शरबत गुला आता अफगाणिस्तानातून इटलीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 05:29 AM2021-11-29T05:29:55+5:302021-11-29T05:30:25+5:30

Sharbat Gula : साधारणतः १९८५ मधली घटना आहे. नॅशनल जिऑग्राफी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर  हिरव्याकंच डोळ्यांतून जणू आग ओकत असलेल्या एका तेजतर्रार तरुणीचे छायाचित्र प्रकाशित झाले. तीच ती शरबत गुला.

Sharbat Gula is now in Italy from Afghanistan! | शरबत गुला आता अफगाणिस्तानातून इटलीत!

शरबत गुला आता अफगाणिस्तानातून इटलीत!

Next

साधारणतः १९८५ मधली घटना आहे. नॅशनल जिऑग्राफी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर  हिरव्याकंच डोळ्यांतून जणू आग ओकत असलेल्या एका तेजतर्रार तरुणीचे छायाचित्र प्रकाशित झाले. तीच ती शरबत गुला. अफगाणिस्तानातील यादवी युद्धाचा बळी ठरलेल्या निष्पाप नागरिकांच्या वेदनेचा चेहरा म्हणून गुलाला रातोरात प्रसिद्धी मिळाली. तिच्या त्या फोटोची मोहिनी जगावर अशी काही पडली, की अफगाणिस्तानातील यादवीची वर्णने करणाऱ्या अनेक लेखांसोबत सातत्याने गुलाचे छायाचित्र प्रसिध्द होत राहिले. वयाच्या चाळिशीत आणि चार अपत्यांची माता असलेल्या गुलाने आता इटलीत मुक्काम हलवला आहे.

अफगाणिस्तानात यादवी युद्धाने जेव्हा टोक गाठले होते त्यावेळी हजारो अफगाणी नागरिकांनी अफगाण - पाकिस्तान सीमेवरील शरणार्थींच्या शिबिरात आश्रय घेतला होता. त्या गर्दीत हिरव्या डोळ्यांची शरबत गुला सहजपणे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असे. छायाचित्रकारांचा कॅमेरा तिकडे न वळला तरच नवल होते. स्टीव्ह मॅक्युरी या अमेरिकी छायाचित्रकाराने शरबतचा फोटो अचूक टिपला. हा फोटोजेनिक चेहरा आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच गाजेल, ही सूक्ष्मदृष्टी असलेल्या स्टीव्हने तातडीने शरबतचे फोटो जगभरात पाठवले. शरबतच्या या फोटोला नॅशनल जिऑग्राफी मासिकाने मुखपृष्ठावर यथोचित प्रसिद्धी दिली. मात्र, तोपर्यंत या हिरव्या डोळ्यांच्या मुलीची ओळख जगाला अनोळखीच होती. फक्त अफगाणी यादवी युद्धाचे प्रतीक दर्शवणारा बोलका चेहरा, एवढीच ओळख तिच्या फोटोला होती.

- अखेरीस शरबतची ओळख उघड झाली २००२ मध्ये. आपण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली हिरव्या डोळ्यांची ही मलिका - ए - हुस्न आहे तरी कोण, हा प्रश्न स्टीव्ह मॅक्युरीला पडला. त्याने तडक अफगाणिस्तान गाठले. तिथे शरबतचा ठिकाणा शोधता शोधता तो पाकिस्तानातील पेशावर शहरात पोहोचला. तिथेच त्याला शरबतचा शोध लागला. तिची सविस्तर मुलाखतही स्टीव्हने घेतली आणि तिची कहाणीही प्रसिद्ध झाली.

अफगाणिस्तानातील यादवीमुळे देश सोडण्याची वेळ गुलावर आली. ती पाकिस्तानात राहू लागली. तिथे लग्न झाल्यानंतर काही वर्षांतच तिचा नवरा मेला. त्यानंतर चार अपत्यांचा सांभाळ कराव्या लागणाऱ्या गुलाला लहान वयातच अनेक टक्केटोणपे सहन करावे लागले. २०१६मध्ये तिला पाकिस्तानात अटक झाली. पाकिस्तानात राहता यावे, यासाठी गुलाने आपल्या राष्ट्रीय ओळखपत्रात काहीतरी खाडाखोड केली, या आरोपावरून गुलाला पेशावर कोर्टाने अफगाणिस्तानात परत पाठवण्याची शिक्षा ठोठावली. तसेच १५ दिवसांची कैद आणि लाखभर रुपयांचा जुर्मानाही तिला भरावा लागला. पेशावर कोर्टाने ठोठावलेली शिक्षा शरबत गुलासाठी मात्र इष्टापत्ती ठरली. अफगाणिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अश्रफ गनी यांनी गुलाचे तहे दिलसे अफगाणिस्तानात स्वागत केले. स्वतःच्या देशात सन्मानाने राहण्यासाठी अफगाण सरकारने शरबत गुलाला निवासस्थान देऊ केले, शिवाय नोकरीही दिली. हिरव्या डोळ्यांच्या गुलाला लहानपणी अफगाणिस्तानातील यादवी युद्धामुळे मायदेशाला मुकलेल्या लोकांचा चेहरा म्हणून जगात प्रसिद्धी मिळाली. मात्र, मायदेशात आता तिला सन्मान मिळाला आहे, हेच आम्हाला जगाला दर्शवून द्यायचे आहे, असे गनी यांनी त्यावेळी स्पष्ट केले.

मायदेशात सन्मानाने आणि सुरक्षित कवचात राहण्याचे शरबत गुलाचे भाग्य मात्र फार काळ काही टिकले नाही. ज्या तालिबान्यांनी १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानचा कब्जा करून लोकांवर अनन्वित अत्याचार केले. त्याच तालिबानच्या हाती आता सत्तेची दोरी गेल्याने शरबत गुलाला पुन्हा मायदेश सोडून परदेशाची वाट धरावी लागली आहे. एका अर्थाने शरबतच्या आयुष्यातील एक वर्तूळ त्यामुळे पूर्ण झाले आहे. २० वर्षांपूर्वी सत्तेत आलेले तालिबानी आणि आताचे सत्ताधारी तालिबान यांच्यात काडीचाही फरक नसल्याचे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळेच असंख्य अभागी अफगाणी नागरिक परदेशाची वाट चोखाळू लागले आहेत. त्यांना मायेदशापेक्षा परकीय भूमी अधिक सुरक्षित वाटू लागली आहे. ज्या अध्यक्षांनी सन्मानाने जगण्याची आणि सुरक्षिततेची हमी गुलाला दिली होती त्याच अध्यक्ष महोदयांनी देशाला अलविदा म्हटल्यानंतर आता कोणाच्या तोंडाकडे पहावे, असा विचार करून गुलाने आपली कर्मकहाणी इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्राघी यांच्या कानावर घालत राजाश्रयाची मागणी केली. ड्राघी प्रशासनानेही तातडीने पावले उचलत गुलाला इटलीत आणण्याच्या हालचाली केल्या. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर ज्या असंख्य अफगाणी नागरिकांनी विविध देशांकडे आश्रय मागितला त्यात गुलाचाही समावेश होता.  आता तरी गुलाला उत्तरायुष्य सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात व्यतित करता येईल, अशी आशा ठेवायला हरकत नाही.

जर्जर आयुष्याची नवी सुरुवात
शरबत गुलाने इटलीच्या पंतप्रधानांकडे राजाश्रय मागितला. सध्या विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या गुलाला तातडीने आश्रय मंजूर करण्यात आला. योजनेबरहुकूम गुला आता इटलीत आली असून, यथावकाश तेथील जीवनात समरस होणार आहे.

Web Title: Sharbat Gula is now in Italy from Afghanistan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app