विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदींचे एकेकाळचे बहुचर्चित सख्य बिनसले, त्यामागचे रहस्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 11:41 IST2025-09-03T11:40:37+5:302025-09-03T11:41:01+5:30
जे काही घडले, त्यामुळे दोघांचा परस्परांवर विश्वास राहिलेला नाही. ट्रम्प अजूनही नव्या चाली खेळत असल्याने उभयपक्षी संबंध सुधारायला वेळ लागेल; असे दिसते.

विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदींचे एकेकाळचे बहुचर्चित सख्य बिनसले, त्यामागचे रहस्य!
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातले एकेकाळचे बहुचर्चित सख्य आता राहिले नसून उभयतांच्या नात्यात बराच कडवटपणा आला आहे. भारतीय मालावर ५० टक्के आयात शुल्क लावले गेल्याने हे घडले. दोघांचे बिनसण्यामागे भारत आणि वॉशिंग्टनमधील अंतस्थ सूत्रे बरीच कारणे देतात. मोदी यांनी अमेरिकेला सप्टेंबर २०२४ मध्ये भेट दिली त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेले ट्रम्प आणि कमला हॅरिस अशा दोघांकडेही भारतीय अधिकारी गेले, ते वितुष्टाचे पहिले कारण! हॅरिस यांनी नाखुशी दर्शविल्यानंतर मोदी यांनी ट्रम्प यांची भेट घेतली नाही. लोकमतने ६ मार्च २०२५ रोजी याच सदरात याविषयी प्रथम लिहिले होते. नवी दिल्लीने शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने ट्रम्प दुखावले.
पुढे भारत-पाकिस्तान यांच्यात ट्रम्प यांना युद्धबंदी घडवायची होती. भारताने तेथेही मोडता घातला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांना ट्रम्प यांनी भोजनाला बोलावल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी ‘जी सात’ शिखर बैठकीच्या वेळी व्हाईट हाऊसला भेट द्यायला नकार दिला. ट्रम्प यांनी मग आयात शुल्क लावून सूड घेतला म्हणतात. अमेरिकेत एच वन बी व्हिसाधारकांपैकी ७५ टक्के भारतीय असून सिलिकॉन व्हॅली आणि अमेरिकेतील तंत्र व्यवसायाला कोडर्स, इंजिनिअर्स आणि डेटा सायंटिस्ट भारत पुरवतो. ट्रम्प तेथेच थांबले नाहीत. ‘वन बिग ब्युटीफुल बिल ऍक्ट’च्या माध्यमातून त्यांनी ‘विदेशी कर्मचारी देशातून पैसा बाहेर पाठवतात’ त्यावरही कर लावला. प्रारंभी हा कर पाच टक्के होता; पण नंतर तो एक टक्क्यावर आणला तरीही अमेरिकेतले भारतीय जे पैसे बाहेर पाठवतात यातून ट्रम्प मोठी कमाई करत आहेत. भारत हा जगातला सर्वात मोठा विदेशातून पैसा येणारा देश आहे.
२०२५ या आर्थिक वर्षात या मार्गाने १३५.५ दशलक्ष डॉलर्स भारतात आले आहेत.
आता दोघांचा परस्परांवर विश्वास राहिलेला नाही. ट्रम्प अजूनही चाली खेळत आहेत. त्यामुळे उभयपक्षी संबंध सुधारायला वेळ लागेल, असे दोन्ही बाजूंना वाटते. भारतात होणाऱ्या ‘क्वाड’ शिखर बैठकीचे निमंत्रण ट्रम्प यांनी स्वीकारलेले नाही हा आणखी एक दुखावणारा मुद्दा आहे.
ट्रम्प यांचे आक्रमण मोदी कसे हाताळतात?
५० टक्के आयात शुल्क, एच वन बी व्हिसाचे नियम कडक करणे, इतकेच नव्हे तर बाहेर जाणाऱ्या पैशावर कर लावणे अशा गोष्टी करून ट्रम्प यांनी भारतावर दडपण वाढवले. नवी दिल्ली मात्र अमेरिकेशी जाहीर संघर्ष घेण्याऐवजी शांत राहून विरोध दर्शवते आहे.
अजूनही संवादाचे मार्ग खुले आहेत यावर भारतीय अधिकारी भर देतात. व्यापारविषयक बोलणी योग्य दिशेने जात आहेत, असे हे अधिकारी सांगत. असे असले तरी वादाच्या विषयावर गप्प राहणे भारताने पसंत केले आहे. ‘भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवण्यात आपण पुढाकार घेतला’, असे ट्रम्प वारंवार म्हणाले. भारताने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला. ही संदिग्धता मुद्दामच ठेवली गेली होती. मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडून आलेले चार दूरध्वनी घेतले नाहीत, असे सांगितले गेल्याने भारत शांतपणे आपली नाखुषी उघड करतो आहे, अशा वावड्या उठायला मदत झाली.
‘संघर्ष टाळण्यासाठी युक्तिपूर्ण मौन’ असे त्याचे वर्णन राजनीतिज्ञ करतात. एखाद्या व्यक्तीच्या लहरीपुढे भारत झुकणार नाही, असा सूक्ष्म संदेशच यातून दिला जातो आहे.
harish.gupta@lokmat.com