शिवसेना खिंडीत..
By Admin | Updated: August 8, 2014 10:45 IST2014-08-08T10:45:21+5:302014-08-08T10:45:35+5:30
विधानसभेच्या १४४ जागांचा हेका एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसनेच चालवला आहे आणि त्यासाठी काँग्रेस आघाडीला धारेवर धरले आहे, असे नाही.

शिवसेना खिंडीत..
>विधानसभेच्या १४४ जागांचा हेका एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसनेच चालवला आहे आणि त्यासाठी काँग्रेस आघाडीला धारेवर धरले आहे, असे नाही. तसा हट्ट भाजपानेही धरून शिवसेनेला थेट गॅसवर ठेवले आहे. भाजपाला ११४ जागांखेरीज एकही जागा जास्तीची देणार नाही आणि मुख्यमंत्रिपदावरचा आपला हक्क तर सोडणारच नाही, हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट आहे. जोपर्यंत भाजपा दिल्लीत विरोधात बसायचा तोवर त्याने ठाकरेंचे लाड चालवून घेतले. ‘तुम्ही मोठे, तुमचा पक्ष मोठा आणि राज्यात तुम्हीच सर्वश्रेष्ठ’ अशी त्याची तेव्हाची कविता होती. बाळासाहेब गेले तेव्हा तिच्यात पहिला बदल झाला, त्यात दिल्लीत मोदींचे सरकार आले आणि त्याने ती कविताच टाकली. शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद दिले, तेदेखील अगदीच अदखलपात्र, तेही तिचे १८ खासदार निवडून आल्यानंतर. सेनेने पहिला जोर लावून पाहिला तो महत्त्वाचे मंत्रिपद मिळावे म्हणून. पण, त्या वेळी ‘घ्यायचे असेल तर हे घ्या नाहीतर निघा,’ असा सज्जड दमच मोदींनी भरला. खरेतर त्याच वेळी आपला उतरलेला भाव सेनेच्या लक्षात यायला हवा होता. पण झाकली मूठ म्हणत तेव्हा ती गप्प राहिली. पुढे काही झाले तरी आम्ही पूर्वीप्रमाणे विधानसभेच्या १६४ जागांवर लढणार, असे सेनेने एकतर्फीच जाहीर करून टाकले. भाजपाने त्यावर तत्काळ प्रतिक्रिया दिली नाही. पण ‘लोकसभेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढविली व जिंकली. तुमच्या जागाही आमच्यामुळेच आल्या’ हे तिला आडून ऐकवायला त्या पक्षाने कमी केले नाही. सेनेने त्यातूनही कोणता धडा घेतला नाही. आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘उद्धव ठाकरे हे उद्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री’ अशी हाळी देऊन सेनेने भाजपाला आव्हानच देऊन टाकले. त्यावर भाजपाचे मराठी नेते गप्प राहिले. पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह तसे राहिले नाहीत. त्यांनी राज्यातील आपल्या पक्ष संघटनेला आक्रमक होण्याचा सल्ला दिला. परिणामी, प्रथम ११४वर थांबणार नाही, आमचे बळ पाहून लढू, अशी भाषा त्या पक्षाने सुरू केली व पुढे जाऊन मुख्यमंत्रिपद आमचेच, असेही सेनेला सांगून टाकले. भाजपाचे आक्रमक होणे सेनेला नवे व न पचणारे आहे, पण तिच्यासमोर पर्याय नाही. तिला युती तोडता येत नाही, कारण भाजपाचा म्हणजे हिंदुत्वाचा आधार सुटला की ती एकदम हवेतच तरंगू लागते. स्वबळावर निवडणूक लढविण्याएवढे बळ तिच्यात नाही. दुसरीकडे तिला भेडसावणारे प्रकरण राज ठाकरे व त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आहे. राज ठाकरेंची मोदींशी गट्टी आहे आणि नितीन गडकरींशीही त्यांचे सख्य आहे. त्यातून मैत्री, स्नेह व संवेदनशीलता यात उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना डावे ठरावेत, असे आहेत. आपण फार खळखळ केली, तर मोदी आपल्याला सोडतील आणि राजला धरतील, असे भय उद्धवच्या मनात आहे. तसे झाले तर सेनाच दुभंगेल आणि तिचा मोठा तुकडा राज ठाकरेकडे जाईल. प्रसंगी सेनेचा एक मोठा वर्ग भाजपामध्येही सामील होईल. राजच्या महत्त्वाकांक्षा मोठय़ा असल्या, तरी त्यांना वास्तव माहीत आहे. मोदी व भाजपा यांची देशात व राज्यात वाढलेली ताकद त्यांना समजते. त्यामुळे त्यांची भाजपाशी मैत्री झालीच, तर ती जमिनीवरची असेल व तशीच ती होण्याची शक्यता मोठी आहे. हा संभाव्य घटनाक्रम शिवसेनेची धडधड वाढविणारा व प्रसंगी ती संपविणाराही ठरू शकतो. भाजपासोबत नाही आणि हिंदुत्व हातचे सुटले आहे, ही स्थिती तिला फार काळ तारू शकणारी नाही. आता बाळासाहेब नाहीत आणि राज ठाकरे तिला पाण्यात पाहत आहेत. शिवसेनेचे ठिकठिकाणचे कार्यकर्ते आजच काहीसे डळमळीत असून, त्यातले अनेक जण भाजपाच्या वाटेवरही आहेत. या स्थितीत सेनेच्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या महायुतीचे काय होईल, हाही भेडसावणारा प्रश्न आहे. रामदास आठवलेंचा रिपब्लिकन गट, शेट्टींचा स्वाभिमानी गट आणि जानकरादिकांचे बारीकसारीक वर्ग त्या स्थितीत कुठे जातील वा राहतील, याचा अदमास जाणकारांना घेता येणारा आहे. एकाकी सेना हतबल असेल आणि तिचे बळही संपुष्टात आले असेल. त्याचमुळे तिच्या मुखपत्राने नरेंद्र मोदींवर चालविलेला मारा कशासाठी आहे, हेच कळायला मार्ग नाही. तो मोदींनी अद्याप गंभीरपणे घेतला नाही व कदाचित ते तो तसा घेणारही नाहीत. जोवर मोदींचे त्याकडे दुर्लक्ष आहे तोवर सेनेच्या या गमजा चालणार आहेत. एकदा का मोदींनी त्यांच्यावरील हा मारा गंभीरपणे घेतला, तर मात्र सेनेच्या वाट्याला येणारे एकाकीपण दयनीय राहणार आहे.