महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन विशेष लेख: अगरबत्तीवर शिजवाल, तर खिचडी शिजेल कधी?

By यदू जोशी | Updated: March 28, 2025 07:41 IST2025-03-28T07:40:32+5:302025-03-28T07:41:11+5:30

‘कबर ते कामरा’ हेच फक्त अधिवेशनात चर्चिले गेले, असे म्हणणे योग्य नव्हे. सरकारने वेग घेतला खरा; पण विरोधक मात्र चाकूने दगड चिरत बसले!

Special Article on Maharashtra Budget Session Mahayuti Goverment and confused Opposition Mahavikas Aaghadi | महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन विशेष लेख: अगरबत्तीवर शिजवाल, तर खिचडी शिजेल कधी?

महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन विशेष लेख: अगरबत्तीवर शिजवाल, तर खिचडी शिजेल कधी?

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

दादासाहेब मावळणकर  लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सभागृहात बसलेले असताना मध्येच खासदार येऊन नेहरूंशी बोलायचे, कोणी काही कागद घेऊन यायचे आणि नेहरूजीही खासदार, मंत्र्यांशी बोलायचे. थोडे ऐसपैस बसायचे. त्यातून सभागृहाची शिस्त काहीशी बिघडायची. मावळणकर यांनी दोन-तीन वेळा पाहिले; पण काही बोलले नाहीत; पण एक दिवस ते नेहरूंना म्हणाले, ‘मिस्टर प्राइम मिनिस्टर, आपण सभागृहात आहात, इथे चुळबूळ करू नका.’ आजचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांना, ‘इथे चुळबूळ करू नका’ असे म्हणू शकतील का? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात बसलेले असताना त्यांच्यापाशी आमदार, मंत्री सतत येतात, कानाशी लागतात, कामाच्या कागदपत्रांवर सह्या घेतात असे प्रकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात खूपदा बघायला मिळाले. हे उचित नव्हे. आमदार, मंत्र्यांनी तर सभागृहाच्या संकेतांचे भान बाळगलेच पाहिजे; पण फडणवीस, शिंदेंनीही विधानसभा ही भेटीगाठीची जागा नाही असे त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे. काल एका पत्रकाराने याबाबतच प्रश्न केला तेव्हा, ‘विधानसभेत असे घडता कामा नये, मी नक्कीच आमदार, मंत्र्यांना सांगेन’ असे फडणवीस म्हणाले. जूनमधील पावसाळी अधिवेशनात त्याचा परिणाम दिसून येईल, अशी अपेक्षा आहे. 

भावले असे काही...

यावेळच्या अधिवेशनात एक गोष्ट मात्र खूप भावली. सरकारमधील बऱ्याच नवीन मंत्र्यांचा हेतू चांगला असल्याचे त्यांच्या उत्तरांमधून जाणवत होते.  हेतू चांगला असेल तर पुढे अधिक चांगल्या गोष्टी होण्याला आणि आधीच्या चुका सुधारण्याला वाव असतो. तसा वाव यावेळच्या मंत्र्यांबाबत दिसत आहे. कदाचित, हा फडणवीस इफेक्ट असावा. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कामगार मंत्री आकाश फुंडकर, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर ही मंत्र्यांची नवी फळी आश्वासक वाटली. त्यांच्यात आत्मविश्वास जाणवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने सरकार पुढे नेऊ पाहत आहेत त्याला अनुरूप असे वागणे-बोलणे ठेवावेच लागेल याचे भान ज्या मंत्र्यांना राहील, तेच दमदार कामगिरी करू शकतील. जे असे भान बाळगणार नाहीत ते मंत्रिपदी तर राहतील; पण त्यांच्या कामगिरीला मर्यादा पडत राहतील. सभागृहात बोलण्याबाबत जो दम मंत्र्यांमध्ये दिसला तोच त्यांच्या निर्णय घेण्यात पुढील काळात दिसेल ना? उक्ती आणि कृतीमध्ये अंतर पडत गेले तर नेतृत्वाबाबतची विश्वासार्हता कमी-कमी होत जाते, तसे होऊ नये एवढेच! 

‘कबर ते कामरा’ एवढेच विषय या अधिवेशनात झाले असे म्हणणे योग्य नव्हे. जे लोक टीव्हीवरील बातम्या पाहून मते बनवितात त्यांना तसे वाटू शकते.  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागात लोकाभिमुख निर्णयांचा धडाका लावला आहे. किमान दहा तरी निर्णय त्यांनी या अधिवेशनात असे जाहीर केले की, ज्यांचा लाभ थेट सामान्य माणसांना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पुढील कारभाराची दिशा सभागृहात वेगवेगळ्या मुद्यांवर बोलताना स्पष्ट केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ‘नो रिझन, ऑन द स्पाॅट डिसिजन’ अशी नवीन टॅगलाइन दिलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी आयसीयूमध्ये गेली होती, तिथून ती या अधिवेशनात निदान जनरल रूममध्ये शिफ्ट होईल असे वाटले होते; पण तसे काही झाले नाही. शेवटच्या दोन-तीन दिवसांत सत्ताधाऱ्यांवर थोडीफार टीका त्यांनी केली खरी; पण ते बोथट झालेल्या चाकूने दगड चिरत असल्यासारखे वाटले. अगरबत्ती लावून खिचडी शिजवत असाल तर ती खिचडी शिजेल कधी आणि ती खाल कधी? 

हल्ली म्हणे महाविकास आघाडीतील नेत्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांशी पटते; पण आपसात पटत नाही. राहुल गांधी मध्यंतरी गुजरातमधील काँग्रेसबाबत जे बोलले होते ते महाराष्ट्र काँग्रेसमधील काही जणांबाबत लागू होते; तपासून पाहा.

जुन्या जखमा असतात! 

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजिबात उत्सुक नसल्याचे दाखवणारे; पण या पदासाठी अतिशय उत्सुक असणारे भास्कर जाधव यांनी फडणवीसांच्या संविधानावरील भाषणाची केलेली तारीफ काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना खटकली. भास्करराव भाबडे आहेत, एकीकडे फडणवीसांवर सडकून टीका करायची आणि दुसरीकडे हळूच त्यांच्याकडे मोठ्या कामाची फाइल घेऊन जायची असे नाही करता येत त्यांना. इतक्या वर्षांत भास्कररावांना असे तंत्र साधले नाही.  

विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करायची की नाही या निर्णयाचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे असे फडणवीसांनी सांगितले; पण अधिकार अध्यक्षांना असला तरी नाव कोणाचे द्यायचे, हे कोणाच्या हाती आहे, हे साध्या माणसालाही कळते.  फडणवीस हे दीर्घद्वेषी नाहीत; पण काही जुन्या जखमा   बराच काळ दुखत राहतात. शब्द जपून वापरले नाहीत तर त्याची किंमत मोजावी लागते. तशी ती  काही नेत्यांना आता मोजावी लागत आहे. 

“बुलंदी देर तक किस शख्स के हिस्से में रहती है,
बहुत उँची इमारत हर घडी हमेशा खतरे में रहती है.”

yadu.joshi@lokmat.com

Web Title: Special Article on Maharashtra Budget Session Mahayuti Goverment and confused Opposition Mahavikas Aaghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.