लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!

By विजय दर्डा | Updated: August 18, 2025 06:37 IST2025-08-18T06:36:26+5:302025-08-18T06:37:25+5:30

तुमच्या देशाच्या अर्थसंकल्पाच्या दुप्पट आहे मुकेश अंबानींची संपत्ती! अमेरिकेत जाऊन शेखी मिरवता?

Special article on Pakistan Asim Munir showing off in USA donald trump Even joking has its limits | लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!

लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी सर्कस पाहिली असेल. त्यात एक विदूषक असतो. कोणी गंभीरपणे साहसी कसरती करत असेल तर त्यात मध्येच हा विदूषक असे काही चाळे करतो की लोक हसू लागतात. थोडे मनोरंजन होते. शेवटी माणूस तणावात तरी किती राहणार? आता तुम्ही विचाराल, अचानक सर्कसमधल्या विदूषकाची आठवण का झाली? त्याला कारण आहेत पाकिस्तानचे सेना अध्यक्ष  आसीम मुनीर  यांचे चाळे! आयातशुल्काच्या युद्धामुळे वातावरण गंभीर असताना मुनीर  यांनी पूर्वेकडून भारतावर हल्ला करण्याची दर्पोक्ती केली.

मुनीर यांना विदूषक म्हणतानाही मला संकोच वाटतो, कारण विदूषकाचे काम करणाऱ्यांबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे. अनेकदा लग्नाच्या वरातीत काही लोक अचानक येऊन नाचायला लागतात. आपणच नवरदेवाचे खरे मित्र असल्याचा देखावा ते उभा करतात. लोक त्यांच्यावरून पैसे ओवाळू लागले की त्यांना वाटते, आपण खरंच नवरदेवाचे मित्र आहोत! मुनीर साहेबांची परिस्थिती सध्या काहीशी अशीच आहे. अरे जनाब, कुठे नाचता आहात तुम्ही, कोणाच्या समोर नाचता आहात, काय बोलता आहात? शुद्धीवर तरी आहात काय? 

मुनीर यांना मी साहेब संबोधले, हे कदाचित तुम्हाला आवडले नसेल. ‘पूरब और पश्चिम’ चित्रपटात एक गाणे आहे : ‘है प्रीत जहाँ की रीत सदा, मै गीत वहा के गाता हूँ... भारत का रहनेवाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ.’ याच गाण्यात पुढे म्हटलेय  ‘हमे प्यार निभाना आता है’!  आता हे पाकिस्तान तर भारताच्याच पोटातून जन्मलेले मूल.  त्या देशाच्या सेना अध्यक्षांना आपण सन्मानपूर्वक साहेब म्हणायला नको का? तो माणूस असेल लफंगा; तर ते त्याचे नशीब. आपली वाणी  प्रेमपूर्णच असली पाहिजे.

अमेरिकेत जाऊन हा बावळट हिंदुस्थानवर पूर्वेकडून हल्ला करण्याची गोष्ट करत होता, तेव्हा मला आश्चर्य याचे वाटले, की पाकिस्तानच्या पूर्वेचा भाग त्यांना कसा काय आठवला नाही? त्या भागाचे नाव आता बांगलादेश आहे. १९७१ च्या लढाईत पाकिस्तानला वाचवण्यासाठी अमेरिकेने एक युद्धनौका पाठवली होती; तरीही इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे केले हे जरा थोडे आठवले असते तर बरे. भारतीय सैन्याने ९९ हजार पाकिस्तानी सैनिकांना शरण यायला भाग पाडले होते. पाकिस्तानला आपला पूर्वेकडला भाग वाचवता आला नव्हता आणि आता त्याच देशाच्या सेना अध्यक्षाने भारतावर पूर्वेकडून हल्ला करण्याच्या गोष्टी कराव्या? कारगिलची तरी आठवण ठेवायची. मुशर्रफ यांनी तर मोठी कुटील व्यूहरचना केली होती. भारताला तोडण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु, जेव्हा भारताने ठोकून काढणे सुरू केले तेव्हा शरीफ यांना अमेरिकेच्या पायावर लोटांगण घालावे लागले. इतिहासाची पाने जरा उघडून पाहा जनाब मुनीर, ही असली चेष्टामस्करी करून आपल्या देशाचे जगात हसे का करून घेता आहात? 

मी अनेकदा पाकिस्तानात प्रवास केला आहे. परदेशातही मला पाकिस्तानी लोक भेटतात. तुमचे देशवासीय ही भली माणसे आहेत मुनीर साहेब, तुम्ही त्यांनाच धोका देता आहात. लढाईच करायची असेल तर स्वतःची बेईमानी आणि दिखाऊपणाशी करा. लढाई गरिबीशी करा, म्हणजे तुमच्या नागरिकांना कमीत कमी गव्हाचे पीठ, डाळ आणि तेल तरी मिळेल. भारताविरुद्ध आग ओकून पाकिस्तानी जनतेचे जीवनमान सुधारणार नाही. पाकिस्तानमधील रुग्ण आज उपचारांसाठी भारतात येऊ शकत नाहीत, हे पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयच्या उद्योगांचे दुष्परिणाम आहेत. उपचार करण्यासाठी आता त्यांना काय अमेरिकेत पाठवणार का तुम्ही? 

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना तुम्ही धमकी दिलीत. माणसाने नेहमी आपल्या औकातीत राहिले पाहिजे. मुकेश अंबानी यांच्यावर टिप्पणी करताना पहिल्यांदा एकदा स्वतःची लायकी तर पाहा. एकदा हे माहिती करून घ्या की, मुकेश अंबानी यांची संपत्ती किती आहे? - त्यांची एकूण संपत्ती ८.५ लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे आणि २०२४-२५ चा पाकिस्तानचा वार्षिक अर्थसंकल्प भारतीय रुपयांमध्ये जेमतेम ४.५ लाख कोटी रुपयांचा होता. याचा अर्थ पाकिस्तानच्या अर्थसंकल्पाच्या दुप्पट संपत्ती एकट्या मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. 

आम्हा भारतीयांसाठी मुकेशभाई हे स्वत:च एक संस्था आहेत, आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. तुम्हाला काय वाटते, जनाब मुनीर, तुमची क्षेपणास्त्रे जामनगरपर्यंत पोहोचतील आणि बाकीचा देश काय तमाशा पाहत राहील? तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतके वाईट  हाल होतील तुमचे! 

तुमच्याच देशाचे एक मंत्री होते, शेख रशीद. ते म्हणायचे पाकिस्तानने छोटे छोटे अणुबॉम्ब तयार करून ठेवले आहेत, जे लोकांचा धर्म पाहून त्यांना लक्ष्य करतील. सध्या असतात कुठे हे शेख रशीद? चला जाऊ द्या!  आपण आपले आपले काय ते पाहू... ‘हम भी डूबेंगे सनम, तुम्हे भी ले डूबेंगे’ अशा थाटात अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिलीत ना तुम्ही? भारताचे अणुबॉम्ब केवळ शांततेसाठी आहेत, हे तर खरेच! पण ही अशी धमकी देताना निदान भारताचा आकार तरी लक्षात घ्यायला हवा होता तुम्ही!  काहीही झाले तरी भारत शिल्लक राहीलच राहील... लेकिन, तेरा क्या  होगा कालिया?

vijaydarda@lokmat.com

Web Title: Special article on Pakistan Asim Munir showing off in USA donald trump Even joking has its limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.