वागणुकीवर थेट चाैकशी समिती नेमून तिचीच बदली करू पाहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची किळसवाणी मानसिकता जगासमोर आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला. 

हुकूमशाहीची लक्तरं थोडीच टांगली जाणार...

फलटणची गल्ली अखेर दिल्लीपर्यंत गाजू लागल्यानंतर ‘एसआयटी’ चाैकशीची घोषणा झाली. नव्या तपासात कदाचित खरे दोषी निष्पन्न होतीलही; परंतु वर्षानुवर्षे चालत आलेल्या ‘पाॅलिटिकल क्राइम’ची फाइल थोडीच तयार होणार? दोन्हीकडच्या नेत्यांच्या ‘हुकूमशाही राजवटीची लक्तरं’ कायद्याच्या वेशीवर थोडीच टांगली जाणार?

जाता-जाता...

राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात या नाजूक प्रकरणाचा तपास अत्यंत शांतपणे करण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अन् सरकारी डॉक्टर अधिकाऱ्यांवर येऊन ठेपलीय.
एक छोटी चूकही त्यांच्या हेतूवर ठपका ठेवणारी बनू शकते. तिच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये पोलिसांच्या अंदाजानुसार तिचा मृत्यू कदाचित रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी झाल्याचा उल्लेख आला. 
यावर तिच्या नातेवाइकांनी संशय घेतला असता, संबंधितांनी सारवासारव केली, चुकून ‘एएम’ ऐवजी ‘पीएम’ शब्द पडला. बदलून घेतो, असं सांगितलं. बघा.. जिथं ‘पीएम’चा अख्खा रिपोर्टच बदलला जात असल्याची तक्रार होते, तिथं घड्याळाचा ‘पीएम’ शब्द बदलणं म्हणजे किस झाड की पत्ती.

Web Title : फलटण महिला डॉक्टर मृत्यु: मृत्यु के बाद राजनीतिक कहानी!

Web Summary : फलटण डॉक्टर की आत्महत्या से राजनीतिक उथल-पुथल। पार्टियों के बीच आरोप-प्रत्यारोप के कारण जाँच में देरी। संदिग्ध सुसाइड नोट से रहस्य गहराया। राजनीतिक खेल त्रासदी पर हावी।

Web Title : Falttan Female Doctor Death: Political Story After Death Unfolds

Web Summary : Falttan doctor's suicide sparks political turmoil. Investigation lags as accusations fly between parties. Suspicious suicide note adds mystery. Political gamesmanship overshadows the tragedy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.