विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ

By सचिन जवळकोटे | Updated: November 16, 2025 14:27 IST2025-11-16T14:26:28+5:302025-11-16T14:27:03+5:30

बिबट्या ही जात ‘मार्जार’ कुळातली. ‘वाघाची मावशी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या मांजराची मोठी बहीणच. अर्थात मोठी मावशी.

special article on leopard entering kolhapur village area attacking people | विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ

विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ

सचिन जवळकोटे, कार्यकारी संपादक, काेल्हापूर

बिबट्या ही जात ‘मार्जार’ कुळातली. ‘वाघाची मावशी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या मांजराची मोठी बहीणच. अर्थात मोठी मावशी. कधीकाळी जंगलात शिकार करून जगणारी. काळाच्या ओघात जंगलातल्या छोट्या प्राण्यांची संख्या कमी होऊ लागलेली. नवं खाद्य शोधण्यासाठी हाच बिबट्या वाड्या-वस्त्यांमध्ये डोकावू लागलेला. गोठ्यातली जनावरं अन् वस्तीवरची कुत्री हेच त्याचं ‘इन्स्टंट फूड’ बनत गेलेलं. ना पाठलाग. ना झडप. आयत्या खाद्याची चटक लागलेला हा बिबट्या गेल्या वीस-पंचवीस वर्षांत पूर्णपणे बिघडलेला. माणसाप्रमाणेच झपाट्याने बदलत चाललेल्या या प्राण्याच्या लाईफ स्टाईलची भयंकर कहाणी कुठं शेवटाला पोहोचणार? अत्यंत भयचकित करणारा एन्ड. अर्थात आळशी मावशी. लगाव बत्ती..

परवा कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत आलेला बिबट्या तब्बल तीन दिवस इथंच तळ ठोकून. तेही ‘फॉरेस्ट डिपार्टमेंट’च्या ऑफिसजवळच. किती गंमत बघा. बिचारे फॉरेस्ट कर्मचारी वन्यप्राणीगणना करण्यासाठी जंगलात पायपीट करतात. मात्र, इथं त्यांच्या उशालाच मुक्कामाला आलेला पठ्ठ्या कुणालाच न दिसलेला. खरंतर, हा प्राणी दगडावर झोपणारा, खड्ड्यात लपणारा. महापालिकेच्या कृपेने दोन-तीन दिवस त्याला ‘खड्ड्यांचा आसरा’ मिळालाही असावा. मात्र, तिसऱ्या दिवशी पब्लिकच्या नजरेला पडलेला. त्याच्याजवळ गेलेल्यांवर त्यानं हल्ला चढवलेला. मात्र, फक्त पंज्याच्या फटक्यातच घायाळ केलेलं. एकाच्याही शरीराला अथवा नरडीला दात लावण्याचा प्रयत्न न केलेला. कारण हजारो वर्षांपासून ‘मानवी स्वभावाची महती’ वन्यप्राण्यांना अचूक ठाऊक असलेली. एक प्राणी मारला तर कळपातले बाकीचे पळून जातात; परंतु एक माणूस मारला तर दहा-बाराजण गोळा होऊन आपल्याला ठार करतात, हे या श्वापदांना माहीत असलेलं. त्यामुळंच त्यानं केवळ भीती दाखविण्यासाठी फटकारलं अन् नंतर त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केलेला. लगाव बत्ती..

मुळात हा बिबट्या जंगलातला. ससे, मोठे उंदीर, माकडं अन् पक्षी खाणारा. कातळात राहणारा. मात्र, १९७२ च्या दुष्काळापासून जंगलाचं चित्र बदलू लागलेलं. सरकारनं झाडं लावण्याचा सपाटा सुरू केलेला. मात्र, देशी झाडांपेक्षा फॉरेन ट्री लावण्यात हे खातं मश्गुल झालेलं. ऑस्ट्रेलियन बाभूळ अन् निलगिरीसारख्या बिनकामाच्या झाडांनी जंगल वेढलं गेलं. ना यांच्या पानांचा फायदा. ना फळांचा. साधी मुंगीदेखील यांच्या बुंध्याजवळ येईनाशी झाली. अशात मानवनिर्मित वणवा वरचेवर पेटू लागलेला. लोकांनी मुद्दाम आगी लावणं, हा विषय वेगळा. मात्र, कळत-नकळत अनेक चुका होऊ लागल्या. जंगलातली ड्रिंक पार्टीही महागात पडू लागली.  जंगलामध्ये मद्य घेतल्यावर बाटली फोडून टाकली जाऊ लागली. फोडलेली बाटली जेव्हा उलटी पडते तेव्हा अंतर्गोल रचनेचा बर्हिगोल तयार होऊन सूर्यकिरणे एकवटताच वणवा लागून पालापाचोळा पेटू लागला. या गवतावर जगणारे शाकाहारी प्राणी परांगदा झाले. मग, उपाशीपोटी बिबट्या जंगलाबाहेर पडला. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत वाड्या-वस्त्यांवरची एखादी दुसरी शेळी पळवून नेण्यापर्यंतच मजल. मात्र, आता थेट गावात शिरून रस्त्यावरची कुत्री ठार मारण्यापर्यंत याचं धाडस गेलेलं. पन्हाळा-शाहूवाडी परिसरात रात्री-अपरात्री गल्लीतलं कुत्रं शेपूट आत घालून घरात शिरताच इथली लोकं अचूक ओळखू लागलेली की आसपास बिबट्या आलेला. अलीकडच्या काळात गजबजलेल्या पन्हाळा एस.टी स्टॅण्ड परिसर सोडला तर तुम्हाला इतरत्र कुत्री दिसणंही दुर्मीळ झालेलं. लगाव बत्ती..

कोल्हापूरचे दिनकर चौगुले हे ‘बिबट्या फ्रेंड’ म्हणून ओळखले गेलेले. ‘फॉरेस्ट’मध्ये नोकरी करताना गेल्या चाळीस-बेचाळीस वर्षांत कैक बिबट्यांना हाताळलेलं. त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करणासाठी शेकडो बिबट्यांचा गुपचूप पाठलाग केलेला. मादीला चार-पाच पिल्लं झाल्यानंतर ती त्यांना वर्षभर सांभाळते. त्यानंतर त्यांच्याशी भांडण करून एकेकाला वेगवेगळ्या दिशेला पळवून लावते. पुन्हा ही भावंडं एकत्र येऊ नये यापाठीमागं दडलेलं असतं शास्त्रीय कारण. ‘कॉमन ब्लडलाईन बेबी’चा धोका भविष्यात टाळण्यासाठी. बघा जे माणसांना उमजलं नाही, ती उपजत जाणीव बिबट्यांकडे. असो. फॅमिलीपासून दुरावलेली ही पिल्लं भटकत-भटकत कधी चुकतात. मानवी वस्तीत शिरतात. लगाव बत्ती..

विषय ‘इस्टंट फूड’चा चालला होता अर्थात कुत्र्यांचा. अलीकडच्या काळातच बिबट्याचे हल्ले वाढताहेत, याला जबाबदार ही कुत्रीच. गावोगावी पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे उगवलेले चिकन सेंटर शॉप. दिवसभर खाटखूट करत रात्री रस्त्यालगत टाकलेल्या खराब तुकड्यांवर धष्टपुष्ट झालीत ही कुत्री. रोजच्या रेडिमेड फूडला चटावलेली ही कुत्रीही वरचेवर आळशी बनत चाललेली. जागेवरनं हलता हलेनाशी झालेली.. अन् इथच बिबट्यांचे फावलेलं. गोठ्यात दावणीला बांधलेलं जनावर मारताना वस्ती जागी होण्याची भीती. मात्र, इथं जीव जाताना हे कुत्रं कितीही केकाटलं तरीही कुणीच मध्यरात्री दार उघडून बाहेर डोकावण्याची तसदी घेत नसलेलं. तशात हे गुबगुबीत कुत्री दोन-तीन दिवस चघळायला बिबट्यासाठी टेस्टी. असो. या प्राण्याची अजून एक खासियत. शिकार केल्या-केल्या तो कधीच फडशा पाडत नाही. दोन दिवस ते जनावर सडवल्यानंतरच निवांतपणे टेस्ट घेण्यात अधिक इंटरेस्ट. तरी नशीब समजा, सध्या कुत्री बक्कळ. ही संपल्यानंतर पुढं काय? गावच्या रहदारीला चटावलेला या वन्य प्राण्याला भविष्यात माणसाशिवाय दुसरा पर्याय कोणता ? लगाव बत्ती..

जाता जाता : कोल्हापूर शहरात आजपर्यंत तीनवेळा बिबट्या दिसलेला. (म्हणजे कितीवेळा गुपचूप लपलेला हे गल्लीतून गायब झालेल्या कुत्र्यालाच माहीत !) या तिन्ही वेळी तो नोव्हेंबर, डिसेंबर अन् जानेवारी महिन्यातच वाट चुकून शहरात आलेला. गावाभोवतीचा उसाचा फड साेडून तो भरकटण्याचं कारण म्हणजे ऊसतोडीचा हंगाम. फडात कोयते परजू लागले की, जमावाच्या आवाजाला भेदरुन वाट मिळेल तिकडं तो पळू लागलेला. मात्र, यातही एक वैशिष्ट्य. फडात पिल्ले जन्माला घालणारी मादी मात्र कधीच आपली जागा सोडत नसलेली. कारण पळून जाताना ती तोंडात जास्तीत जास्त एकच पिल्लू धरू शकते. बाकीची तीन-चार कुठं सोडणार? त्यामुळं सर्वच पिल्लांना वाचविण्यासाठी ती जवळ येणाऱ्या लोकांवर चवताळून हल्ला करण्यासाठी मागं-पुढं न पाहणारी. कारण तिला  पुरतं ठाऊक असतं. अशावेळी जीव घ्यायचा असतो किंवा द्यायचा. लगाव बत्ती..

Web Title : आलसी तेंदुआ: क्या मुर्गियां हैं ज़िम्मेदार? यहाँ धुआँ, वहाँ आग!

Web Summary : एक तेंदुए का जंगली शिकार से गांवों के पास कुत्तों जैसे आसान लक्ष्यों की ओर बदलाव का विवरण दिया गया है। वनों की कटाई, आसानी से उपलब्ध भोजन कचरा और बदलते परिदृश्य तेंदुओं को मानव क्षेत्रों में धकेल रहे हैं, जिससे संघर्ष पैदा हो रहा है और उनका व्यवहार बदल रहा है। इससे मनुष्य और वन्यजीव दोनों खतरे में हैं।

Web Title : Lazy Leopard: Chickens to blame? Smoke here, fire there!

Web Summary : A leopard's shift from wild prey to easy targets like dogs near villages is detailed. Deforestation, easily available food waste, and changing landscapes are pushing leopards into human areas, creating conflict and changing their behavior. This threatens both humans and wildlife.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.