शेख हसिना यांनी खरंच कमाल केली!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:49 AM2019-01-07T06:49:40+5:302019-01-07T06:50:18+5:30

गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२४ मध्ये बांगलादेशाला अविकसित देशांंच्या श्रेणीतून काढून विकसनशील देशांच्या श्रेणीत घेण्याचे सूतोवाच केले

Sheikh Hasina really did the best! | शेख हसिना यांनी खरंच कमाल केली!

शेख हसिना यांनी खरंच कमाल केली!

googlenewsNext

विजय दर्डा

गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२४ मध्ये बांगलादेशाला अविकसित देशांंच्या श्रेणीतून काढून विकसनशील देशांच्या श्रेणीत घेण्याचे सूतोवाच केले, तेव्हा संपूर्ण जगात शेख हसिना यांची चर्चा होऊ लागली. त्याच वेळी बांगलादेशात संसदीय निवडणूक झाली व शेख हसिना यांचा अवामी लीग पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झाला. सत्ता शेख हसिना यांच्याकडेच कायम राहिली. त्या २००९ पासून सत्तेवर असून, या महिन्यात त्या बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून चौथ्यांना पदभार स्वीकारतील.

ताज्या निवडणुकीत मोठे गैरप्रकार केल्याचे अनेक आरोपही शेख हसिना यांच्यावर झाले. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी या प्रमुख विरोधी पक्षाने तर निवडणुकीचे संपूर्ण निकाल अमान्य करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. परंतु शेख हसिना या बांगलादेशच्या लोकप्रिय नेत्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे पिता शेख मुजीबुर्रेहमान यांच्यामुळेच बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र जन्माला आले. पूर्वी तो पूर्व पाकिस्तान होता. नंतर लष्कराने उठाव करून सत्ता काबिज केली व त्यात शेख मुजीबुर्रेहमान, त्यांच्या पत्नी व तीन मुलांची हत्या करण्यात आली. त्या हत्याकांडातून शेख हसिना बचावल्या होत्या. सुरुवातीला अनेक अडचणी येऊनही त्यांनी हार मानली नाही व त्या एक बलाढ्य नेत्या म्हणून उदयाला आल्या. १९८१ पासून शेख त्या अवामी लीगचे नेतृत्व करत आहेत.

कोणी कितीही टीका केली, तरी त्यांनी आपल्या देशाला वेगवान विकासाच्या मार्गावर आणले, हे नाकारता येणार नाही. त्या प्रथम सत्तेवर आल्यापासून बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर वर्षाला सहा टक्के राहिला आहे. त्यांच्या राजवटीत देशाचे दरडोई उत्पन्न तिपटीने वाढले आहे. सध्या दरडोई वार्षिक उत्पन्न १.२१ लाख रुपये आहे. अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत बांगलादेश आता जवळजवळ स्वयंपूर्ण झाला आहे. गरिबी झपाट्याने कमी होत आहे. तेथील कापड उद्योगाचा विकासदर सुमारे १५ टक्के आहे. तयार कपड्यांच्या उत्पादनात बांगलादेशचा जगात दुसरा क्रमांक लागतो. चीन पहिल्या स्थानावर आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेबाबतही बांगलादेशाने जोरदार झेप घेतली आहे. दक्षिण आशियात बँकेचे डिजिटल व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण सरासरी २८ टक्के आहे, पण बांगलादेशात मात्र हे प्रमाण ३४ टक्क्यांहून अधिक आहे.

एक विकासाभिमुख नेता म्हणूनच नव्हे, तर धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीतही शेख हसिना यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. एक काळ असा होता की, बांगलादेशात धार्मिक कट्टरपंथी जोरात होते व ‘इस्लामिक स्टेट’नेही बस्तान बसविण्यास तेथे सुरुवात केली होती. २०१६ मध्ये तेथील होली आर्टिझन बेकरीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर, शेख हसिना यांनी कट्टरपंथींना वठणीवर आणण्याचा विडा उचलला. तेव्हापासून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे व आणखी शेकडो तुरुंगात आहेत. शेख हसिना यांच्या दृढनिश्चयी धोरणांमुळेच हे शक्य झाले, हे निर्विवाद. आज बांगलादेशात सर्वच धर्माच्या लोकांना सुरक्षित वाटते. याबद्दल जगभर बांगलादेशाचे कौतुक होत आहे. दहशतवादविरोधी लढ्यात शेख हसिना यांनी संपूर्ण जगाच्या हातात हात मिळविला आहे.
मी बांगलादेशातील अनेक संपादकांशी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर चर्चा करत असतो. त्यांनी सांगितले की, खालिदा झिया यांच्यासह अनेक पंतप्रधानांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आले. त्या सर्वांनी देशातील पैसा बाहेर नेला आणि विकास मात्र केला नाही. शेख हसिना यांच्याकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत. मी त्यांना असेही विचारले की, बांगलादेश हे एक मुस्लीम राष्ट्र आहे, तरी तेथे महिला राज्य करतात. याचे कारण काय? यावर संपादकांचे उत्तर होते की, प्रश्न पुरुष किंवा महिलेचा नाही. कोणाकडे किती क्षमता आहे याचा आहे आणि शेख हसिना यांच्याकडे पंतप्रधान होण्यासाठी पुरेपूर क्षमता आहे.

भारताशी शेख हसिना यांचे जिव्हाळ्याचे भावनिक नाते आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामात त्यांच्या वडिलांपाठी भारत खंबीरपणे उभा राहिला होता, ते ऋण शेख हसिना विसरलेल्या नाहीत. त्या भारत समर्थक मानल्या जातात. परंतु गेल्या काही वर्षांत चीन बांगलादेशात घट्ट पाय रोवू पाहात आहे, ही भारताच्या दृष्टीने नक्कीच चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षी ढाका शेअर बाजाराचे २५ टक्के भागभांडवल खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले, तेव्हा भारताने खूप प्रयत्न करूनही चढी बोली लावून चीनने ते भागभांडवल विकत घेतले. मला असे वाटते की, भारताने त्या वेळी थोडे अधिक पैसे खर्च करून हा सौदा पदरी पाडून घ्यायला हवा होता. कारण बांगलादेश हा भारताचा सख्खा शेजारी आहे व तेथे आपण घट्ट पाय रोवायलाच हवेत.
आंतरराष्ट्रीय राजकारण केवळ भावनांवर चालत नाही. बांगलादेशला आपण स्वातंत्र्य मिळवून दिले, म्हणून तो कायम भारतालाच चिकटून राहील, अशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. हा शेजारी देश आपल्यापासून दूर जाऊ न देणे भारताच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्यासाठी बांगलादेशाला काय हवे, त्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. नेटाने प्रयत्न केले, तर हे काम कठीण नक्कीच नाही.


(लेखक लोकमत समुह आणि एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत)

Web Title: Sheikh Hasina really did the best!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.