शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

राईट टु एज्युकेशनकडून राईट एज्युकेशनकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 11:29 IST

‘शिक्षण हे जग बदलण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे’ असे नेल्सन मंडेला यांनी म्हटलेले आहे. काळाप्रमाणे आपली शस्त्रे धारदार करण्याबरोबरच ज्या प्रकारच्या युद्धाची सिद्धता

‘शिक्षण हे जग बदलण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे’ असे नेल्सन मंडेला यांनी म्हटलेले आहे. काळाप्रमाणे आपली शस्त्रे धारदार करण्याबरोबरच ज्या प्रकारच्या युद्धाची सिद्धता आपण करत आहोत त्याप्रकारची शस्त्रे आपल्या भात्यात असणेही तेवढेच गरजेचे आहे. संरक्षण सिद्धतेबरोबर शिक्षण सिद्धताही आवश्यकच आहे. यापुढील युद्धे कदाचित प्रत्यक्ष रणांगणावर खेळली जाण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या आधारेच खेळली जातील. त्याची छोटीशी चुणूक अलीकडे जगभर धुमाकूळ घालणाऱ्या रॅन्समवेअर वायरसने आपल्याला दाखवली आहे. अर्धे जग त्याने काही दिवसांपूर्वी ठप्प केले होते. या पार्श्वभूमीवर प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी भविष्यातील शिक्षणाविषयी जे विधान केले आहे त्याला महत्त्व आहे. ते म्हणतात, ‘‘शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन) सर्वांना शिक्षणाचा हक्क दिला असला तरी आता त्यापुढे जात आपण योग्य शिक्षणाची (राईट एज्युकेशन) कास धरली पाहिजे.’’ आपला भवताल सुसाट गतीने बदलत असताना आपल्याकडे सुरूअसलेले घोकमपट्टी शिक्षण पदवी पलीकडे आपल्या हाती फारसे काही देणार नाही हेच खरे. आजही ते कारकुनांची पैदास करते आहे यात थोडीही अतिशयोक्ती नाही. तंत्रज्ञान द्रुतगतीने आपल्या आयुष्यात घुसलेले आहे. त्याने व्यापला नाही असा एकही कोपरा आज दाखवता येणार नाही. पुढील ५० वर्षांत येणाऱ्या तंत्रज्ञानाचा विचार केल्यास अनेक कामे त्या आधारेच होणार आहेत. मनुष्यबळ लावावे लागेल अशी फारच कमी क्षेत्रे शिल्लक राहतील आणि त्यातून बेरोजगारीचा प्रश्न आवासून समोर उभा राहील. हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातच होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भविष्यात आपल्याला कौशल्याधारित शिक्षणाची गरज भासणार आहे. तंत्रज्ञानामुळे भारतात ५५ टक्के नोकऱ्या कमी होण्याची शक्यता ते वर्तवतात. नीती आयोगाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानेही बेरोजगारी वाढत असल्याच्या दाव्याची पुष्टी केली आहे. घोकमपट्टी शिक्षणावर टीका करताना डॉ. माशेलकर म्हणतात, ‘‘आजचे शिक्षण हे शिक्षककेंद्री आहे, ते विद्यार्थीकेंद्री झाले पाहिजे.’’ विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अनुमानाने काढलेले ठोकताळे विद्यार्थ्यांच्या मेंदूत कोंबणे हे शिक्षण नाही आणि तो शिक्षणाचा उद्देशही नाही. शिक्षणाने विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवले पाहिजे, आपण काय विचार करायचा हे शिकवू लागलो असल्याने सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षणात त्यामुळे साचलेपणा आलेला आहे. आज प्रयोगशील शिक्षणाची गरज असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक व्यक्त होण्याची संधी हवी आहे. खरे तर आजची पिढी मागील पिढ्यांच्या तुलनेत माहिती, समज आणि बुद्धिमत्तेत कैक योजने पुढे आहे. पण त्यांची अडचण ही की आजच्या शिक्षण व्यवस्थेने त्यांना ठाकूनठोकून जुन्याच मापात बसवायचे प्रयत्न चालवले आहेत. माहितीची प्रचंड सुनामी विद्यार्थ्यांवर आदळत आहे. त्यामुळे अनेकदा शिक्षक शिकवत असलेल्या बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना अगोदरच माहीत असतात. पण केवळ करिकुलमची गरज म्हणून त्याच त्याच गोष्टी सांगण्यात मानवी तास फुकट घालवण्यापेक्षा विचारप्रवृत्त करणारे काही तरी विद्यार्थ्यांसमोर ठेवले पाहिजे. तशा अनेक शहरी शाळा आज ‘स्मार्ट’ झालेल्या आहेत. स्मार्ट क्लासरुमची संकल्पना बऱ्यापैकी बाळसे धरू लागली आहे. दुर्दैवाने आपण केवळ देखाव्यांना बळी पडत आहोत. वर्ग ‘स्मार्ट’ झाले म्हणजे काय झाले तर अगोदर खडूने फळ्यावर जे लिहिले जायचे ते आता शिक्षक स्लाईड टाकून प्रोजेक्टरवर मुलांना दाखवू लागले आहेत. ही स्वत:ची घोर फसवणूक आहे. पूर्वी एखाद्या देवतेचे व्रत केल्याने मला कसा लाभ झाला आणि ज्याने केले नाही तो कसा देशोधडीला लागला हे सांगणारी पोस्टकार्डे येत. ती दहा जणांना पाठवा, आठ दिवसांत शुभ गोष्टी घडतील, साखळी तोडल्यास नुकसान सहन करावे लागेल असे काहीबाही त्यात असे. पण आपण ‘स्मार्ट’ झाल्यानंतर या गोष्टी मागे पडल्या आणि आपण आता त्याच गोष्टी मोबाईलवर वॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून करू लागलो आहोत. आपल्या शिक्षणाची गतही तीच आहे. स्मार्ट क्लासरुम संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात यायची असेल तर विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करायला शिकले पाहिजे. त्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकच नव्हे तर समाजाच्याही मानसिकतेत बदल करण्याची गरज माशेलकर यांनी बोलून दाखवली आहे. तंत्रज्ञान बदलत जाईल तसे नेमके कोणत्या प्रकारची कौशल्ये आपल्याला लागणार आहेत याचा एक आराखडा तयार करून त्या आधारे नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करावा लागेल. शिक्षणाला दैनंदिन जीवनाशी जोडण्याचा जेवढा अधिक प्रयत्न होईल तेवढे आजचे शिक्षण व्यवहारोपयोगी होईल. ‘‘सर्जनशीलता हे भविष्यातील यशाचे गमक आहे आणि प्राथमिक शिक्षक मुलांत सर्जनशीलता रुजविण्याचे कार्य करू शकतात’’ असे आपले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. तेव्हा मुलांना आपण काही तरी ‘शिकवतो’ आहोत या मानसिकतेतून लवकरात लवकर बाहेर पडून शिक्षण हा सर्जनशीलतेचा उत्सव होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भविष्यातील संकटे आणि संधींना भिडण्याच्या योग्यतेचे होऊ.