‘ती’ गाझातून पळाली, तुर्कीयेत ‘निकाह’ केला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:39 IST2025-07-30T08:38:33+5:302025-07-30T08:39:47+5:30
याह्या सिनवार हा ‘हमास’चा सर्वांत खतरनाक नेता. त्याची बायको समर मोहम्मद अबू जमरही तितकीच फेमस होती.

‘ती’ गाझातून पळाली, तुर्कीयेत ‘निकाह’ केला!
याह्या सिनवार हा ‘हमास’चा सर्वांत खतरनाक नेता. त्याच्या नुसत्या नावानंही केवळ त्यांच्या संघटनेतच नाही, तर इतर लोकही थरथर कापत. कारण थंड डोक्याचा हा माणूस केव्हा काय करेल याचा काहीच नेम नव्हता. त्यामुळे इतर देशांमध्येही त्याचा धाक होता. अगदी तरुण वयापासूनच ताे अतिरेकी कारवायांमध्ये अग्रेसर होता. त्याच्या या धाकामुळे त्याची बायको समर मोहम्मद अबू जमरही तितकीच फेमस होती आणि तिच्या ‘शब्दा’लाही संघटनेत बरीच किंमत होती. तिलाही लोक चळाचळा कापत.
इस्रायलनं १९८२मध्ये पहिल्यांदा याह्या सिनवारला अटक केली त्यावेळी तो केवळ १९ वर्षांचा होता. त्याचे ‘कारनामे’ वाढल्यानंतर १९८५मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. १९८८ ते २०११पर्यंत सुमारे २२ वर्षं त्यानं इस्रायलच्या तुरुंगांत काढली. इतका काळ एकांतवासात काढल्यानंतर तो आणखीच ‘उग्र’ बनला.
गेल्या सुमारे दोन वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. त्याला कारण ठरला तोही याह्या सिनवारच. कारण ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर जो अतिरेकी हल्ला झाला, आणि ज्यात इस्रायलचे सुमारे १२०० नागरिक मारले गेले, त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड याह्या सिनवारच होता!
या घटनेमुळे जगभरात इस्रायलचं नाक अक्षरश: कापलं गेलं. त्यामुळे इस्रायलला याह्या सिनवार ‘जिंदा या मुर्दा’ कुठल्याही परिस्थितीत हवाच होता. नंतर एका ड्रोन हल्ल्यात इस्त्रायलनं सिनवारला टिपलंच आणि एका अर्थानं आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेतला.. पण सध्या याह्या सिनवारपेक्षाही त्याच्या पत्नीची समर मोहम्मद अबू जमरची जगभरात जास्त चर्चा सुरू आहे. याह्या सिनवार हयात असेपर्यंत त्याची इतकी दहशत होती की त्याच्या नजरेला नजर देण्याची आणि त्याच्या ‘शब्दा’बाहेर जाण्याची कोणाची टाप नव्हती. त्याची विधवा पत्नी समर आता गाझातून ‘गायब’ झाल्याची खबर आहे.
इस्रायली न्यूज चॅनल ‘यनेट’च्या माहितीनुसार नकली पासपोर्टच्या माध्यमातून आपल्या मुलांसह समर गाझातून बाहेर पडली. तिथून ती इजिप्तला गेली आणि तिथून तुर्कीयेला. एवढंच नाही, तुर्कीत गेल्यावर दुसऱ्या एकाशी तिनं निकाहदेखील केला. या घटनेमुळे ‘हमास’ आणि जनतेत मोठी खळबळ उडाली आहे. मुळात गाझातून सुरक्षितपणे बाहेर पडणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अनेक वरिष्ठ लोकांच्या वशिल्यासह पैसाही पाण्यासारखा वाहावा लागला असणार, असं तज्ज्ञांचं मत आहे. सर्वसामान्यांच्या कुवतीतली ही गोष्ट नाही.
हमासचा माजी प्रमुख याह्या सिनवार आणि समर यांचा २०११मध्ये निकाह झाला होता. गेल्यावर्षी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ६१व्या वर्षी इस्रायलनं एका ड्रोन हल्ल्यात त्याला ठार मारलं. हा क्रूरकर्मा मारला गेल्यानंतर वर्षभराच्या आत त्याच्या बायकोनं दुसरा निकाह करावा याचंच अनेकांना आश्चर्य वाटतं आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर आणि इस्त्रायलनं आपले हल्ले अधिक तीव्र केल्यानंतर हमासच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना गाझाबाहेर काढण्याचे प्रयत्न कधीचेच सुरू केले होते. त्यानुसार खोटी कागदपत्रे, नकली पासपोर्ट, लाचखोरी आणि शक्य त्या सर्व मार्गांनी अनेकांना गाझाच्या बाहेर काढण्यात आलं. त्यातच समरही होती. तिच्या नव्या लग्नानंतर तिच्यासमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा आता सुरू आहे.