लैंगिकता हे जगण्याचंच वास्तव, ते का टाळायचं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 06:20 IST2026-03-07T06:20:02+5:302026-03-07T06:20:24+5:30

समाजाने स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक मिथकं तयार केली आहेत. साहित्यामध्येही त्याचे प्रतिबिंब सातत्याने दिसत आले आहे!

Sexuality is a fact of life, why avoid it? | लैंगिकता हे जगण्याचंच वास्तव, ते का टाळायचं? 

लैंगिकता हे जगण्याचंच वास्तव, ते का टाळायचं? 

‘स्वतःला जगवत ठेवण्याचे प्रयोग’ या भारलिपी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कादंबरीच्या निमित्ताने लेखिका डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांच्याशी संवाद

‘स्वतःला जगवत ठेवण्याचे प्रयोग’ या शीर्षकात ‘प्रयोग’ हा शब्द कशामुळे?  
- प्रत्येक कृतीचे काही परिणाम असतात. आपण प्रयत्न करतो की चांगले परिणाम जास्त आणि वाईट परिणाम कमी होतील; पण अनेकदा आपण एक कृती करतो आणि त्यातून वेगळेच परिणाम समोर येतात. माझ्या कादंबरीतील नायिका अशाच एका टप्प्यावर उभी आहे. तिला स्वतःलाही ठाऊक नाही की पुढे काय होईल, तिच्यावर आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल; पण ती इतक्या घुसमटीत सापडलेली आहे की, जगण्यासाठी हातपाय मारते. एखाद्याच्या नाकातोंडात पाणी गेलं तर तो सहजपणे धडपडतो, तशी तिची अवस्था आहे. त्यामुळेच ‘प्रयोग’ हा शब्द आला.

स्त्री लैंगिकतेच्या विषयाला आपण केंद्रस्थानी आणले, ते कशामुळे? 
- मी आधी नॉन-फिक्शन लिहीत होते. ‘बिजापूर डायरी’ हे पुस्तक छत्तीसगडमधील माझ्या अनुभवांवर आधारित होतं; परंतु जेव्हा मी फिक्शन लिहायचं ठरवलं, तेव्हा मला प्रश्न पडला की, मला नेमकं काय मांडायचं आहे? कादंबरीचा पहिला ड्राफ्ट खूपच ‘पुस्तकी’ होता.  मग मी विचार करू लागले की, स्त्रीचं जगणं नेमकं कशाभोवती फिरतं?- स्त्रीचं शरीर, तिचं गर्भाशय, मासिक पाळी, तिची लैंगिकता या सगळ्यांसह ती जगत असते. ते वास्तव मी का टाळायचं? कादंबरीत ते सहजपणे आलं. अनेकांनी विचारलं – ‘तुम्ही इतकं लैंगिकतेबद्दल का लिहिलं?’तेव्हा मला उलटप्रश्न पडला की, हे तर जगण्याचंच वास्तव आहे, ते का टाळायचं?  

लैंगिक नात्यांमधील दुटप्पीपणाचा ताण इतक्या त्रयस्थपणे कसा साधलात? 
- माझी आई मराठीची प्राध्यापिका आणि कट्टर स्त्रीवादी. घरात तस्लिमा नसरीनपासून गौरी देशपांडेंपर्यंत अनेक लेखिकांची पुस्तकं होती. त्यामुळे मी लहान वयातच ‘लज्जा’सारखी पुस्तकं वाचली. दुसरी गोष्ट म्हणजे माझा व्यवसाय. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील अतिशय खासगी अनुभव घेऊन येतात. त्या जागी मुखवटे टिकत नाहीत. लैंगिकतेशी निगडित प्रश्न, वैवाहिक समस्या, शोषण हे सगळं उघडपणे समोर येतं. प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर माझ्या पेशंट्सनीच मला जगाचे वेगवेगळे रंग दाखवले. त्यातूनच कथानकातला त्रयस्थपणा आपोआप आला.

सर्जरीसारख्या तणावपूर्ण शाखेत पीजी करणारी मुलगी हा पात्रनिर्मितीचा निर्णय का? 
- स्त्री लेखकांना लगेच एक प्रश्न विचारला जातो – ही तुमची स्वतःची कथा आहे का? पण दत्ता घोलपने मला सांगितलं की, तू तुझ्या स्वतःच्या जगण्याजवळ गेलीस तर लेखन अधिक प्रामाणिक होईल. त्यामुळे मी डॉक्टर पात्र निवडलं.  समाजात डॉक्टरांबद्दल एक विशिष्ट प्रतिमा आहे : एकतर ते देवदूत असतात किंवा भरपूर पैसा कमावतात; पण पीजी करताना डॉक्टरांचं आयुष्य किती कठीण असतं हे लोकांना माहीत नसतं. माझा स्वतःचा पीजीचा काळ अत्यंत कठीण होता. मी अनेकदा रडत घरी फोन करायचे, ‘मला हे जमत नाही..’ पण कुटुंबीय समजवायचे – ‘काही वर्षं काढ, सगळं ठीक होईल.’ तो संघर्ष, तो ताण आणि डॉक्टरांच्या आयुष्याचं वास्तव मला मांडायचं होतं.

पेशंट्सचे जीव वाचवणारी नीडर डॉक्टर आणि आत्महत्येच्या विचारांनी पछाडलेली स्त्री या दोन टोकांमधील मानसिक दरी कशी उलगडली? 
- डॉक्टर म्हणून काम करताना भूक, थकवा किंवा वैयक्तिक दुःख महत्त्वाचं राहत नाही; पण यात एक प्रचंड ताण असतो. एखादं निदान चुकलं तर त्याचा परिणाम एखाद्याच्या जिवावर होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर सतत दबावाखाली काम करत असतात. त्याचवेळी त्यांचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य असतं. अनेक डॉक्टरांच्या वैयक्तिक नात्यांमध्ये ताण येतो, लग्नं तुटतात, कुटुंबाला वेळ देता येत नाही. मला या दोन जगांतील तारेवरची कसरत दाखवायची होती.  

विवाहसंस्थेतील लैंगिक अपेक्षा आणि स्त्रीच्या स्वायत्त इच्छांमधील संघर्ष याबद्दल काय सांगाल? 
- समाजाने स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक मिथकं तयार केली आहेत. साहित्यामध्येही काही गोष्टी एकाच रंगात दाखवल्या जातात. उदाहरणार्थ- गर्भपात हा विषय अनेक वेगवेगळ्या वास्तवांशी जोडलेला असतो; पण साहित्यात तो बहुतेकदा एकाच भावनिक चौकटीत मांडला जातो. इंद्रधनुष्य अनेक रंगांनी बनलेलं असतं, तसं स्त्रीचं व्यक्तिमत्त्वही अनेक छटांनी बनलेलं असतं. वेगवेगळ्या वयात, नात्यांत आणि प्रसंगांत एकच स्त्री वेगवेगळी असू शकते. त्या सगळ्या रूपांमध्ये एक सौंदर्य आहे. जर हा विविधतेचा पटच नसेल, तर आयुष्य खूप एकसुरी आणि बेचव होईल. 

मुलाखत व शब्दांकन : 
दुर्गेश सोनार, सहायक संपादक, ‘लोकमत’
durgesh.sonar@lokmat.com

Web Title : यौनिकता वास्तविकता है, इससे क्यों बचें?: लेखिका ऐश्वर्या रेवडकर

Web Summary : लेखिका ऐश्वर्या रेवडकर ने अपने उपन्यास में महिला कामुकता, सामाजिक अपेक्षाओं और एक डॉक्टर के जीवन की जटिलताओं का पता लगाया है, जिसमें महिलाओं के अनुभवों की बहुमुखी प्रकृति को स्वीकार करने की आवश्यकता पर जोर दिया गया है।

Web Title : Sexuality is reality, why avoid it?: Author Aishwarya Revadkar

Web Summary : Author Aishwarya Revadkar discusses her novel exploring female sexuality, societal expectations, and the complexities of a doctor's life, emphasizing the need to acknowledge the multifaceted nature of women's experiences.

टॅग्स :Womenमहिला