गळती लागलेल्या काँग्रेस कार्यकारिणीत इतके लोक?
By यदू जोशी | Updated: August 1, 2025 07:51 IST2025-08-01T07:50:21+5:302025-08-01T07:51:19+5:30
पक्षातले पद सोडता कार्यकर्त्यांना देण्यासारखे काँग्रेसकडे आहे तरी काय? म्हणून तर कच्च्या-पक्क्या चारएकशे लोकांची ‘कार्यकारिणी’ सपकाळांनी बांधलीय!

गळती लागलेल्या काँग्रेस कार्यकारिणीत इतके लोक?
यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत सांगलीचे मुन्नाभाई कुरणे यांना सरचिटणीस केले. ते स्वत:च म्हणत आहेत की ‘मी अजित पवार गटात आहे, काँग्रेसने माझी नियुक्ती कशी केली हे मलाच माहिती नाही.’ चारएकशे लोकांची कार्यकारिणी केली तर असे दोनचार अपघात होणारच. तसेही काँग्रेस आहे; एवढे तर माफ करूनच चालावे लागते.
अकोल्याचे अक्षय राऊत आहेत, तोडफोड भाषण देतात. काँग्रेसचे प्राथमिक सदस्यही नव्हते; पण थेट सचिव झाले. आमदार विकास ठाकरेंचा मुलगा थेट सरचिटणीस झाला. फास्टफूडचा जमाना आहे, सगळं लवकर लवकर पाहिजे. नेत्यांची मुलं, नातेवाइक यांना कार्यकारिणीत येण्यापासून हर्षवर्धन सपकाळ रोखू शकले नाहीत. नागपूरचे अभिजित सपकाळ सरचिटणीस झाले अन् काटोलमधून महाविकास आघाडीविरुद्ध बंड करून लढलेले त्यांचे भाचे याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार हेही सरचिटणीस झाले. मामा-भाच्याची जोडी सरचिटणीस होण्याची ही पहिलीच वेळ असेल. पण जिचकार साहेबांचा मुलगा सालस अन् गुणी आहे, फ्युचर लीडर होऊ शकतो. कार्यकारिणीत महिलांवर अन्याय झाला. केवळ १२ टक्के महिला आहेत. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना ते महिलांना विशेष स्थान द्यायचे, महिलांचा टक्का यापेक्षा बराच जास्त होता त्यांच्या कार्यकारिणीत. हर्षवर्धन सपकाळ यांना महिलांबाबत सहानुभूती नसावी.
निष्ठेने पक्षाचे काम करणारेच कार्यकारिणीत असावेत असे सपकाळ यांना फार वाटत होते; पण त्यांचे फारसे काही चाललेले दिसत नाही. आजी-माजी आमदार, मंत्र्यांची मुलेमुली यांची वर्णी लागली. ‘चारएकशे लोकांची कार्यकारिणी केल्याने एक अडचण दूर झाली, मेळाव्यासाठी हॉल भरण्याची चिंता मिटली’, असे लोक गमतीने बोलत आहेत. जम्बो कार्यकारिणीतले ७५ टक्के लोक हे व्हिजिटिंग कार्ड अन् लेटरहेडवर रस्ते, नाल्याच्या भ्रष्टाचाराची तक्रार करणारेच आहेत हे लवकरच हर्षवर्धन सपकाळ यांच्या लक्षात येईल.
काँग्रेसला कधी नव्हे एवढी गळती सध्या लागलेली आहे. दरदिवशी कोणी ना कोणी पक्ष सोडून जात आहे. पक्ष सोडणाऱ्यांना भाजप, शिंदेसेना अन् अजित पवार गट हे तीन पर्याय आहेत. आज काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना देऊ तरी काय शकते? देण्यासाठी फक्त पक्षातली पदे आहेत हा विचार करून कार्यकारिणी जम्बो केलेली दिसते. काँग्रेसचे बरेचसे नेतेच आज पदांशिवाय आहेत, अशावेळी आपल्या मुलांना निदान कार्यकारिणीचे पद मिळावे या त्यांच्या अट्टाहासापायी कार्यकारिणी जम्बो झाली आहे. त्यांच्याच घरात मतदान झाले, तरी हरतील असेही काही चेहरे या कार्यकारिणीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी गळती रोखण्याचाही हेतू दिसतो. पूर्वी काँग्रेस दुभती गाय होती, सगळ्यांनी दूध पिऊनही ते उरायचे. आता तसे नाही. आत्ता आपली गाय भाकड तर भाकड, पुढे मागे होईल काहीतरी चांगले, या आशेवर आणि पक्षाशी निष्ठा ठेवून काही कार्यकर्ते काम करत राहिले. असे बरेच कार्यकर्तेही कार्यकारिणीत आहेत, सगळाच अंधार आहे असे मानण्याचे कारण नाही.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत सहभागी झालेल्या नऊ जणांना या कार्यकारिणीत सन्मानाने पदाधिकारी केले आहे. ४० टक्के ओबीसी चेहरे आहेत, खुल्या प्रवर्गाचे २५ टक्के चेहरे आहेत. कार्यकारिणीचे पूर्वीचे सरासरी वय ५८ ते ६० वर्षे असायचे, ते आता ५१ वर्षे आहे.
कार्यकारिणी तुलनेने तरुण झाली आहे. ६५ टक्के नवीन आले, भाजपमध्ये एकाचवेळी तीन-तीन पिढ्यांचे लोक काम करताना दिसतात, काँग्रेस एकाच पिढीच्या पुढे जायला तयार नव्हती, सपकाळ यांनी ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे, ते नवीन पिढी तयार करत आहेत. विभागीय आणि जिल्हा संतुलन मात्र बिघडलेले दिसते. आधी मुख्य प्रवक्ते, प्रवक्ते अशी रचना होती, आता मुख्य प्रवक्तेपदच ठेवले नाही, आंबे-चिंचोके सगळे एकाच रांगेत आणले. विरोधी पक्षांचा माध्यमांमधील चेहरा आज संजय राऊत, रोहित पवार आहेत. काँग्रेसकडून कोणीच नाही.
‘कार्यकारिणीत लोक घेताना काही व्यवहार झाले, चेहरे पाहून लोकांना पदे दिली’ असा आधी होणारा आरोप सपकाळ यांच्यावर होऊ शकत नाही. कोणाला विरोध करायचा नाही, सगळ्यांना सांभाळून पुढे जायचे, इगो वगैरे येऊ द्यायचा नाही असा विश्वात्मक विचार केला की मग कार्यकारिणी जम्बो होणारच. एकेका नेत्याची चारसहा माणसे घ्यायची म्हटली तरी आकडा वाढूनच जातो. त्यात सपकाळ पडले बिचारे सोशिक... पण आंधळ्याच्या गाई देव राखतो.
आज ते बिचारे वाटतात, उद्या काँग्रेसचे चांगले दिवस आले तर ते हीरो असतील. राजकारण बदलायला वेळ लागत नाही. कोणी अमरपट्टा घेऊन आलेले नसते. काँग्रेसचे राज्यातील काही नेते सपकाळ यांची खासगीत खिल्ली उडवतात. ते घराणेशाहीच्या राजकारणातून आलेले नाहीत, कोट्यधीश नाहीत, संस्थानिकही नाहीत. पण हेही तेवढेच खरे की सकाळी जोरदार बाइट द्यायचा अन् दुपारी मुख्यमंत्र्यांकडून फाइल क्लीअर करून आणायची असेही ते करत नाहीत. कच्चे-पक्के अशा दोन्हींची मोट बांधून सपकाळ निघाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश खेचून आणले, तरच ते महाराष्ट्राचे नेते ठरतील. काँग्रेसचे प्रस्थापित नेते अजूनही त्यांना सहकार्य करण्याच्या मूडमध्ये नाहीत. दिल्लीही सपकाळ यांना हवी तशी ताकद देताना दिसत नाही.
yadu.joshi@lokmat.com