विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
By विजय दर्डा | Updated: December 1, 2025 07:04 IST2025-12-01T07:03:10+5:302025-12-01T07:04:50+5:30
इम्रान खान तुरुंगाच्या बाहेर आले तर त्यांना सांभाळणे सोपे नसेल हे सत्तेवर कब्जा करून बसलेल्या असीम मुनीर यांना चांगलेच ठाऊक आहे.

विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान जिवंत आहेत की खरोखरच मृत्यूची शिकार झाले आहेत? हा या घडीचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीचे खंडन होऊनही लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. जिवंत असतील, तर कुटुंबीय किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटू का दिले जात नाही?-हाही प्रश्न विचारला जात आहे.
त्यांच्या मृत्यूची बातमी खरी असो किंवा खोटी, मुनीर कोणत्याही परिस्थितीत इम्रान खान यांना जिवंत सोडणार नाहीत हे मात्र नक्की. कारण मुनीर यांना धूळ चारण्याची ताकद केवळ इम्रान यांच्याकडेच आहे. इम्रान खान गेल्या अडीच वर्षांपासून रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात बंदी आहेत.
भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावली गेली होती. न्यायालयाचे आदेश असूनही त्यांना कुटुंबीयांनाही भेटू दिले जात नाही. त्यामुळे स्वाभाविकच वेगवेगळ्या शंका निर्माण होत राहिल्या. इम्रान खान यांना तुरुंगात रहस्यमय प्रकारे ठार मारले गेले, असा दावा २६ नोव्हेंबरला 'अफगाणिस्तान टाइम्स' नावाच्या एक्स (द्विटर) हँडलवर करण्यात आला.
दुसऱ्याच दिवशी इम्रान यांचा मुलगा कासीम खान याने ट्रीट केले की 'अब्बांच्या बहिणींना त्यांना भेटू का दिले गेले नाही? माझा आणि माझ्या भावाचा अब्बांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. ते जिवंत असल्याचा कोणताही पुरावा आम्हाला मिळालेला नाही'... काहीतरी लपवले जात आहे; तेव्हा आंतरराष्ट्रीय संस्थांनी यात लक्ष घालावे, अशी विनंतीही कासीमने केली.
दरम्यान, इम्रान खान स्वस्थ आणि सुरक्षित असल्याचे अडियाला तुरुंगाच्या वतीने सांगण्यात आले. पण, जर ते सुरक्षित आहेत तर त्यांना भेटायला गेलेल्या त्यांच्या तीन बहिणी, नुरीन, अलिमा आणि उज्जमा खान यांना पोलिसांनी का बदडले? त्यांना इम्रान खानना भेटू का दिले गेले नाही? इम्रान यांच्या वकिलांनाही त्यांना भेटण्यापासून अडवले गेले. यामुळेच इम्रान खान जिवंत नसल्याच्या शंकेला पुष्टी मिळत आहे. 'खैबर पख्तुनखा'चे मुख्यमंत्री सोहेल आफरीदी यांनाही इम्रानना भेटू दिले गेले नाही.
पाकिस्तानमधील सर्वांत ताकदवान व्यक्ती असीम मुनीर यांच्या इशाऱ्यावरच हे होत आहे हे उघडच होय. मुनीर आणि इम्रान यांचे वैर जुने. आपल्याला आव्हान देण्याची ताकद फक्त इम्रान यांच्यातच आहे, हे मुनीर चांगलेच जाणतात. अडीच वर्षांपासून तुरुंगात बंद असले तरी इम्रान यांच्या लोकप्रियतेला ढळ लागलेला नाही.
पाकिस्तानचे भले केवळ इम्रान खानच करू शकतात, हे पाकिस्तानी जनता ठामपणे मानते. अमेरिकी सत्तेला इम्रान यांनी ज्या प्रकारे आव्हान दिले होते, त्यातून त्यांची प्रतिमा उंचावली; परंतु, दुर्भाग्याने त्यांना अशा प्रकारे दडपले गेले की ते अमेरिकेच्या नजरेला नजर भिडवू शकणार नाहीत. असीम मुनीर आयएसआयचे प्रमुख असतानाच इम्रान यांना दडपण्यासाठी अमेरिकेने त्यांना हाताशी धरले होते. इम्रान यांच्या लक्षात ही गोष्ट येताच केवळ आठ दिवसांत त्यांनी मुनीर यांना पदावरून हटवले. त्यावेळी त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायला ३ वर्षे बाकी होती.
२०२२ साली इम्रान खान यांना सत्तेवरून बाजूला करताच मुनीर यांना संधी मिळाली. वेगवेगळ्या आरोपांत इम्रान खान यांना अडकवून तुरुंगात पोहोचवले गेले. एका प्रकरणात आधी दोन वर्षाची शिक्षा झाली. मग, पुन्हा दुसऱ्या प्रकरणात १४ वर्षाची शिक्षा सुनावली गेली.
इम्रान तुरुंगाच्या बाहेरच येणार नाहीत याचा पुरता बंदोबस्त केला गेला. दरम्यानच्या काळात स्वतः असीम पाकिस्तानचे नवे हुकूमशहा बनले. 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळी भारताकडून मार खाऊनसुद्धा त्यांना फील्ड मार्शल केले गेले. आता त्यांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून पाच वर्षासाठी स्वतःला पाकिस्तानचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. याचा अर्थ नौदल आणि हवाई दलही त्यांच्या अखत्यारीत आले.
अण्वस्त्रांची कळही सरळ सरळ मुनीर यांच्या हातात गेली आहे. सर्वोच्च न्यायालयांचे अधिकार कमी करून केवळ नागरी आणि गुन्हे विषयक प्रकरणांपुरते मर्यादित ठेवले गेले आहेत. घटनात्मक प्रकरणांच्या बाबतीत संघीय घटनात्मक न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या न्यायालयात मुनीर यांची मर्जी चालेल.
याविरोधात दोन न्यायाधीशांनी राजीनामाही दिला. परंतु, मुनीर यांना काय फरक पडणार? न्याय व्यवस्थाही मुनीर यांच्या हातातले बाहुले बनली आहे. इम्रान यांना तुरुंगातून जिवंत तर बाहेर येऊ दिले जाणार नाही हे जवळपास निश्चित आहे. राजकीय नेत्यांना ठार मारणे ही पाकिस्तानी सेना आणि आयएसआय यांच्यासाठी काही वेगळी गोष्ट नाही. मुनीरही त्याच मार्गावर आहेत. इम्रान खान यांच्यासाठी आपण फक्त प्रार्थना करू शकतो.
जाता जाता
'पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा दहशतवाद्यांचा नव्हता तर विद्रोही हल्ला होता,' असे अमेरिकन संसदेचा ताजा अहवाल म्हणतो. आपले रक्त उसळले पाहिजे; आणि अमेरिकेच्या नजरेला नजर भिडवून आपण हे सांगितले पाहिजे की, ही बकवास बंद करा. तुम्हीच पोसलेल्या चांगल्या आणि वाईट दहशतवादाने जगाचा सत्यानाश केला आहे. आम्ही आता आणखी सहन करणार नाही.