विशेष लेख: ...ही मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरण्याची वेळ! प्रश्न सगळ्यांनाच विचारायला हवेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 11:14 IST2026-01-24T11:12:39+5:302026-01-24T11:14:17+5:30
राजकारण किंवा व्यवस्थेविरुद्धचा लढा हा केवळ सत्तेलाच प्रश्न विचारणारा नसावा, तर असे प्रश्न सगळ्यांनाच विचारले गेले पाहिजेत!

विशेष लेख: ...ही मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरण्याची वेळ! प्रश्न सगळ्यांनाच विचारायला हवेत
(दिलीपराज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘आभाळाचे तुकडे’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिराम भडकमकर यांच्याशी संवाद)
‘आभाळाचे तुकडे’ हे शीर्षक अतिशय सूचक आणि काव्यात्म आहे. या शीर्षकातून नेमकं काय अधोरेखित करायचं होतं?
- आयुष्य हे आभाळासारखं विस्तीर्ण आणि विशाल आहे. पण, प्रत्येकाला त्याचा संपूर्ण अनुभव येत नाही. प्रत्येकजण आपल्या अनुभवाच्या खिडकीतून आभाळाचा केवळ काही भाग पाहतो. त्या खिडकीतून मला जे जे आभाळाचे तुकडे दिसले, ते या लेखसंग्रहात मांडले आहेत. हे तुकडे कधी सांस्कृतिक, कधी साहित्यिक, कधी सामाजिक प्रश्नांशी संबंधित, तर कधी मानसिक अनुभवांशी निगडीत. आयुष्य कधीच समग्रपणे मिळत नाही; ते नेहमी तुकड्यांतच आपल्या हाती येतं. हे तुकडे एकामागोमाग एक मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हे शीर्षक मला रॉय किणीकर यांच्या एका कवितेतून सुचलं.
आभाळाच्या या तुकड्यांतून अस्वस्थ वर्तमान प्रतीत होतं ते कसं?
- आज आपण सगळ्या व्याख्या, सगळ्या संकल्पना परत एकदा तपासतो आहोत. आपल्या धारणांना आपण पुन्हा पुन्हा प्रश्न करत आहोत. मला ही अस्वस्थता खूप सकारात्मक वाटते. कारण ती मंथनातून आलेली आहे.
म्हणजे आपण एकाअर्थी पुन्हा मुळांकडे -‘बॅक टू रूट्स’- चाललो आहोत का?
- मला वाटतं, मनुष्यजातीचा प्रवास असाच सतत होत असतो. तो मुळांपासून दूर जातो आणि कालांतराने पुन्हा मुळांकडे वळतो. आपली संस्कृती, तिच्यात मिसळलेले घटक, आपले विचार, तत्वज्ञान, धारणा या सगळ्याकडे माणूस पुन्हा पुन्हा झेपावतो. सध्याचा काळ तसाच आहे.
आभाळाचे तुकडे वाचून तरुण वाचकांनी काय घेऊन जावं, अशी तुमची अपेक्षा आहे?
- जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी. मी जेव्हा हे लेख लिहिले, तेव्हा त्या घटनांकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला. पुलंच्या नारायणावरचा लेख पाहिला तर तो आजच्याच पिढीचा नारायण आहे. पुलंचा नारायण जुना होता. तो इव्हेंट मॅनेजमेंटच करत होता. परंतु, तो एका आत्मियतेनं करत होता आणि आजच्या तरुणांचा रोखठोक असा सवाल आहे की, आम्ही एखाद्याची गरज पूर्ण करत असू, तर त्याच्या बदल्यात मोबदला मागणं किंवा घेणं, यात अनैतिक काय? कलेबरोबर व्यवहारही प्रामाणिक असायला हवा, ही आजची नवी दृष्टी आहे.
ललित लेखनातून वैचारिक धार जाणीवपूर्वक घडते की, ती अनुभवातून आपोआप आकार घेते?
- वाचन, अनुभव आणि ऐकणं यातून वैचारिक पाया घडतो. जगणं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सगळ्या स्तरांवर घडत असतं. व्यवस्थेच्या विरूद्ध लढणारी जी माणसं आहेत, तीच कशी नवीन व्यवस्था निर्माण करतात आणि तिथेच ती असहिष्णुतेने वागतात, त्यावर ‘मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरा’ या लेखात भाष्य केलेलं आहे. परंतु, अशा पद्धतीने राजकारण किंवा व्यवस्थेविरूद्धचा लढा केवळ सत्तेलाच प्रश्न विचारणारा स्टिरिओटाइप नसावा, तर असे प्रश्न सगळ्यांनाच विचारायला हवेत.
तुम्ही थेट विधानांपेक्षा सूचकता आणि भाषिक संयमाचा मार्ग स्वीकारलेला दिसतो. आजच्या आक्रमक मतप्रदर्शनाच्या काळात सूचकता अधिक प्रभावी ठरते, असं तुम्हाला वाटतं का?
- खरं सांगायचं तर आजकाल मलाही हा प्रश्न पडतो की, सध्याच्या काळात आक्रस्ताळेपणा आणि आक्रमकपणा हा लक्ष वेधण्याचा फंडा झालेला आहे का? अगदी भले भले लेखकही जेव्हा अशा पद्धतीची विधानं करतात की, असं वाटतं, अरे, हा एवढा मोठा लेखक असं कसं बोलून जातो?.. आक्रस्ताळेपणा लक्ष वेधून घेतो. पण, तो विचार करायला लावतोच असं नाही. वाचकांनी शांतपणे विचार करावा, चिंतन करावं, असं मला वाटतं. त्या दृष्टीने सूचकता आणि संयमाचा मार्ग मला अधिक योग्य वाटतो.
ठाम मत मांडणं आणि प्रश्न विचारणं, यापैकी लेखकाने कोणती भूमिका घ्यावी?
- लेखक म्हणून मला नेहमी असं वाटतं की, आपण कुतुहलाने सगळ्याकडे पाहिलं पाहिजे. लगेचच निष्कर्षावर येण्याची घाई करायची काही गरज नाही. अनेक गोष्टी पाहिल्यानंतर जे प्रश्न मला पडतात, ते मी मांडतो. मला प्रश्न करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. अनेकांचं कुतुहल संपलेलं असतं आणि त्यांची मतं ठाम झालेली असतात. पण, माझं कुतुहल संपलेलं नाही.
‘आभाळाचे तुकडे’ या रूपकातून तुम्ही भारताच्या विविधतेकडे कसं पाहता?
- आपल्याला जे आभाळ दिसतं, तो एक तुकडा आहे. त्याच्या पलीकडेही आभाळ आहे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. माझ्या विचारांच्या पलीकडे, कदाचित अगदी विरूद्ध टोकाचेही विचार असतील. त्यांच्याबद्दल स्वागतशील असणं म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य. अनेक तुकड्यांनीच आभाळ बनतं आणि आपण त्यातला एक तुकडा आहोत, हे भान महत्त्वाचं आहे.
मुलाखत आणि शब्दांकन - दुर्गेश सोनार, सहायक संपादक, लोकमत (durgesh.sonar@lokmat.com)