सचिन आणि रेखा

By Admin | Updated: August 11, 2014 02:27 IST2014-08-11T02:27:23+5:302014-08-11T02:27:23+5:30

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन आणि अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभेतील अनुपस्थितीचा विषय गेल्या आठवड्यात बराच गाजला.

Sachin and the line | सचिन आणि रेखा

सचिन आणि रेखा

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन आणि अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभेतील अनुपस्थितीचा विषय गेल्या आठवड्यात बराच गाजला. संसदेत कला, क्रीडा, साहित्य आदी क्षेत्रांतील मान्यवरांनाही प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद घटनाकारांनी केली आहे. त्यानुसार या दोघांना राज्यसभेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. यापूर्वी लता मंगेशकर यांनाही असे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते व त्यांनीही काहीशा नाखुशीनेच सभागृहात अधूनमधून उपस्थिती ठेवली होती. कलावंत, लेखक, क्रीडापटू यांनी राजकारणात भाग घ्यावा, अशी अपेक्षा नाही. किंबहुना, राजकारण त्यांना जमणारे नाही. त्यामुळे ते थेट निवडणुकीत भाग घेऊ न निवडून येऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांची वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. दुर्दैवाने या सर्व महान कलावंतांनी अभावानेच सभागृहातील चर्चेत भाग घेऊ न आपल्या कला वा क्रीडा क्षेत्राच्या समस्या मांडल्या आहेत अथवा त्याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. याला दोन कारणे असू शकतात. एक तर आपण आपले काम करावे. त्यातील अडचणी वगैरे आपल्यापुरत्या आहेत, त्याचे रडगाणे कशाला गायचे? ही या कलावंत, क्रीडापटूंची भावना असावी किंवा सभागृहात कोणतीच चर्चा गांभीर्याने होत नाही. निव्वळ गोंधळ, सभात्याग वगैरे होतात. तेव्हा अशी चर्चा करण्यात काय अर्थ आहे? अशी या कलावंतांची समजूत असू शकते. या दोन्हींपैकी कोणतेही कारण असले किंवा दोन्ही कारणे या कलावंतांच्या मौनी खासदार असण्यामागे असली, तरी ती घटनेतील या तरतुदीला निरर्थक ठरविणारी आहेत, असे म्हणावे लागेल. खरे तर या दोन-तीन कलावंतांच्या मौनी असण्यावरून असा निष्कर्ष काढणे काहीसे घाईचेही ठरेल, कारण यापूर्वी अनेक कलावंत, लेखक, क्रीडापटू यांनी त्यांना नियुक्त खासदार म्हणून मिळालेल्या संधीचा चांगला वापर केला आहे व सभागृहात चमकदार भाषणेही केली आहेत. थोडक्यात, त्यांना मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे केवळ रेखा किवा सचिन सभागृहात येत नाहीत आणि कामकाजात भाग घेत नाहीत म्हणून अशा लोकांच्या नियुक्तीची तरतूद निरर्थक ठरू नये. तरीही रेखा किंवा सचिनसारख्या सभागृहाच्या कामकाजाबद्दल आस्था नसणाऱ्या कलावंत व खेळाडूची अशा जागेसाठी निवड करावी का, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कलावंत, खेळाडू यांनी आत्ममग्न आणि काहीसे लहरी असणे समजण्यासारखे आहे. कारण, त्यांच्या मनाची जडणघडण आणि अवस्था ही अन्य सामान्य माणसांपेक्षा वेगळी असते. पण, ते समाजापासून पूर्ण तुटलेले असणे, हे घातक असते. आजचे बहुतेक चित्रपट कलावंत आणि खेळाडू हे समाजापासून तुटलेले आहेत, हे त्यांच्या सार्वजनिक वर्तनावरून दिसून येते. अन्यथा, रात्री पार्ट्यांमध्ये तर्रर्र होऊ न फुटपाथवरच्या गरिबांना चिरडणारे कलावंत कोणतीही खंत न बाळगता ताठ मानेने मिरवताना दिसले नसते. खेळाचा व्यापार करून त्यात गुन्हेगारी हितसंबंध जोपासणारे खेळाडूही दिसले नसते. हल्ली सामाजिक जाणीव हा शब्द एरवीच कोशातून हद्दपार होताना दिसत आहे. मग तो या आत्मकेंद्री कलावंतांना माहीत असण्याची शक्यता कमीच. बहुतेक कलावंत हे काचेच्या बंगल्यात राहत असल्यामुळे त्यांना समाजाच्या प्रश्नांची माहितीच नसते. असे असले तरी काही अपवादात्मक उदाहरणे कलाक्षेत्रात आहेत; जे आपल्याभोवतीच्या वलयाचा उपयोग समाजकार्यासाठी करीत असतात. केवळ अशा आणि अशाच कलावंत, लेखक, खेळाडू यांना राज्यसभेसारख्या सन्माननीय सभागृहाचे सदस्यत्व देताना विचार व्हावयास हवा. नाही तर आपण का सदस्य झालोय आणि सभागृहात बसून करायचे काय, असा प्रश्न पडणाऱ्यांचा ना त्यांच्या क्षेत्राला फायदा, ना समाजाला. सुदैवाने महाराष्ट्रात सामाजिक जाणीव असलेल्या कलावंतांची कमतरता नाही. किंबहुना, राजकीय-सामाजिक जाणिवेतून कलेला जवळ करणारे अनेक कलावंत महाराष्ट्राला लाभले आहेत. त्यांना त्यांच्या सामाजिक-राजकीय कार्यासाठी त्यांच्या कलेचे व्यासपीठ पुरते. पण, त्यांच्या राजकीय व सामाजिक भूमिका इतक्या स्वच्छ व सडेतोड आहेत, की त्यांची नियुक्ती ही सर्वच राजकीय पक्षांना अडचणीची वाटू शकते. इतके स्पष्ट बोलणारे कलावंत कोणालाच परवडणारे नसतात. त्यामुळे रेखा, सचिनसारख्या मुक्या बाहुल्यांची निवड केली जाते की काय, कळत नाही. अशा मान्यवर नियुक्यांची तरतूद घटनाकारांनी ज्या हेतूने केली आहे, तो हेतूच अशा नियुक्त्यांनी साध्य होत नाही. तेव्हा यात राजकीय पक्षांचाही तितकाच दोष आहे. त्यामुळे अशा जागांवरच्या नियुक्त्या करण्यापूर्वी त्याची जाहीर चर्चा करणे व सर्वसाधारणपणे जनमताचा अंदाज घेण्यास काहीच हरकत नसावी.

Web Title: Sachin and the line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.