तिरंग्याचा सन्मान राखा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:26 AM2018-08-14T00:26:33+5:302018-08-14T00:27:00+5:30

स्वातंत्र्य दिन किंवा गणतंत्र दिन आला की देशभरात देशभक्तीचे वारे वाहू लागतात. विविध संघटनांकडून हे राष्ट्रीय सण धूमधडाक्यात साजरे करण्याची तयारी सुरू होते. नागपुरातील तरुणाईचा समावेश असलेल्या एका संघटनेकडून मात्र स्वातंत्र्यदिनाच्या सप्ताहात ‘तिरंगा सन्मान’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

 Respect the Tiranga | तिरंग्याचा सन्मान राखा

तिरंग्याचा सन्मान राखा

googlenewsNext

स्वातंत्र्य दिन किंवा गणतंत्र दिन आला की देशभरात देशभक्तीचे वारे वाहू लागतात. विविध संघटनांकडून हे राष्ट्रीय सण धूमधडाक्यात साजरे करण्याची तयारी सुरू होते. नागपुरातील तरुणाईचा समावेश असलेल्या एका संघटनेकडून मात्र स्वातंत्र्यदिनाच्या सप्ताहात ‘तिरंगा सन्मान’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. चौकाचौकांमध्ये, रस्त्यांवर पडलेले, अनवधानाने फाटलेले किंवा चुरगळल्या गेलेले कागदी झेंडे गोळा करण्याचे काम या संघटनेकडून करण्यात येईल. वरकरणी हे वृत्त फार मोठे वाटत नसले तरी व्यापक पातळीवर याचे महत्त्व फार मोठे आहे. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी एखाद्या संघटनेला समोर यावे लागते हे समाजातील कृतिहीनता व असंवेदनशील वाढली असल्याचेच द्योतक आहे. ज्या तिरंग्याला घडविण्यासाठी, त्याला उंच करण्यासाठी अगणित स्वातंत्र्यसैनिक, सैन्याचे जवानांनी स्वत:च्या जीवाचे बलिदान केले, त्याचे मोलच उरले नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येते. स्वातंत्र्यदिनी जागोजागी तिरंग्याचा सार्वजनिकपणे अपमान होताना दिसतो. गाड्यांवर लावण्यासाठी, मोटारसायकल रॅलीवर मिरविण्यासाठी तिरंगे उत्साहाने घेतले जातात. मात्र अतिउत्साहात तिरंग्याचा अपमान होत असल्याची जाणदेखील राहत नाही. भरधाव वेगाने मोटारसायकल दामटत असताना तिरंगा कधी रस्त्यावर पडतो हे कळतदेखील नाही. रस्त्यावर तिरंगा पडलेला दिसला तरी त्याला उचलण्याची तसदी फारच कमी नागरिक घेतात. रस्त्यांवर पडलेल्या कागदी झेंड्यावरून चालताना किंवा वाहन चालविताना थोडीदेखील लाज वाटत नाही. मुळात आपण चुकतो आहे, अशी भावनादेखील अनेकांच्या मनात येत नाही. मागील काही वर्षांपासून अशा प्रकारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भरीस भर म्हणजे प्रशासनाकडूनदेखील यासंदर्भात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. आपला देश राष्ट्रीय अस्मितेला जागविणाऱ्या महान देशभक्तांच्या संस्कारांनी घडलेला आहे. मात्र आज त्याच संस्कारांवर असंवेदनशीलतेची माती लोकांकडून टाकण्यात येत आहे. ही स्थिती केवळ नागपुरातच नव्हे तर देशातील प्रत्येक भागात दिसून येते. तिरंग्याला जर जिव्हा असती तरी त्याने त्याच्यासाठी झटलेल्या देशभक्तांच्या वेदना नक्की बोलून दाखविल्या असत्या. आपल्या देशाची संस्कृती, शौर्य, धैर्य व त्याग यांचे राष्ट्रध्वज तिरंगा प्रतीक आहे. तिरंग्याचा सन्मान राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही. प्रत्येक नागरिकाने स्वत: यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. पुढील पिढ्यांचा विश्वास मजबूत करण्यासाठी व सन्मानाची भावना जागविण्यासाठी आज यासाठी पाऊल उचलले गेलेच पाहिजे.

Web Title:  Respect the Tiranga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.