मुलगा आणि बाप.. दोन जीव गेले, ते काय केवळ ‘मोबाइल’मुळे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 08:58 IST2025-01-13T08:58:31+5:302025-01-13T08:58:45+5:30

कर्जबाजारी बाप आणि मोबाइल घेता येत नाही म्हणून हिरमुसलेला पोरगा, या दोघांच्या आत्महत्येची कहाणी सोपी नाही! त्या वाटेवर आत्मवंचनेचे निखारे पुरलेले आहेत!

Son and father.. two lives lost, was it just because of a 'mobile'? | मुलगा आणि बाप.. दोन जीव गेले, ते काय केवळ ‘मोबाइल’मुळे?

मुलगा आणि बाप.. दोन जीव गेले, ते काय केवळ ‘मोबाइल’मुळे?

- हेरंब कुलकर्णी
(शैक्षणिक कार्यकर्ते, अभ्यासक)

नांदेड जिल्ह्यातील बाप-लेकाच्या आत्महत्येची बातमी अस्वस्थ करणारी आहे. कर्जबाजारीपणा, तसेच सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या मिनकी येथील शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र पैलवार यांच्याकडे दोन एकर जमीन. चार लाख ५० हजारांचे कर्ज, आणखी खाजगी कर्ज आणि उसनवारी. वरून सततची नापिकी. उदगीर येथे शिक्षणास असलेला त्यांचा मुलगा ओमकार  संक्रांतीनिमित्त गावाकडे आला. त्याने वडिलांकडे नवीन कपडे व शालेय साहित्य, तसेच नवीन मोबाइल मागितला; वडिलांनी त्याला ‘थोडे दिवस थांब, नंतर घेऊन देतो’, असे सांगितले.

वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने  रात्रीच्या वेळेस शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील सकाळी शोधाशोध करत शेताकडे गेले तेव्हा फासाला लटकलेला मुलगाच त्यांना दिसला. ते पाहताच वडिलांनीसुद्धा त्याच दोरखंडाने, त्याच झाडाला गळफास घेतला. वडील व मुलगा एकाच झाडाला, एकाच दोराने गळफास घेऊन गेले....

मोबाइलसाठी पाहा हल्लीची मुले किती आततायी झाली आहेत, इतका सोपा अर्थ काढून समाजाला या अस्वस्थतेतून सुटका करून घेता येणार नाही. मुलगा कपडे, वह्या पुस्तके आणि अभ्यासासाठी मोबाइल मागत होता. अनेकांना वाटेल, सगळे मिळून चार-पाच हजार फार तर लागले असते; पण नातेवाइकात उसनवारी करून थकलेला कर्जबाजारी बाप इतक्या छोट्या गावात पुन्हा कोणाकडे पैसे उसने मागणार होता? ‘शेतात असलेली तूर विकून मग तुला पैसे देतो’ ही त्या बापाची अगतिकता होती.

मुलगा मुलाच्या जागी बरोबर होता. शहरात शिकायला गेल्यावर बरे कपडे हवे, अभ्यासाची किमान साधने हवीत. ती नसल्याने  आत्मसन्मान दुखावणारा कमीपणा सतत अवमानित करत असणार...इतर मुलांशी तुलना होत असणार... आणि दुसरीकडे बापाचे मन! आपण शिकलो नाही, किमान मुले तरी शिकून या दुष्टचक्रातून बाहेर पडावीत म्हणून ज्या लेकराला शिकायला पाठवले त्याच्या किमान गरजा आपण पूर्ण करू शकत नाही, याचा जाळ त्या बापाच्या मनाला किती जाळत असेल? 

शेतकरी आत्महत्यांची टिंगल करणाऱ्यांनी ही एकच आत्महत्या अभ्यासावी म्हणजे शेतकरी कुटुंब कोणत्या ताणातून जात असते हे समजेल...’बायकोशी भांडण झाले म्हणून शेतकरी आत्महत्या करतो आणि त्याला लोक ‘शेतकरी आत्महत्या’ म्हणतात’ अशी खिल्ली अनेक जण उडवतात. मागे एकदा बीड जिल्ह्यात १५ ऑगस्टला गणवेश नाही म्हणून रडणाण‌ाऱ्या मुलाचा आक्रोश न बघवल्याने शेतकरी बापाने आत्महत्या केली. तेव्हा, ‘इतके क्षुल्लक कारण आत्महत्येला असते का?’ असे प्रश्न काही जणांनी विचारले होते!

- पण तोच तर खरा मुद्दा आहे. इतकी छोटी गोष्ट आपण आपल्या लेकराला देऊ शकत नाही, बायकोला धड साडी घेऊ शकत नाही.. यातून अगोदरच स्वत:च्या मनातून उतरलेली आत्मप्रतिमा मलिन होत गेली की व्याकूळ मनाला जगणेच निरर्थक वाटू लागते.. ही अगतिकता समाजाने  समजावून घ्यायला हवी! एकदा एक शेतकरी म्हणाला होता, सण येऊच नये असे वाटते, कारण इतर दिवस कसेही निघून जातात; पण सणाच्या दिवशी गोडधोड करता येत नाही, नवे कपडे घेता येत नाहीत, यातून अधिक अपराधी वाटत राहते...शेतकऱ्यांचे हे भावविश्व आपला समाज समजू तरी शकतो का...?

दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येचा प्रश्नच आजच्या मनोरंजनप्रधान समाजातून दूर ढकलला गेला आहे. एकट्या पडलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यायला शेतकरी संघटना उरल्या नाहीत आणि शासन आकड्यांचे खेळ करण्यात मग्न आहे. अशा कोंडीत शेतकरी जगणे आणि मरणे सापडले आहे. एकीकडे करोडो रुपये खर्च करून होणारी लग्ने, विमानतळावर होणारी गर्दी, ओसंडून वाहणारे मॉल्स, करोडो रुपयांचे महामार्ग बांधकाम, मेट्रो, आयटी क्षेत्राची वाढ आणि दुसरीकडे त्याच तंत्रज्ञानाचा मोबाइल मिळत नाही म्हणून एकाच दोरीला लटकणारा बाप आणि मुलगा... या आत्महत्या कशा समजून घ्यायच्या...? अशावेळी खचून जायला होते, इतकेच!

Web Title: Son and father.. two lives lost, was it just because of a 'mobile'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी