हार्टच्या डॉक्टरांना का छळतोय कॅन्सर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 09:06 IST2025-03-09T09:06:13+5:302025-03-09T09:06:48+5:30

व्यावसायिक कारणामुळे हृदयरोग तज्ज्ञांना होणारे आजार, या विषयावर अमेरिकेत शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात निरीक्षणे मांडण्यात आली आहेत...

Some cardiologists in Maharashtra have been diagnosed with cancer | हार्टच्या डॉक्टरांना का छळतोय कॅन्सर?

हार्टच्या डॉक्टरांना का छळतोय कॅन्सर?

डॉ. अजय चौरसिया
हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील काही हृदयरोग तज्ज्ञांना कॅन्सर झाल्याचे आढळून आले आहे. हा कॅन्सर होण्याची वेगवेगळी कारणे असली तरी हृदयरोग तज्ज्ञ ज्या कॅथलॅबमध्ये अनेक वर्ष काम करीत आहे तोच त्यांच्या कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचे प्रकर्षाने आढळून आले आहे. कॅथलॅब म्हणजे ज्या ठिकणी हृदयरोग असलेल्या रुग्णांवर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केली जाते ते ठिकाण. त्या ठिकाणी असणाऱ्या यंत्रामधून कमी प्रमाणात निर्माण होणारे रेडिएशन हे कर्करोगामागील कारण असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण कमी असले तरी अनेक वर्षे हृदयरोग तज्ज्ञ त्या कॅथलॅबमध्ये काम करीत असतात. त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होत असतो. कार्डिओलॉजिस्टसोबत इंटरव्हेशनल रेडिओलॉजिस्ट यांनाही या आजाराचा धोका असतो. रुग्णावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी ज्या कॅथलॅबमध्ये केली जाते. त्या ठिकाणी जी अत्याधुनिक यंत्रसामग्री असते त्यात विशेषतः फ्लोरोस्कोपी आणि कॉम्प्युटेड टोमोग्राफ़ी (सीटी) स्कॅनचा वापर केला जातो. त्यामधून रेडिएशन बाहेर पडत असते. या यंत्रसामग्रीचा रुग्णाच्या उपचारांत मुख्य भूमिका असते. अनेक वर्षांपासून कमी प्रमाणात निर्माण होणाऱ्या रेडिएशनच्या एकत्रित परिणाम म्हणून कॅन्सर होत असल्याचे दिसून येत आहे.

यामध्येही मेंदूचा कॅन्सर होत असल्याचे सांगण्यात आले आहे. व्यावसायिक कारणामुळे हृदयरोग तज्ज्ञांना होणारे आजार या विषयावर अमेरिकेत शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच २०२० मध्ये जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये हृदयरोग तज्ज्ञांमध्ये मेंदूच्या कॅन्सरचा धोका या विषयावर पेपर प्रसिद्ध करण्यात आला आहे, तर २०२१ मध्ये युरोपियन हार्ट जर्नलमध्ये, कार्डिओलॉजिस्टमध्ये मेंदूच्या कॅन्सरच्या घटनांचे पूर्वलक्षी विश्लेषण हा विषय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या सर्वच संशोधन निबंधात कॅथलॅबमध्ये निर्माण होणारे रेडिएशन आणि हृदयरोग तज्ज्ञांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. त्यामध्येही कॅन्सर या आजारात बोलले गेले आहे. डाव्या बाजूच्या मेंदूतर याचा अधिक परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांनी यासाठी कॅथलॅबमध्ये असतात त्यावेळी या रेडिएशनला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी लीड अॅप्रन, लीड कॅप आणि थायरॉईड कॉलर, गॉगल घातले पाहिजे. या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी कॅथलॅबमध्ये वावरत असताना परिधान करणे आत्यंतिक गरजेचे आहे. मात्र, किती कार्डिओलॉजिस्ट याचे पालन करतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

तसेच प्रत्येक कॅथलॅबमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला थर्मोल्युमिनेसेंट डोसीमीटर (टीएलडी) हे छोटे उपकरण दिले जाते. रेडिएशन मोजण्यासाठी वापरले जाणारे हे उपकरण आहे. संबंधित व्यक्तीने किती रेडिएशनचा सामना केला आहे, हे ठरविले जाते. ठरावीक महिन्यांनी त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. या सर्व गोष्टींवर देखरेख करण्यासाठी रुग्णालयात रेडिएशन सेफ्टी ऑफिसर याची नेमणूक केलेली असते. या उपकरणाद्वारे कोणत्या कर्मचाऱ्याला किती रेडिएशन एक्सपोजर किती प्रमाणात झाले याची माहिती मिळते.

हृदयरोग तज्ज्ञांनी याकरिता स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे आता नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामध्ये कॅथलॅब विशिष्ट प्रकारचे यंत्र लावले तर त्या यंत्राद्वारे कॅथलॅबमध्ये निर्माण होणारे रेडिएशन पूर्ण शोधून घेतली जाते. कोणताही त्रास कॅथलॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होत नाही असा दावा संबंधित कंपनीने केला आहे. मात्र, त्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहेत. त्यामुळे किती रुग्णालये हे तंत्रज्ञान विकत घेतील हे आताच सांगणे अवघड आहे.

Web Title: Some cardiologists in Maharashtra have been diagnosed with cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.