Sanjay Gandhi birth anniversary a leader ahead of time | संजय गांधी, काळाच्याही पुढे असलेला नेता..

संजय गांधी, काळाच्याही पुढे असलेला नेता..

- पंकज व्हाेरा, मॅनेजिंग एडिटर, द संडे गार्डियन

ज्यांची ७४वी जयंती आपण सोमवारी गांभीर्यपूर्वक साजरी केली ते संजय गांधी काँग्रेस पक्षावर आपली अमीट छाप सोडणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या गूढ, अपघाती निधनाच्या दुर्दैवी घटनेला ४० वर्षे लोटली असली तरी आजही त्यांच्या विश्वासातली माणसे या पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलत आहेत. निधनसमयी त्यांचे वय अवघ्या ३३ वर्षांचे होते. मात्र त्यांनी जोर लावला नसता तर जनता पक्षाचे तत्कालीन सरकार आणखीन काही काळ सत्तेवर राहिले असते आणि काँग्रेसला पुनरागमन करणेही बरेच अवघड गेले असते.टीकाकारांना संजय गांधी नेहमीच हुकूमशहा भासले. १९७५ची आणीबाणी आणि त्यादरम्यान झालेल्या अतिरेकासाठी ते संजय गांधी यांना जबाबदार धरतात. असे असले तरी युवक काँग्रेसच्या कार्याच्या केंद्रस्थानी असलेला संजय गांधीप्रणीत पाच कलमी कार्यक्रम त्यांच्यामधल्या द्रष्ट्या नेत्याकडे निर्देश करणारा होता, हे कुणीही नाकारू शकणार नाही. ज्यावेळी पर्यावरणाचे कुणालाही पडले नव्हते, त्यावेळी त्यांनी अधिक झाडे लावण्याचा आग्रह धरला. लोकसंख्येच्या अनिर्बंध वाढीला आवर घालण्यासाठी त्यानी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार केला. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांच्या सल्ल्यावरून घोषित केलेल्या आणीबाणीचे परिणाम विपरीत झाले व त्यामुळे १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उत्तर भारतातून सफाया झाला. त्यावेळी पराभूत झालेल्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांत गत शतकातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्या, पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही समावेश होता. संजय गांधी यांनाही आपल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत रवींद्र प्रताप सिंग या तुलनेने अपरिचित उमेदवाराकडून मात खावी लागली. या निवडणुकीपासून योग्य तो धडा घेत संजय यांनी काँग्रेसला पूर्ववत देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा चंग बांधला. यशवंतराव चव्हाण, करण सिंग,  कृष्णचंद्र पंत, के. ब्रह्मानंद रेड्डी अशा मातब्बर नेत्यांनी बंडाचा झेंडा उभारला असता त्यांच्यासमोर न झुकता पक्षाच्या विभाजनास सामोरे जाण्यास त्यांनी आपल्या मातोश्रींना उद्युक्त केले. कमलापती त्रिपाठींसारख्या निष्ठावंतांचा विरोध असतानाही हे विभाजन घडवून आणले गेले. निर्वाणीच्या क्षणी आपल्या आईची साथ सोडणाऱ्यांना खड्यासारखे वगळून झाल्यावर संजय यांनी नव्या पक्षाच्या जडणघडणीवर लक्ष केंद्रित केले. याकामी त्यांच्या दिमतीस होते ते कमल नाथ व अकबर अहमद यांच्यासारखे त्यांचे कार्यक्षम सहकारी तसेच प्रेमस्वरुप नय्यर, ललित माकेन व हसन अहमद यांच्यासारखे त्यांचे सहपाठी व युवक काँग्रेस नेते. काँग्रेस (आय) या नव्या पक्षाचे एकमेव महासचिव बनलेले बुटा सिंग आणि त्यानंतर अब्दुल रहमान अंतुले हे त्यांच्या खास विश्वासातले होते. उद्योजक कपिल मोहन यांच्यामार्फत त्यांनी समाजवादी नेते राज नारायण यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला आणि मोरारजी देसाई यांचे सरकार पाडण्याची व्यूहरचना आखली. या काळात कमल नाथ आणि अकबर अहमद यांनी त्यांची निष्ठापूर्वक पाठराखण केली. जनता पक्षाचे सरकार कोसळून चरण सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले तेव्हाच इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सत्ताग्रहण अपरिहार्य असल्याचे स्पष्ट झाले. प्रणब मुखर्जी यांच्यापासून गुलाम नबी आझाद यांच्यापर्यंत आणि कमल नाथ यांच्यापासून अशोक गहलोत यांच्यापर्यंत त्या पिढीतील बहुतेक काँग्रेस नेत्यांच्या राजकीय यशाचे श्रेय संजय यांनाच जाते.संजय यांच्या निधनाने गांधी घराण्याचा वारसा आला तो त्यांचे बंधू राजीव गांधी आणि त्यांच्या परिवाराकडे. आपल्या पक्षाला डावीकडे कल असलेल्या नेत्यांच्या कब्जातून मुक्त करत उदारमतवादाचा पुरस्कार करणाऱ्यांना पुढे आणण्याचे श्रेयही संजय गांधी यांना द्यावे लागेल. संजय यांनी अवेळीच निरोप घेतला; पण त्यांच्या कर्तृत्वाची अमीट छाप काँग्रेसवर अक्षय राहील.

Web Title: Sanjay Gandhi birth anniversary a leader ahead of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.