साईबाबांच्या दरबारी संघ, भाजपाचा प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 02:56 IST2018-10-24T02:56:48+5:302018-10-24T02:56:58+5:30
साई संस्थान हे राजकीय व्यासपीठ नाही. त्याचा राजकारणासाठी वापर होऊ नये, असे शेरे खुद्द न्यायालयाने अनेकदा नोंदविलेले आहेत.

साईबाबांच्या दरबारी संघ, भाजपाचा प्रचार
- सुधीर लंके
साई संस्थान हे राजकीय व्यासपीठ नाही. त्याचा राजकारणासाठी वापर होऊ नये, असे शेरे खुद्द न्यायालयाने अनेकदा नोंदविलेले आहेत. परंतु, यातूनही राजकारण्यांनी धडा घेतलेला नाही. काँग्रेस-राष्टÑवादीने या संस्थानचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला, असा आरोप झाला. मात्र, भाजपनेही तोच कित्ता गिरविला. तेही बेमालूमपणे व शहाजोगपणाचा आव आणत हे संस्थान राजकारणासाठी वापरताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यातही हेच घडले.
साईबाबांच्या समाधीला १८ आॅक्टोबरला शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जो शताब्दी उत्सव साजरा करण्यात आला त्याची सांगता मोदी यांच्या हस्ते झाली. वास्तविकत: हा शताब्दी उत्सव नेमका काय साजरा झाला? इथपासून प्रश्न आहे. शताब्दी उत्सवाची सुरुवात राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत शिर्डी विमानतळाचे उद्घाटन करुन झाली होती. हे विमानतळ म्हणजे शताब्दी वर्षाची उपलब्धी आहे, असा दावा संस्थानचे विश्वस्त मंडळ मोदींच्या कार्यक्रमात करताना दिसले. वास्तविकत: या विमानतळाची मुहूर्तमेढ विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रोवली गेली. ते कार्यान्वित फडणवीस सरकारच्या काळात झाले. त्यामुळे याचे श्रेय केवळ या विश्वस्तांना व सरकारला देणे अयोग्य ठरेल. शताब्दी वर्षात विविध उपक्रम राबवू असे सांगत फडणवीस सरकारने ३२०० कोटींच्या पॅकेजची घोषणा शिर्डीसाठी केली होती. प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. शताब्दीसाठी दोन उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार, एक कार्यकारी अभियंता, एक पोलीस उपअधीक्षक असे मोठे मनुष्यबळ संस्थानकडे प्रतिनियुक्तीवर आले. पण, कुठलीही योजनाच न आल्याने या अधिकाºयांना वर्षभर कामच नव्हते अशी परिस्थिती आहे. मोदींच्या दौºयासाठी निमित्त हवे म्हणून मंदिरातील दर्शनबारी, शैक्षणिक संकुल, सोलर प्रोजेक्ट, साईउद्यान अशा काही प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. या दौºयावर संस्थानचा दोन कोटींच्या आसपास खर्च झाल्याचा अंदाज आहे. मोदी यांनी शिर्डीसाठी काहीही घोषणा केली नाही. याऊलट आपल्या सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा जोरदार प्रचार करुन घेतला. काँग्रेस आघाडी सरकार कसे फसवे होते व आपण कसे लायक आहोत, हे सांगण्यासाठी त्यांनी साईबाबांची चावडी वापरली. मोदी यांचे २०२२ चे स्वप्न साकार होण्यासाठी साईबाबा त्यांना शक्ती देवो, असे साकडेही फडणवीसांनी साईबाबांना घातले.
भाजपने हा प्रचार फक्त याच कार्यक्रमात केला असे नव्हे. साईबाबांना सर्वधर्मीय लोक मानतात. एकाअर्थाने या मंदिरात धर्मनिरपेक्षता भेटते. साईबाबांंना विशिष्ट धर्मात अडकविण्यात आले नाही. मात्र, या विश्वस्त मंडळाने साईमंदिरात भगव्या पाट्या लावून मंदिराचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न केला. ही कृती त्यांनी अनावधानाने केली असे म्हणता येत नाही. मंदिरात ओम, त्रिशूल आणला. वर्षात साईसंस्थानमध्ये जमा होणारे रक्त राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या विचाराच्या रक्तपेढ्यांना प्राधान्याने पुरविले गेले. संघ विचारावर उभ्या असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाचे शाही शिबिर संस्थानने शिर्डीत घेतले. शताब्दी उत्सवाचे जे काही मोजके उपक्रम झाले त्यात हा एक महत्त्वाचा उपक्रम होता. एकीकडे असा वापर झाला. दुसरीकडे शिर्डीला निधी देताना सरकारने हात आखडता घेतला.
कुंभमेळा आला की नाशिकचा कायापालट होतो. सरकार भरभरुन निधी देते. तोच न्याय मात्र शिर्डीला नव्हता. हा पक्षपात का? याबाबत शंका आहेत. शिर्डी शहराला व नगर जिल्ह्याला शताब्दी वर्षात घोषणांशिवाय काहीही मिळाले नाही. शताब्दी वर्षानिमित्त शिर्डीच्या वाहतुकीचा एक आराखडा बनविण्यात आला होता. तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी अवघे दोन कोटी रुपये लागणार होते. तो आराखडा मंजूर झाला नाही. मात्र, तेवढा खर्च मोदींच्या दौºयावर केला गेला. या दौºयात भाजप प्रदेशाध्यक्षांना आवर्जून बोलविण्यात आले होते. हा कार्यक्रम पक्षीय असल्याची ही एक मोठी पावती होती.
शिर्डी हे महाराष्टÑातील सर्वात श्रीमंत तर तिरुपती नंतर देशातील दुसºया क्रमांकाचे देवस्थान मानले जाते. गोवा राज्यात वर्षाकाठी ४५ लाख पर्यटक भेट देतात, अशी आकडेवारी आहे. साई संस्थानच्या दाव्यानुसार शिर्डीत एकावर्षी साधारण दोन कोटी लोक भेट देतात. ४५ लाख पर्यटकांवर गोव्याचे अर्थकारण चालते. दोन कोटी लोकांना सामावून घेणारे शिर्डी शहर मात्र स्वत:चे अर्थकारणही नीट भागवू शकलेले नाही, हे वास्तव आहे. शिर्डीतील हॉटेल व्यवसाय देखील अडचणीत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आजवर शिर्डीचा राज्य सरकारने पर्यटनासाठी अपेक्षित वापरच केलेला नाही. नगर, नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे पर्यटनासाठी जोडले तरी या परिसराला चालना मिळेल. मात्र, तेवढ्या रस्त्यांची कामेही या शताब्दी वर्षात होऊ शकलेली नाहीत. पंतप्रधानांच्या दौºयात शिर्डी व महाराष्टÑ पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी घोषणांची अपेक्षा होती. मात्र, नेहमीप्रमाणे मोदी २०२२ चे स्वप्न दाखवून निघून गेले. साईनगरीला त्यांनी हात दाखविला.
(आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर)