विशेष: तोचि प्रेरणादायी, तोचि अधिपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 10:21 IST2025-08-31T10:21:11+5:302025-08-31T10:21:52+5:30

ज्याचा सहवास हवाहवासा तो गणेश म्हणजे मूळचा गुणेश. आपल्या मनांत तसाच चराचरातही. सृष्टीव्यापी. प्रणवस्वरूप. त्रैलोक्याधिपती. लोकसमूहांचा-गणांचा पती. लंबोदर, जगदाधार, अनाथांचा नाथ, दीनानाथ, विघ्नहर्ता, चिंतामणी, सर्वेश्वर आदी नामांचा धारणकर्ता...

Special article Ganeshotsav 2025 | विशेष: तोचि प्रेरणादायी, तोचि अधिपती

विशेष: तोचि प्रेरणादायी, तोचि अधिपती

सिद्धार्थ ताराबाई
मुख्य उपसंपादक

ज्याचा सहवास हवाहवासा तो गणेश म्हणजे मूळचा गुणेश. आपल्या मनांत तसाच चराचरातही. सृष्टीव्यापी. प्रणवस्वरूप. त्रैलोक्याधिपती. लोकसमूहांचा-गणांचा पती. लंबोदर, जगदाधार, अनाथांचा नाथ, दीनानाथ, विघ्नहर्ता, चिंतामणी, सर्वेश्वर आदी नामांचा धारणकर्ता. सृष्टीला कुरतडणाऱ्या कालाच्या प्रतीकाला-मूषकालाच वाहन बनवून स्वार झालेला म्हणजेच कालहरण करणारा गणराज. ज्ञानेश्वरांनी त्याचं समर्पक वर्णन केलं आहे: अकार चरण युगुल, उकार उदर विशाल मकार महामंडल, मस्तकाकारे १६ विद्या आणि ६४ कलांचा हा कलाधर सध्या आपल्या घरी-दारी-अंगणी, वाडीवस्तीवर मुक्कामाला आहे. तो अफाट सागराची गाज होतो आहे. फेसाळत्या लाटांच्या रूपात किनाऱ्यांशी बोलतो आहे. तिकडे दूर गाव-खेड्यात हळव्या भाताच्या पिवळ्याधमक लोंब्यांमध्ये परिमळतो आहे. नागली आणि वरईच्या पिकांमध्ये डोलतो आहे. नारळी-पोफळीच्या बागांमध्ये संचरतो आहे. दुष्काळग्रस्तांचं आक्रंदन तो ऐकतो आहे. कुपोषणग्रस्त माता-बालकांची अस्थिपंजर शरीरं पाहून ऊरी-राऊळी फुटतो आहे. शाळा चुकलेल्या, सुटलेल्या लेकरांचं बोट धरून श्रीगणेशा गिरवतो आहे. श्रमिकांच्या वेदनांनी व्याकुळतो आहे. अंधश्रद्धा, बुवाबाजी, अन्याय-अत्याचारांविरुद्ध लढणाऱ्यांचं बळ होतो आहे. कोळ्यांचं दुःख तो जाणतो आहे. स्त्रीच्या व्यथांनी तो व्यथित होतो आहे. म्हणूनच स्त्रीला गौराईचे प्रतीक मानून वारली गाण्यात मांडलेली तिच्या वनवासाची वेदना काळजाचा ठाव घेते...

गऊर घरात शिरली
सासूनं धरली सासऱ्यानं मारली
नंदेनं धरली दिरानं मारली
भावल्यानं धरली नवऱ्यानं मारली
गऊर वनवासाला गेली...

गौराई अशी वनवासाला जाता कामा नये. तिचा वनवास संपायला हवा. माणूस म्हणून तिचा सन्मान व्हायला हवा. मताला किंमत आणि तिच्या कर्तृत्वाला, श्रमाला प्रतिष्ठा मिळायला हवी. स्त्री-पुरुष विषमतेविरोधात एकजुटीनं लढण्याची प्रेरणा गणरायाकडून घ्यायला हवी.

पालघरच्या अतिदुर्गम गावांसह राज्याच्या काही भागांमध्ये कुपोषणानं ठाण मांडलं आहे. दारिद्र्य हे त्याचं मूळ. आपले काही बांधव अर्धपोटी तर काही उपाशी आहेत. दर्याचा राजाही हवालदिल आहे. त्याचा सागरदेव नाराज आहे. म्हणून विघ्नविनाशकाचा पाहुणचार घेताना त्यांची वेदना आपलीही आहे, याचं भान ठेवायला हवं. शहरांमध्ये यंत्राच्या चाकावरचा कामगार, शहरे साकारणारा मजूर दुखी आहे. शहर आणि परिसर स्वच्छ ठेवणारे हात हतबल आहेत. आपला अन्नदाताही आत्महत्येच्या दुष्टचक्रात सापडला आहे. त्याचीही जाणीव सुखकर्त्याच्या सहवासात होत राहिली पहिजे.

दारिद्र्यामुळे असंख्य मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. काही अर्ध्यावरून शाळेची वाट सोडतात. कोवळ्या वयात त्यांच्या प्राक्तनी कष्ट येतात. बालपण करपून जातं. त्यांचं खेळायचं-बागडायचं राहूनच जातं. अशा असंख्य बालगणेशांचं बोट धरून त्यांना पुन्हा शाळेच्या वाटेवर आणायला हवं.  

काही दिवसांनी दाटल्या कंठाने गणरायाचा निरोप घेण्याची घटिका येईल. त्या हृद्य सोहळ्यात आसमंत भक्तिरसात न्हावून निघेल. अशावेळी आपली भक्ती आंधळी ठरू नये. तिनं हुल्लडबाजीच्या रूपात उतू नये, भावनेच्या भरात मातू नये आणि डिजेच्या दणदणाटात उच्छादूही नये. तिनं सत्कार्याला, सामाजिक एकोपा नि सोहार्दाला प्रेरित करावं. कारण तो आहे प्रेरणास्त्रोत. तो त्याच्या गावी जाईल, पण त्याच्या पुण्यप्रभावाचे अगणित प्रतिध्वनी मनीमानसी, शेती-भातीत, रानोमाळी निनादत राहतील!

Web Title: Special article Ganeshotsav 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.