विशेष लेख: लावणी, भांगडा, पॉप, रॉक... सगळ्यांना आता निवडणुकीचे तिकीट देऊन टाका !!
By अतुल कुलकर्णी | Updated: November 2, 2025 09:55 IST2025-11-02T09:53:33+5:302025-11-02T09:55:22+5:30
किती दिवस शेतकऱ्यांचे दुःख, शेतकऱ्यांची आर्थिक मदत, ओला दुष्काळ... हेच मुद्दे बोलत राहायचे? त्यापलीकडेही अनेक विषय आहेत.

विशेष लेख: लावणी, भांगडा, पॉप, रॉक... सगळ्यांना आता निवडणुकीचे तिकीट देऊन टाका !!
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
श्री. सुनील तटकरे, अजित दादा
नमस्कार,
नागपुरात आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या गणेशपेठ कार्यालयात दिवाळी स्नेहमीलन उत्साहात पार पडले. लावणी कलावंत शिल्पा शाहीर यांनी लावणी सादर केली. त्यावरून सगळ्यांनी आपल्या पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. तुम्ही लगेच तीव्र नाराजी व्यक्त करत, खुलासा मागणारे पत्र नागपूर कार्यालयाला पाठवले. इतके मनाला लावून घ्यायची गरज नव्हती. काळ बदलला, तसे आपणही बदलायला हवे. किती दिवस शेतकऱ्यांचे दुःख, शेतकऱ्यांची आर्थिक मदत, ओला दुष्काळ... हेच मुद्दे बोलत राहायचे? त्यापलीकडेही अनेक विषय आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांच्या निवडणुका आहेत. तेव्हा तुम्ही फार टेन्शन घेऊ नका.
उलट यानिमित्ताने एक गोष्ट लक्षात आली. लोकांमध्ये मिसळणारे, कायम चर्चा होतील अशा रील बनवणारे कार्यकर्ते आपल्याला निवडणुकीसाठी हवे आहेत. कलावंत शिल्पा शाहीर यांनी उत्तम लावणी सादर केली म्हणून त्यांनाही उमेदवारी देऊन टाका. कलेची पारख आपण नाही करायची तर कोणी करायची? शरद पवार यांचा आणि कलावंत, साहित्यिकांचा संबंध सर्वश्रुत आहे. पण त्यांची ऊठबस लता मंगेशकर, आशा भोसले, ग. दि. माडगूळकर, मंगेश पाडगावकर, रामदास फुटाणे, जब्बार पटेल अशा लोकांमध्ये होती. आता काळ बदलला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जाताना आपल्यात काही मूलभूत बदल करणे गरजेचे आहे. आता आपण लावणी फेम गौतमी पाटील, ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे, अभिजित बिचुकले, ‘हास्य जत्रा’मधील मोना डार्लिंग असे चेहरे शोधले पाहिजेत. हे चेहरे महाराष्ट्रातील मतदारांवर प्रभाव टाकतील. रामदास फुटाणे, भालचंद्र नेमाडे, सदानंद मोरे हे सगळे साने गुरुजींच्या जमान्यातील लोक. आता ‘नाणे’ गुरुजींचा जमाना आहे. तेव्हा लोकही याच ‘नाणे’ गुरुजींच्या जमान्यातले लागतील.
ज्यांना उमेदवारी द्यायची आहे अशांनी वॉर्डात किंवा मतदारसंघात किती विकासकामे केली, याला काहीही अर्थ नाही. उमेदवार त्यांच्या मतदारसंघात पॉप्युलर असावा... त्याला कुठला ना कुठला डान्स करता आला पाहिजे... उमेदवार सोन्यासारखा नसला तरी त्याच्या हातात, गळ्यात दोन पाच सोन्याच्या साखळ्या असाव्यात... फिरायला मर्सिडिज नसली, तरी गेलाबाजार फॉर्च्युनर तरी असावी... त्याला शासकीय योजना किंवा मतदारसंघाची फार माहिती नसली तरी चालेल. किंबहुना त्याची गरजही पडणार नाही. मात्र त्याला ‘भ’ची बाराखडी व्यवस्थित आली पाहिजे..! वेळप्रसंगी तीच बाराखडी कामाला येते. मराठी भाषा समृद्ध करणारी मुक्ताफळे त्याला उधळता आली पाहिजेत. कोणत्या कार्यकर्त्यांना कोणते ‘रंगीत पाणी’ आवडते यावर त्याचा अभ्यास असावा. त्याचे बोलणे एकदम सावजी रस्सा प्यायल्यासारखे असावे.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिलाच. भाजपकडे कोणीही तिकीट मागायला गेले की ते सांगतात, आधी तुमचे नाव सर्व्हेमध्ये येऊ द्या... मग तुमचे तिकीट पक्के... भाजपमध्ये असा सर्व्हे नेमकं कोण करतं, हे नेमके शोधून काढणार त्यालाच आपण तिकीट दिले पाहिजे. भाजपच्या बड्या-बड्या नेत्यांनाही हा सर्व्हे कोण करतो हे माहीत नाही. त्यामुळे अशी माहिती काढून आणणारा आपल्यासाठी किती कामाचा ठरेल हे लक्षात घ्या. राहिला प्रश्न पक्ष कार्यालयात झालेल्या लावणीचा. ज्यांना चांगली लावणी करता येते, ज्यांना कव्वाली म्हणता येते किंवा ज्यांना पॉप, रॉक अशी गाणी गाता येतात, अशांना प्राधान्याने तिकिटे द्या. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी याच गोष्टींची गरज असते. फिन्स्टावर टाकण्यासाठी गावागावात उत्तम रीळ तयार करणाऱ्यांना प्राधान्याने काही जागा ठेवा. त्याची फार गरज आहे. विधानसभा निवडणुकीत ‘गुलाबी साडी आणि ओठ लाल लाल’ या गाण्याची रील बनवून आपल्याला त्रास देणाऱ्यांना योग्य उत्तर देता येईल. उगाच टेन्शन घेऊ नका म्हणून हे पत्र. बाकी सर्व कुशल मंगल.
- तुमचाच, बाबूराव.