शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

या ‘पुष्पां’ना आवरा! वाळूमाफियांची दहशत ग्रामीण महाराष्ट्र अनुभवतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 06:14 IST

‘प्रयत्ने कण रगडिता वाळूचे तेलही गळे’ या कवितेला वाळू माफियांनी आजवर आपल्या राज्यात उलटे टांगले आहे.

‘प्रयत्ने कण रगडिता वाळूचे तेलही गळे’ या कवितेला वाळू माफियांनी आजवर आपल्या राज्यात उलटे टांगले आहे. कारण आपले वाळूचे धोरण हे सांगते की कुठलेही कष्ट करण्याऐवजी वाममार्गाने दांडगाई करा आणि वाळूतून पैसे कमवा. ‘वाळूमाफिया’ हा गुन्हेगारी शब्द आता ग्रामीण व शहरी भागात रुळला आहे.

आपल्या सरकारांनीही तो रुजू दिला. हे माफिया इतके गब्बर झाले आहेत, की ग्रामपंचायत, महसूल यंत्रणा, पोलिस या कुणालाही न जुमानता ते थेट नदीपात्रात जेसीबी सारखी यंत्रे घेऊन उतरतात. अवाढव्य यंत्रांनी नदी पोखरतात आणि शहरांकडे वाळूच्या डंपरच्या रांगा लावतात.  पोलिस पाटील, सरपंच, तहसीलदार, पोलिस अधिकारी हे सगळे हा उपसा उघड्या डोळ्यांनी पाहत राहतात.

‘पुष्पा’मधल्या चंदन चोरांनाही लाजवेल अशी वाळूमाफियांची दहशत ग्रामीण महाराष्ट्र अनुभवतो आहे. महाराष्ट्र सरकार आता वाळूबाबत नवीन धोरण आणते आहे. त्यास मंत्रिमंडळाने गत आठवड्यात मंजुरी दिली. या धोरणाचा मसुदा जनतेसमोर अजून यावयाचा आहे. पण, या धोरणाने वाळू चोरी थांबून या उत्खननाला शिस्त लागेल असा दावा महसूलमंत्री करत आहेत. खरेच तसे  झाले तर ते गावोगावच्या नद्यांचे भाग्य म्हणायचे. पण, या नव्या धोरणाने तरी नद्या सुरक्षित होतील का? कारण, या धोरणात ही ठेकेदार नावाची जमात राहणारच आहे व अंमलबजावणी करणारी ही तीच महसूल यंत्रणा दिसते.  

नदीतून वाळू उत्खनन करणे, त्यानंतर या वाळूचा डेपो तयार करणे व तेथून पुढे ती नागरिकांना वितरित करणे असे तीन टप्पे नवीन धोरणात दिसतात. आजवरचा अनुभव हे सांगतो की ठेकेदार एक हजार ब्रास वाळूचा ठेका घेतो व प्रत्यक्षात चार हजार ब्रास उपसतो. कारण बहुतांश महसूल यंत्रणाच त्याला सामील असते. वाळू यंत्राने उपसू नका, नदीत सीसीटीव्ही बसवा, तहसीलदारांनी दररोज हे फुटेज तपासावे असे गोंडस नियम यापूर्वीही होते. पण, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी ही तपासणी करण्याची तसदी घेतली नाही. काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी हे नियम पाळले.

पण, त्यांच्यावर हल्ले करण्याची मुजोरी तस्करांनी दाखवली. ‘वाळूत लघुशंका केली तरी तिच्या खाणाखुणा उरत नाहीत’ अशा अर्थाची एक ग्रामीण म्हण आहे. ही म्हण या भ्रष्ट साखळीला चपखल लागू पडते. कारण, पाऊस आला की वाळू उपशामुळे नदीत निर्माण झालेले भ्रष्टाचाराचे खड्डे आपोआप बुजतात आणि भ्रष्ट साखळी ही निर्धोक राहते. त्यामुळे महसूलमंत्री आपल्याच यंत्रणेला कशी शिस्त लावणार? यावर या धोरणाचे भवितव्य ठरेल. नागरिकांना ६०० रुपये ब्रासने वाळू मिळेल असेही शासनाचे धोरण आहे. खरेतर वाळू फुकट मिळावी ही नागरिकांची अपेक्षा नव्हती.

ती रास्त दरात असावी व चोरीची नसावी.  घराच्या बांधकाम परवान्यासोबत वाळूची रॉयल्टी प्रत्येक बांधकामामागे घेतल्यास चोरीची वाळूच कुणी घेणार नाही. पण सरकार ठेकेदारांवर अधिक अवलंबून आहे. तेलंगणा राज्यानेही ऑनलाइन वाळू बुकिंगचे धोरण राबविले. कर्नाटक, गुजरात या राज्यांनीही वेळोवेळी धोरणे बदलली. गुजरातमध्ये ड्रोनद्वारे नद्यांवर नजर ठेवली गेली.  संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने २०१८ साली अहवालात सांगितले की भारत व चीन या देशांत वाळूचे गंभीर हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. अतिरिक्त वाळू उपशाने अनेक नदीकाठ आटले आहेत.

सन २०२०-२१ मध्ये वाळू उपसा व दंडात्मक कारवाईतून राज्याला २ हजार ७९१ कोटींचा महसूल मिळाला. हे अर्थकारण खूप मोठे आहे. त्यामुळेच या धंद्यात अनेकजण उतरले. काही ठिकाणी नेतेही तस्करीत भागीदार आहेत. तस्करांमुळे गावे गुन्हेगारीच्या विळख्यात सापडली आहेत. गावांमध्येही कट्टे व वाळूच्या गॅंग पोहोचल्या. त्यामुळे महसूलपेक्षा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. वाळू उत्खनन हे समाज व नद्या या दोघांसाठीही घातक ठरत आहे. त्यामुळे वाळूला पर्याय काय देणार आहोत याचाही विचार महसूल विभागाला करावा लागेल. राज्यात क्रश सॅण्ड व वॉश सॅण्डचे ही उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी हा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, या पर्यायी वाळूला बळकटी देण्याबाबत शासन उदासीन दिसते. शासनाला वाळूचे संवर्धन करण्यात रस असायला हवा. निव्वळ वाळू उपशात नको.

टॅग्स :sandवाळू