- डॉ. विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
सर्वात आधी प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.. जय हिंद!गेले काही दिवस प्रवासात असताना माझा स्तंभ नियमितपणे वाचणाऱ्या एका वाचकाची भेट झाली. त्याने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. 'आपल्याच देशात इतक्या घडामोडी घडत आहेत, इतके सगळे प्रश्न उभे राहात आहेत, अशावेळी आपण आपल्या स्तंभात परदेशी विषयांना प्राधान्य का देता?' - असा त्या वाचकाचा प्रश्न होता. जग इतके जवळ आले आहे की प्रत्येक विषयाशी भारताचा संबंध येतोच, असे माझे वाचकांना सांगणे आहे. सोप्या शब्दांत, संतुलितपणे वर्तमान परिस्थिती वाचकांसमोर मांडणे ही माझी जबाबदारी आहे. माझ्याकरता 'देशी' आणि 'विदेशी' असे काही नसते. वाचकांनी सजग असावे, त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत, असा माझा प्रयत्न असतो.
गेल्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान केवळ १०५ मिनिटांसाठी भारतात आले होते. एखाद्या राष्ट्राध्यक्षाने इतक्या कमी कालावधीसाठी दौऱ्यावर यावे, हे तसे दुर्मिळच! शिष्टाचार बाजूला ठेवून त्यांचे स्वागत करण्यासाठी खुद्द नरेंद्र मोदी विमानतळावर गेले. तेथून दोघा एकाच मोटारीतून पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. काही करारांवर सह्या झाल्या आणि नाहयान पुन्हा अमिरातीकडे निघून गेले. परराष्ट्र मंत्रालयाने झालेल्या कराराविषयी काही माहिती दिली. परंतु, या छोट्याशा दौऱ्यामागचा हेतू केवळ तेवढाच होता?
गेल्या काही वर्षांत संयुक्त अरब अमिरात कूटनीतीचा धुरंधर खेळाडू म्हणून पुढे आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही कूटनीतीचे चाणक्य आहेत. मध्यपूर्वेतील सर्व देशांबरोबर त्यांनी मोठा सलोखा निर्माण केला आहे. मग ते संयुक्त अरब अमिरात असो, सौदी अरब, इराण, कतार वा इस्रायल; सगळे भारताचे मित्र आहेत.
संयुक्त अरब अमिरातीने तर स्वामी नारायण मंदिर उभारण्याची परवानगी दिली. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीत संरक्षण, अवकाश आणि विशेष गुंतवणुकीबद्दल सहमत झाले. अमिरात भारताला वार्षिक ५ लाख मेट्रिक टन द्रवरूप नैसर्गिक वायू पुरवणार आहे. भारताला हा वायू पुरवणारा तो दुसरा सर्वात मोठा देश झाला आहे.
हे सगळे मुद्दे तसे वरवरचे. या भेटीत कोणत्या विषयांवर सखोल चर्चा झाली असेल? सुरक्षिततेची काळजी घेऊनसुद्धा जो सांगता येणार नाही असा एखादा संदेश घेऊन नाहयान आले होते काय? की दोन्ही नेत्यांनी एकमेकांसमोर बोलणे उचित ठरावे असा एखादा विषय त्यांच्यात होता? ट्रम्प यांचे 'शांतता मंडळ' हा विषय होता का?
ट्रम्प यांनी हे मंडळ जगात शांतता निर्माण करण्यासाठी स्थापन केले आहे. पहिला प्रकल्प गाझा पट्टीचा विकास हा आहे. ६० देशांना त्यात सामील होण्याचे निमंत्रण दिले गेले, ज्यात भारताचाही समावेश आहे. या मंडळाच्या स्थायी सदस्यतेसाठी एक अब्ज डॉलर द्यावे लागतील. चीन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन आणि इतर अनेक देश या मंडळाच्या स्वाक्षरी समारंभात सामील झाले नव्हते. त्याला बहिष्कार असेच संबोधले जात आहे.
जर्मनी, इटली, रशिया आणि तुर्कस्तानसारख्या देशांसोबत भारतानेही मौन पाळले आहे. परंतु, संयुक्त अरब अमिरातीने निमंत्रण स्वीकारले; तर मग दोन नेत्यांच्या बोलण्यात हा विषय होता का? की एखादा संदेश घेऊन ते आले होते? मध्यपूर्वेतील कोणत्याही राजनैतिक घडामोडीचा थेट परिणाम भारतावर होत असल्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा. भारत इस्रायलशी चांगले संबंध ठेवतो आणि दोन्ही देशांमधील व्यापार सातत्याने वाढतो आहे. दुसरीकडे भारताने पॅलेस्टाइनचेही समर्थन केले आहे. भारत शांतता मंडळात सामील व्हावा असे ट्रम्प यांना नक्कीच वाटत असणार. पण संयुक्त राष्ट्रसंघ असताना मुळात ट्रम्प यांच्या या 'बोर्ड ऑफ पीस'ची मुळात गरजच काय?
संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती आणि भारताच्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या चर्चेत मध्यपूर्वेतील इतर विषयही आले असतील का? सौदी अरब आणि पाकिस्तानमध्ये 'धोरणात्मक परस्पर संरक्षण करार' झालेला आहे. एकावर हल्ला झाला तर तो दुसऱ्यावरही मानला जाईल असा त्याचा अर्थ. या आघाडीत तुर्कस्तानही सामील होणार आहे. इजिप्त आणि सोमालियाही सामील होण्यासाठी उतावीळ असल्याची बातमी आहे.
इकडे सौदी अरेबिया आणि अमिरातीत येमेन, सोमालीलँड आणि सुदानमधील संघर्षामुळे तणावाची स्थिती आहे. सौदी अरेबियाची स्थिती मजबूत व्हावी असे अमिरातीला कधीच वाटणार नाही. सौदीबरोबर जर काही संघर्ष उद्भवला तर त्याला कोण साथ देईल? अमेरिका कोणाच्याही बाजूने खुलेपणाने उभी राहणार नाही म्हणून अमिरातीने भारताकडे पाहणे आश्चर्याचे नाही.
इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि भारतातील संरक्षण कराराची चर्चा जोर धरते आहे. या विषयावरही बोलणे झाले असेल काय? हा प्रश्न उचित ठरतो आणि चर्चेत इराणचाही मुद्दा होता का? - परंतु, तूर्त प्रतीक्षा करा. काळ सर्व प्रश्नांची उत्तरे जरूर देत असतो.
Web Summary : UAE President's brief India visit sparks speculation beyond signed agreements. Discussions likely covered Middle East dynamics, including the Trump peace initiative and strategic alliances, impacting India's regional role and security concerns. Awaiting answers in time.
Web Summary : यूएई के राष्ट्रपति की संक्षिप्त भारत यात्रा हस्ताक्षरित समझौतों से परे अटकलों को जन्म देती है। चर्चाओं में मध्य पूर्व की गतिशीलता, ट्रम्प शांति पहल और रणनीतिक गठजोड़ शामिल थे, जो भारत की क्षेत्रीय भूमिका को प्रभावित करते हैं। समय आने पर जवाब मिलेंगे।