संरक्षणातील साप; ‘हनी ट्रॅप’ म्हणजे काय? किती धोकादायक? जाणून घ्या

By विवेक भुसे | Published: May 14, 2023 11:57 AM2023-05-14T11:57:11+5:302023-05-14T11:58:55+5:30

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात, डीआरडीओच्या पुणे शाखेचा संचालक शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केल्याने संपूर्ण भारतातील संरक्षण दलात एकच खळबळ माजली आहे. देशातील एवढ्या मोठ्या पदावरील शास्त्रज्ञ, संचालक कसा काय ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला, 6 महिन्यांहून अधिक काळ पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात असतानाही कोणाच्या कसे लक्षात आले नाही? त्यांनी संरक्षणाच्या दृष्टीने कोणती माहिती पुरविली, त्याचा आपल्या संरक्षण सिद्धतेवर काय परिणाम होऊ शकतो?, अशा अनेक बाबींचा ऊहापोह सध्या सुरू आहे.

Snake in the defense sector | संरक्षणातील साप; ‘हनी ट्रॅप’ म्हणजे काय? किती धोकादायक? जाणून घ्या

संरक्षणातील साप; ‘हनी ट्रॅप’ म्हणजे काय? किती धोकादायक? जाणून घ्या

googlenewsNext

विवेक भुसे, उपवृत्तसंपादक -

डॉ. प्रदीप कुरुलकर हे ४ जानेवारी १९८७ मध्ये डीआरडीओमध्ये रुजू झाले. डीआरडीओच्या पृथ्वी, आकाश यासारख्या क्षेपणास्त्र विकास, क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी उपकरणे, प्रगत रोबोटिक्स आणि लष्कर अनुप्रयोगांसाठी मोबाईल मानवरहित प्रणालींचे डिझाईन आणि विकास तसेच मिशन शक्तीसारख्या प्रकल्पात त्यांनी कार्य केले आहे. डीआरडीओच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सुरुवातीपासून ते यशस्वी होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात ते सहभागी होते. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पातील सर्व बारकावे त्यांना माहिती होते, असे नाही, तर अत्यंत संवेदनशील माहिती त्यांच्याकडे होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले होते, असा अधिकारी  जेव्हा शस्त्रू राष्ट्राच्या जाळ्यात अडकतो, तेव्हा ते प्रकरण आणखी गंभीर बनते.

पाकला संवेदनशील माहिती दिली?
पाकिस्तान कायमच भारतीय लष्करातील तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्यापेक्षा कुरूलकर हे अतिशय मोठे अधिकारी आणि अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नेतृत्व केलेले शास्त्रज्ञ असल्याने त्यांच्याकडून अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविली गेली असू शकते. 

प्रक्षेपकाच्या रचनेपासून विकासापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे या संबंधिचे डिझाईन, इतर बारीकसारीक माहिती, या प्रक्षेपकांचा टप्पा, अंतर, त्यातील बारकावे, अशी माहिती शत्रू राष्ट्रापर्यंत पोहोचणे मोठे धोकादायक असते.

अनेकदा अशा प्रक्षेपकांविषयी जुजबी माहिती समोर आणली जाते. कुरुलकरसारख्या शास्त्रज्ञांकडून ही माहिती बाहेर गेली तर, त्यातून पाकिस्तान त्यांची यंत्रणा विकसित करू शकते.

आता त्यांनी किती आणि कोणती माहिती हेरांना पुरविली, हे समोर आल्यानंतरच ती किती धोकादायक आहे, हे ठरू शकते. 
कुरुलकर सहा महिन्यांपासून हेरांच्या संपर्कात असल्याने त्यांच्याकडून बरीच गोपनीय माहिती शत्रू राष्ट्रापर्यंत पोहोचली असल्याची शक्यता आहे. 

कुरुलकर यांनी पुरविलेली माहिती संबंधित यंत्रणांना समजल्यानंतर या फुटलेल्या माहितीचा शत्रू राष्ट्र कसा वापर करू शकते, याचा विचार करून आपल्या संरक्षण सिद्धतेत बदल करावा लागणार आहे.

‘हनी ट्रॅप’ म्हणजे काय? किती धोकादायक? -
डॉ. प्रदीप कुरुलकर हे सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. स्मार्ट फोन, ई-मेल, व्हॉट्स-ॲपसारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे ते हेरांच्या संपर्कात होते.

परदेश प्रवासादरम्यान ते हेरांना भेटल्याची माहिती मिळते आहे. एटीएसने केवळ पोलिस कोठडी मिळविण्यासाठी आवश्यक तेवढीच जुजबी माहिती समोर आणली आहे. 

मात्र, प्रत्यक्षात एटीएस आणि रिसर्च ॲण्ड अनॉलिसिस विंग (रॉ) या गुप्तचर संस्थेकडे आणखी भरपूर माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच याचे गांभीर्य वाढले आहे.

१ - हेरगिरी आणि गोपनीय माहिती मिळविण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ हा पूर्वापार वापरला जाणारा मार्ग आहे. साधारणत: सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्तीशी ओळख निर्माण करून ती घट्ट करण्याचा प्रयत्न यात केला जातो. 

२ - बहुतेकदा यात एखाद्या रूपवान महिलेमार्फत संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांना जाळ्यात ओढले जाते. ते त्यांच्या जाळ्यात फसले की त्यांच्याकडून कळत नकळत माहिती काढून घेतली जाते. 

३ - माहिती काढून झाल्यावर आपले खरे रूप उघड करून त्यांना ब्लॅकमेल करून जबरदस्तीने माहिती काढून घेण्याचा प्रयत्न होतो.

४ - आपली बदनामी होऊ नये, म्हणून अनेकदा यात अडकलेले अधिकारी, कर्मचारी माहिती देत राहतात. असे आजवरच्या प्रकरणातून समोर आले आहे.

५ - सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या हनी ट्रॅपचे अनेक प्रकार होत असल्याचे उघड होत आहे. अशा अनेक प्रकरणांत काहीजणांना शिक्षाही झालेल्या आहेत. 

Web Title: Snake in the defense sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.