दृष्टीकोन - सेवाव्रती, निडर आणि ‘अजय’ लल्लू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 02:40 AM2020-06-13T02:40:10+5:302020-06-13T02:40:17+5:30

काही तासांतच आम्ही पीडितेच्या घरी पोहोचलो. ‘त्या’ अत्याचारपीडित कुटुंबीयांनी आम्हाला सांगितलेली आपबिती हृदय पिळवटून टाकणारी होती.

Sevavrati, fearless and ‘Ajay’ Lallu | दृष्टीकोन - सेवाव्रती, निडर आणि ‘अजय’ लल्लू

दृष्टीकोन - सेवाव्रती, निडर आणि ‘अजय’ लल्लू

Next

प्रियंका गांधी वाड्रा

उन्नाव बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची माझी इच्छा होती. कुडकुडत्या थंडीत पहाटे आम्ही उन्नावला निघालो. कारमध्ये औदासीन्य पसरले होते. ज्या कुटुंबाच्या भेटीस आम्ही चाललो होतो, ते हिंसाचाराने उद्ध्वस्त झाले होते. न्यायासाठीचा त्यांचा संघर्ष आणि वेदना आम्ही प्रत्यक्षात अनुभवल्या होत्या; परंतु अन्याय बघून शांत बसणे हे अजय लल्लू यांच्या स्वभावातच नाही. म्हणाले, ‘दीदी, संपूर्ण राज्यात आंदोलन उभे करावे लागेल. संघर्ष, संपर्क आणि संवाद याशिवाय राजकारण यशस्वीच होऊ शकत नाही.

काही तासांतच आम्ही पीडितेच्या घरी पोहोचलो. ‘त्या’ अत्याचारपीडित कुटुंबीयांनी आम्हाला सांगितलेली आपबिती हृदय पिळवटून टाकणारी होती. तिच्या वृद्ध वडिलांना अश्रू अनावर झाले होते. अजय लल्लू लगेच खाली बसले आणि वडिलांचा हात त्यांनी आपल्या हातात घेतला. लल्लूंचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. ‘आम्ही आहोत ना बाबा, हिंमत ठेवा.’ ते हळूच सांत्वन करत म्हणाले. आमच्यासोबत बाहेर न येता काहीकाळ तिथेच थांबले होते. लखनौमध्ये आल्यावर त्यांनी आम्हाला विधानसभेजवळ सोडण्याची विनंती केली. तेथे काही कार्यकर्ते या घटनेविरोधात आंदोलन करत होते. त्यानंतर थोड्या वेळातच लल्लूंना अटक झाल्याची सूचना आम्हाला मिळाली. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजयकुमार लल्लू हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आणि दु:ख पाचवीलाच पूजले होते. इयत्ता सहावीत असताना त्यांनी रस्त्यावर ठेला लावला, फटाके विकले. अडथळ्यांची शर्यत खेळत-खेळत कॉलेजमध्ये पोहोचले. विद्यार्थी संघाचे अध्यक्ष झाले. सेवाभाव व उत्साहाने ओतप्रोत हा युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येणारच होता. संघर्षशील स्वभाव आणि लोकप्रियतेच्या बळावर २०१२च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर १० हजार मतांनी विजयी झाले. ‘जनतेचा माणूस’ जो प्रत्येकाच्या अडीअडचणीत पाठीशी उभा राहत होता. २०१७च्या निवडणुकीत भाजपची लाट असतानाही जिंकला. लोकांनी दाखविलेल्या या विश्वासाने त्यांचा कामांचा झपाटा प्रचंड वाढला होता.

कोरोनाची महामारी आली आणि नियोजनशून्य लॉकडाऊनमुळे लाखो गरीब कुटुंबे सैरभैर झाली, तेव्हा अजय लल्लू यांनी लोकांना मदतीसाठी राज्य काँग्रेसच्या महाअभियानाचे नेतृत्व केले. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी जवळपास ९० लाख लोकांना मदत केली. इतर राज्यांत अडकलेल्या १० लाख नागरिकांची काळजी घेतली. पायी स्वगृही निघालेल्या हजारो स्थलांतरितांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी १ हजार बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश सरकारकडे मांडला. सहकार्य आणि सेवेच्या भावनेतून दिलेल्या या प्रस्तावामुळे राज्य सरकार पहिल्याच दिवशी अस्वस्थ झाले. प्रथम १७ मे रोजी त्यांनी आमचा प्रस्ताव नाकारला आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरून ५०० बसेस परत पाठविल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमचा प्रस्ताव स्वीकारत बसेसचे दस्तावेज मागितले. त्यांनी वाहनांच्या यादीसोबतच चालक-वाहकांची नावे, बसचे फिटनेस व प्रदूषण प्रमाणपत्र यासह केवळ १० तासांच्या कालावधीत बसेस लखनौला आणण्यास सांगितले. हा निर्णय व्यर्थ होता. कारण मुद्दा दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरून स्थलांतरितांना नेण्याचा होता. आमच्या दृष्टीने रिकाम्या बसेस लखनौला घेऊन जाणे वेळेचा आणि संसाधनांचा अपव्यय होता. त्यावर राज्य सरकारने तर्क दिला की दोन तासांत आपल्या बसेस नोएडा आणि गाझियाबाद सीमेवर उभ्या करा.

दरम्यान, सरकारने भयंकर दुष्प्रचार सुरू करून आमच्यावर बनावट यादीचा आरोप केला. आमच्या ९०० बसेस आग्राच्या उँचा नगला सीमेवर आणि २०० बसेस नोएडाच्या महामाया पुलावर १९ मेच्या दुपारपासून उभ्या होत्या, हे तथ्य त्यांनी नाकारले. १९ मेच्या रात्री अजय लल्लू यांना अटक केली. एक हजारावर बसेस परवानगीच्या प्रतीक्षेत उभ्या राहिल्या आणि दोन दिवसांनी परतल्या. लल्लू यांना पोलीस आग्रा येथून लखनौ कारागृहात नेत असताना माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे होऊ शकले. मी चिंतेत होते. ‘काय गरज होती या महामारीच्या काळात अटक करून घेण्याची? आपल्या प्रकृतीची थोडी तरी काळजी घ्या.’ मी बोलत असतानाच त्यांचे उत्साही हास्य कानावर पडले. ‘अरे दीदी, हे सरकार दडपशाही करणारे आहे. त्यांच्यापुढे मी कदापि झुकणार नाही. तुम्ही माझी चिंता करू नका.’ दुसºया दिवशी सकाळी त्यांच्यावर अनेक खोटेनाटे आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनी युपी सरकारला वाहनांचे चुकीचे क्रमांक दिले, हा त्यातील एक आरोप. याच गुन्ह्यासाठी ते आजवर लखनौ कारागृहात बंदिस्त आहेत. एका भयभीत व लोकशाही न मानणाºया सरकारने त्यांना अटक करण्याची ही विसावी घटना आहे. एवढा अन्याय आणि दडपशाहीनंतरही ते निडर, ठाम आणि ‘अजय’ आहेत. लोकशाही आणि न्यायालयावर त्यांचा संपूर्ण विश्वास आहे. त्याग आणि सेवेची त्यांची भावना अजय आहे. अजय लल्लू त्या भारताचे सच्चे नागरिक आहेत, ज्याच्या स्वातंत्र्यासाठी राष्टÑपिता महात्मा गांधी यांनी लढा दिला होता. ते न्यायाचे हकदार आहेत आणि त्यांच्यासोबत न्याय झालाच पाहिजे.

(या लेखातील मते ही त्यांची वैयक्तिक आहेत.)

(लेखिका, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत)

Web Title: Sevavrati, fearless and ‘Ajay’ Lallu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.