धुळ्यातले १,८४,८४,२०० रुपये : रफादफा करू नका!

By यदू जोशी | Updated: May 23, 2025 08:54 IST2025-05-23T08:53:20+5:302025-05-23T08:54:24+5:30

विधिमंडळ समित्यांचे दौरे म्हटले की, ‘कलेक्शन’ आलेच! धुळ्याच्या घटनेने पुरती अप्रतिष्ठा झाली आहे. या समित्या ठेवा; पण त्यांच्या दौऱ्यांचा उच्छाद थांबवा!

rs 1 84 84 200 in dhule do not waste it | धुळ्यातले १,८४,८४,२०० रुपये : रफादफा करू नका!

धुळ्यातले १,८४,८४,२०० रुपये : रफादफा करू नका!

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

विधिमंडळाच्या विविध समित्यांचे उद्घाटन १९ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले; तेव्हा ते जे काही बोलले होते त्याचे गांभीर्य समित्यांनी लगेच ओळखले असते तर धुळ्यातील घटना घडलीच नसती. फडणवीस म्हणाले होते, ‘गतकाळात काही समित्या बऱ्याच बदनाम झाल्या होत्या, ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडलेले होते. आता तसे होऊ देऊ नका, चांगले काम करा.’- मुख्यमंत्री हे बोलून दोन  दिवसही उलटत नाहीत तोच धुळ्यात खोतकर यांचे समिती पीए किशोर पाटील यांच्या नावाने आरक्षित असलेल्या खोलीत १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये सापडले.  हा मामला कोणाला कळलाही नसता. पण अशा घटनांचा कधीकाळी भाग राहिलेले धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्याच्या विश्रामगृहात ठिय्या मांडला, नोटांची मोजदाद करवून घेतली आणि एकूणच सगळा भांडाफोड केला. 

खोतकर यांच्या समितीला मानले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केल्याबरोबर दोनच दिवसात दौरा सुरू केला.  इतकी काय घाई  होती? आठ-पंधरा दिवस अभ्यास करायचा. बरं, हे किशोर पाटील  विधानमंडळात कक्ष अधिकारी आहेत. ते म्हणे चार-पाच दिवसांपासून धुळ्यात होते. हा गडी गेली अनेक वर्षे अंदाज समितीच्या अध्यक्षांचाच पीए असतो. खरेतर कक्ष अधिकाऱ्याच्या खालचा कर्मचारी हा विधिमंडळ समिती अध्यक्षांकडे पीए म्हणून दिला जातो; पण किशोर पाटील अपवाद . कसे?- त्याची चौकशी झाली पाहिजे. 

वर्षानुवर्षे या महाशयांना अंदाज समितीतच पीए का व्हायचे असते, याचा अंदाज तुम्हाला आला असेलच आता. माहिती अशी आहे की समिती अध्यक्ष  खोतकर यांचा पीए म्हणून किशोर पाटील यांची ऑर्डरच निघालेली नव्हती, तरीही हा पठ्ठ्या धुळ्यात जाऊन बसला.  विधानभवनचा कर्मचारी; त्यामुळे ‘स्टाफ’ म्हणून पाठविले होते, असे कारण उद्या दिले जाईल. उद्या धुळ्याचे प्रकरण रफादफा करतील, उगाच हक्कभंग वगैरेची आफत नको म्हणून माध्यमे फारसे लिहिणार नाहीत. अनेक कारणे देऊन धुळ्यातील ती रक्कम पवित्र करवून घेण्याचे प्रयत्नही होतील. अनेकांचा बचाव केला जाईल; पण या निमित्ताने विधानमंडळाच्या सन्मानाला मोठा धक्का बसला, त्याचे काय? तांत्रिकदृष्ट्या स्वत:चा बचाव करून घ्याल; पण जनतेच्या नजरेतून पडाल त्याचे काय करणार?
 
समित्यांचे दौरेच नकोत

किशोर पाटील एकट्याने सगळे करतात, असे म्हणण्यातही काही अर्थ नाही, या महाशयांना वाट्टेल तसे वागण्याची मोकळीक कोणी दिली, त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. अंदाज समितीला अमर्याद अधिकार आहेत. अर्थसंकल्पित निधीचा वापर योग्य रितीने होतो की नाही, हे पाहण्याचा अधिकार असल्याने कोणत्याही विभागात ही समिती तोंड मारू शकते; पण धुळ्यातील घटनेने तोंड काळे होण्याची वेळ आली आहे. 

अंदाज, पंचायत राज, लोकलेखा अशा विधिमंडळ समित्यांचे दौरे म्हटले की ‘कलेक्शन’ हे आलेच. अधिकारी आपापल्या परीने रक्कम जमा करतात आणि समिती सदस्यांना देतात; याचे किस्से  अनेकदा छापून आले आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांना या समित्या आल्या की धस्स होते, प्रामाणिक अधिकाऱ्यांनाही द्यावे लागतात कारण तेही सिस्टिमच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. 

दिलीप वळसे पाटील विधानसभा अध्यक्ष होते तेव्हा समित्यांच्या दौऱ्यांनी उच्छाद मांडला होता. पाटील यांनी मग समित्यांचे दौरेच बंद करून टाकले. तशी हिंमत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दाखवायला हवी. समित्या ठेवा; पण दौरे बंद करून टाका. तसे झाले तर खोतकरांच्या नावाने इतर समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य बोटे मोडतील; पण निदान विधानमंडळाची आणि आमदारांची बदनामी तर थांबेल? नार्वेकरजी आणि शिंदेजी, धुळ्यातील घटनेने अंतर्मुख व्हा. विधिमंडळाचा कारभार एकूणच पारदर्शक व्हावा, यासाठी आपण काय करणार आहात, याची महाराष्ट्र वाट पाहत आहे. सभागृहात कोणी आक्षेपार्ह बोलले तर आपण ते कामकाजातून काढून टाकता; पण विधानमंडळाच्या कारभारावर धुळ्याच्या निमित्ताने येत असलेले आक्षेप कसे काढून टाकणार ते सांगा. 

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विचारले जाणारे प्रश्न, लक्षवेधी आणि त्या आडून होत असलेल्या अनेक गोष्टी गंभीर आहेत. मकरंद, राजेश, किशोर या नावांचा आणि त्यांच्या ‘कर्तृत्वा’चा शोध घ्या, शब्द ‘थिटे’ पडतील. अध्यक्ष नार्वेकर यांनी हाकललेला माणूस विधान परिषदेच्या एका पिठासीन अधिकाऱ्याकडे पवित्र करून घेतला गेला आहे. विधानमंडळाचे सचिव विधानभवनातील बदमाशांना वठणीवर आणण्याचे काम करताना दिसत नाहीत. 

जाता जाता : कोलकात्याच्या ‘मेयर इन कौन्सिल’ पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी तीसएक वर्षांपूर्वी नागपूरचे काही नगरसेवक तिथे गेले होते. तेव्हा कोलकात्याचे महापौर हे कम्युनिस्ट पक्षाचे होते. त्यांच्या कक्षात दोन पात्यांचा अगदी जुना पंखा होता.  नगरसेवक त्यांना म्हणाले, ‘तुम्ही तीन-चार पात्यांचा नवा पंखा का बसवत नाही?’ महापौर म्हणाले, ‘शक्य नाही ते.  मी तसे केले तर माझा पक्ष मला पैशांची उधळपट्टी करत असल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावेल. कदाचित माझे महापौरपदही जाईल.’- तेव्हा आपले नगरसेवक अवाक् नाहीतर दुसरे काय होणार?  

yadu.joshi@lokmat.com

Web Title: rs 1 84 84 200 in dhule do not waste it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.