सेल्फी गर्ल्स

By Admin | Updated: April 17, 2016 01:40 IST2016-04-17T01:40:05+5:302016-04-17T01:40:05+5:30

गेल्या आठवड्यात सेल्फी गर्ल्सबद्दल लिहायला सुरुवात केली, पण हा आठवडा सरला तरी लिहून संपत नाहीये. आम्ही पाच जणी नाटकापलीकडेही एकमेकीत गुंतलो आहोत. एकमेकींचा भाग झालो

Selfie Girls | सेल्फी गर्ल्स

सेल्फी गर्ल्स

- शिल्पा नवलकर

गेल्या आठवड्यात सेल्फी गर्ल्सबद्दल लिहायला सुरुवात केली, पण हा आठवडा सरला तरी लिहून संपत नाहीये. आम्ही पाच जणी नाटकापलीकडेही एकमेकीत गुंतलो आहोत. एकमेकींचा भाग झालो आहोत. कुठलीही वस्तू विकत घेताना ती एकटीसाठी नाही तर पाचच्या पटीतच घ्यायची हा आता पायंडाच पडून गेला आहे. आम्ही एकमेकींवर चिडतो, भांडतो, राग आलाच तर त्याचा तिथल्या तिथे निचरा करतो.

मी नुकतीच सातवीची परीक्षा दिली होती. सुटीत काय करायचं असा विचार करत असताना कोणी तरी सांगितलं की दुर्गा झाली गौरी नावाचं नवीन नृत्यनाट्य होतंय. थोड्या साशंक मनानेच मी तिथे भेटायला गेले. नृत्याच्या काही स्टेप्स करून दाखवण्यासाठी तिथे अनेक मुलांच्या शिस्तीत रांगा लावल्या होत्या. सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, गुरू पार्वती कुमार अशा दिग्गजांसमोर थोडी बावरलेली, फ्रॉक आणि केसांच्या दोन लांब वेण्या घातलेली मी एका रांगेत जाऊन उभी राहिले. माझा नंबर येण्याची वाट बघत असताना माझ्या उजवीकडून आवाज आला, ‘‘नाव काय तुझं? कितवीत आहेस?’’ मी वळून बघितलं. वयाने माझ्या इतकीच मुलगी. खूप बारीक, चुणचुणीत. अत्यंत रेखीव चेहऱ्याची. म्हणाली, ‘‘माझं नाव सुकन्या कुलकर्णी. तू काळजी करू नकोस गं. छान होईल आॅडिशन. आपण मस्तच करू .’’
आज सेल्फी नाटकाचा प्रयोग सुरू असताना मी वळून बघते तेव्हा मला तोच चेहरा दिसतो. रेखीव आणि आश्वासक. ‘आपण मस्तच करू’ हे आता न बोलता सांगणारा. स्टेजवर कुठलीही गडबड होऊ दे, तरी सुकन्या तो प्रसंग निभावून नेईलच, हा विश्वास देणारा. कोणालाही कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे, ‘सुकन्या आहे ना!’ हा गुरूमंत्र जपला जातो. आम्हा सहा जणांच्या टीममधला प्रत्येक जण- मी, पूर्वा गोखले, सोनाली पंडित, ऋजुता देशमुख आणि अजित भुरे आपापल्या काळज्या तिच्याकडे बघून विसरतो...
वयाने माझ्याइतकीच असलेली सुकन्या मनाने आम्हा सगळ्यांची आई आहे. एखाद्याला शिंक आली तरी सुकन्याला ती सर्दीने हैराण झाल्यासारखं वाटतं... मग ती त्या माणसाच्या काळजीने आणि मायेने अनुभवी सल्ले देते, दहा औषधं सुचवते, त्यातली पाच स्वत:जवळच्या जादूगाराच्या पोतडीतून काढून समोरच्याला बळेच घ्यायला लावते आणि त्यानेही गुण नाही आला तर तिच्या पोतडीत अजून काही तरी रामबाण अस्त्र तयार असतंच.
तिच्या या जादूगाराच्या पोतडीत बडीशेपेपासून चमचे ते पायमोज्यांपासून इलेक्ट्रिक किटलीपर्यंत सगळं असतं. जो निर्धास्तपणा मी सुकन्याकडून स्टेजवर घेते तोच घरी दौऱ्यांसाठी बॅग भरतानाही घेते. स्टेजवर तिच्यावर अभिनयाची सगळी जबाबदारी टाकून मी निश्चिंत होते. तसंच घरी बॅग भरताना एखादी वस्तू विसरतेय असं वाटलं तर फार विचार न करता ‘सुकन्या आहे ना’ हा गुरूमंत्र जपते आणि बॅग बंद करून टाकते. कोणाहीकडे नसलेली वस्तू तिच्याकडे असणारच हा विश्वास तिच्यावर ठेवता येतो.
सुकन्या आमची आई होते तेव्हा आम्हीही तिला काचेसारखं जपतो. तिच्या वेदना तिने बोलून दाखवण्याआधीच आमच्या होऊन जातात. पण त्या वेदना मागे टाकून सुकन्या पुन्हा नव्या जोमाने उभी राहते. अभिनेत्री म्हणून असलेलं तिचं मोठेपण विसरून आमची मैत्रीण होते. मैत्रीच्या नात्याने आमची काळजी करता करता पुन्हा कधी आमची आई बनून जाते, तिचं तिलाही कळत नाही.
या टीममधली माझी सगळ्यात नवीन मैत्रीण - ऋतुजा देशमुख. नाटकात ती साकारत असलेल्या मिनाक्षीने लिहिताना मला सगळ्यात जास्त त्रास दिला. पण करायला अत्यंत कठीण असलेली ही भूमिका सहजतेने करताना ऋतुजा प्रेक्षकांना आणि मलाही तिच्या पे्रमात पाडते. खूप पूर्वीपासून अतिशय सुंदर दिसणारी अभिनेत्री म्हणून ती तिला लांबूनच ओळखत होते. पण मधुरा वेलणकरची मैत्रीण म्हणून आयुष्यात आली आणि मग ‘सेल्फी’च्या निमित्ताने ती माझ्यासाठी मधुराची मैत्रीण राहिली नाही. माझीच झाली. मी आणि ऋतुजा. रूपाने वेगळ्या असलो तरी एकमेकींची प्र्रतिबिंब. आमच्या सवयी, आवडी तंतोतंत जुळतात. तिची बहुतेक मतं माझ्यासारखीच आणि माझे खूपसे विचार अगदी तिच्यासारखे, आम्ही दोघींनी तालमी सुरू असताना अलगद एकमेकींची लय पकडली. आयुष्य जगण्याची पद्धत अगदी आपल्यासारखीच असणारी एक मैत्रीण भेटणं हा अनुभव मला तालमीदरम्यान रोज सुखावत राहिला. ऋतुजा आता माझ्यासाठी माझ्याच मनाचा एक छोटासा कप्पा बनली आहे.
समतोल आणि सारासार विचार करणाऱ्या ऋतुजाशी संवाद साधणं सगळ्यांनाच सोपं जातं. हा मोकळेपणा माझ्यात नाही. ऋतुजाच्या रूपातला आणि स्वभावातला गोडवा तर माझ्यात नाहीच नाही. आमच्या संपूर्ण टीमला समान पातळीवर एकत्र बांधून ठेवणं तिला सहज जमतं. कधी कठोर वागायचं, कधी समोरच्याच्या कलाने घ्यायचं हे तिला आपसूक कळतं. वागण्यात खोटेपणा येऊ द्यायचा नाही, तरीही समोरच्याला दुखवायचं नाही ही कसरत, कशी कोण जाणे, तिला जमू शकते. ती हातचं राखून काही ठेवत नाही, पण एखाद्याचं वागणं पटलं नाही तर ते तिथेच सोडून पुढे जाते. स्वत:च्या मर्जीने जगत असताना इतरांच्या मताचा आदर करते. वागण्याची, जगण्याची, विचार करण्याची एखादी आदर्श पद्धत आहे का मला माहीत नाही. पण असेल तर ती माझ्यासाठी खूपशी ऋतुजासारखीच असेल हे नक्की. कदाचित म्हणूनच सगळ्या सेल्फी गर्ल्समध्ये ऋतुजावर माझा कणभर जास्त जीव आहे.
आम्ही पाच जणी आणि निर्माता-दिग्दर्शकापेक्षाही आमचा मित्रच असलेल्या अजित भुरेकडे अजूनही आश्चर्याने बघितलं जातं. इतक्या बायका असलेल्या नाटकाचे प्रयोग अजित निर्विघ्नपणे करू शकतो हे अनेकांच्या पचनी पडत नाही. पण अजितसुद्धा आमच्यात मिसळून गेला आहे हे त्यांना समजवायला आम्ही जात नाही. आम्ही स्टेजवरचा आणि स्टेजमागचा प्रत्येक क्षण एन्जॉय करण्याच्या धुंदीत असतो. या नाटकामुळे आमची मैत्री नक्की तुटणार, असा विश्वास असलेल्या एकूण एकाला आम्ही चपराक लगावली आहे. या आनंदात पुढे जात राहतो... ‘सेल्फी’च्या शंभराव्या प्रयोगाच्या दिशेनं.

Web Title: Selfie Girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.