‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 05:28 AM2021-05-25T05:28:49+5:302021-05-25T05:29:45+5:30

‘सॅक्रेड गेम्स’मधल्या गणेश गायतोंडेचा हा डायलॉग खरा ठरू लागेल की काय, अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती सध्या भोवती तयार झाली आहे.

‘Sometimes it seems Apunich is God’ | ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’

‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’

Next

- विनय उपासनी
(मुख्य उपसंपादक,  लोकमत, मुंबई)

बातमी क्रमांक १- गाईच्या शेणाचं लेपन केल्यास कोरोना आपल्या आसपासही भटकू शकत नाही, असं व्हॉट्सॲप विद्यापीठावर व्हायरल होताच गुजरातमध्ये लोकांनी गोशाळेसमोर रांगा लावल्या. अनेकांनी अंगाला शेण लावून ते वाळल्यावर दुधा-ताकाने अंघोळ केली...
बातमी क्रमांक २- केंद्र आणि राज्यातही सत्तेत असलेल्या भाजपच्या मध्य प्रदेशातील भोपाळ येथील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गोमूत्र अर्काच्या प्राशनाने कोरोनाची बाधा होत नाही, असे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली... 
बातमी क्रमांक ३- उत्तर प्रदेशातील एका आमदाराने यू-ट्यूबवर व्हिडिओ जारी करत गोमूत्र प्राशनामुळे आपल्याला कसा अद्याप कोरोना झाला नाही, हे स्पष्ट केले...
वरील तीनही बातम्या आपली वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, हे स्पष्ट करण्यासाठी पुरेशा आहेत. शेण, गोमूत्र, स्वमूत्र इत्यादी आरोग्यास उत्तम. अमका नेता नरश्रेष्ठ, देवाचा अवतार या व अशा मुक्ताफळांनी लोकांचे चार घटका मनोरंजन होणार असेल तर ते एरवीच्या वेळी ठीक आणि क्षम्य तसेच दुर्लक्ष करण्याजोगेही. परंतु आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे, याचे काहीही भान आपल्याला नाही हे दर्शविण्याची चढाओढ या वाचाळवीरांमध्ये लागली असेल तर त्याची दखल घेणे क्रमप्राप्त असायला हवे. 
विद्यमान सत्ताधाऱ्यांचे जे काही चालले आहे ते चुकीचे आहे, त्यांची दिशा चुकत आहे असे सांगणाऱ्या तज्ज्ञांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जमील या नावाची त्यात नुकतीच भर पडली. देशात कोरोनाचा कहर सुरू असताना विषाणूतज्ज्ञाने राजीनामा देणे हे कितपत भूषणावह आहे, ही गांभीर्याने विचार करण्यासारखी बाब आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात जराही आवाज उठवला, त्यांच्या धोरणांवर टीका केली की सरकारातील धुरिणांआधी त्यांच्या भक्तांची मांदियाळीच आधी अंगावर येते, हे आता सर्वज्ञात झाले आहे. अशा परिस्थितीत देशात जेव्हा कोरोना नावाचा विषाणू थैमान घालण्यास सज्ज झाला होता तेव्हा पहिल्या लाटेला थोपवत कोरोनावर विजय मिळविण्याचा दावा करत जागतिक मंचावर स्वतःची पाठ थोपटून घेण्यात सत्ताधारी मश्गुल होते. 
खरे तर तेव्हाच देशातील तज्ज्ञांना दुसऱ्या लाटेचा अंदाज आला होता आणि तसे इशारे देऊन सरकारला सतर्क करण्याचा प्रयत्नही केला जात होता. परंतु नेमका त्याचवेळी पाच राज्यांच्या निवडणुका आणि कुंभमेळा यांच्या आयोजनाचा घाट घातला गेला. अशावेळी वैज्ञानिक, शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्याकडे काणाडोळा करणेच अ-वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित होते. झालेही तसेच. आणि त्याची फळे आता देशाला भोगावी लागत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. जमील यांनी पदाचा राजीनामा दिला, हे त्यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर योग्य असेल; परंतु देशासाठी ते अयोग्यच. कोरोना लाटेला थोपविण्याच्या प्रयत्नांबाबत सरकार उदासीन आहे, हे विशद करणारा न्यू यॉर्क टाइम्समध्ये लिहिलेला लेख डॉ. जमील यांच्या राजीनाम्यासाठी कारणीभूत ठरला. राजीनाम्याचे कारण देण्यास आपण कोणास बांधील नाही, असे डॉ. जमील यांनी सांगितले असले तरी काय कारणे असू शकतील, हे सुज्ञास न सांगताही कळू शकेल. 
सरकारच्या धोरणांना कंटाळून राजीनामा देणारे डॉ. जमील पहिलेच नव्हेत. ही सुरुवात झाली रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांच्यापासून. त्यांच्यानंतर डॉ. ऊर्जित पटेल यांनीही तीच वाट चोखाळली. अलीकडेच प्रताप भानू मेहता यांनीही अशोक विद्यापीठाचा राजीनामा दिला. बुद्धिजीवींना असा पदत्याग करण्यास भाग पाडण्याची परंपरा कुठेतरी खंडित होणे गरजेचे आहे. अन्यथा, आपल्या प्रत्येकाची स्थिती ‘सॅक्रेड गेम्स’मधील गणेश गायतोंडेसारखी होईल. तसे झाले तर प्रत्येकाला आपणच देव आहोत, असा आत्मविश्वास वाटू लागेल.

Web Title: ‘Sometimes it seems Apunich is God’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.