पत्रकारितेची विश्वासार्हता रसातळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:24 IST2019-10-04T05:22:56+5:302019-10-04T05:24:23+5:30

फेक न्यूजचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बातमी तयार करून प्रसारित करण्याची सामान्य माणसाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आपल्या हाती जी बातमी पडते ती खरीच आहे का, हे सांगणे कठीण होत चालले आहे.

Reliability of journalism in the abyss | पत्रकारितेची विश्वासार्हता रसातळाला

पत्रकारितेची विश्वासार्हता रसातळाला

- संतोष देसाई
माजी सीईओ फ्यूचर ब्रॅण्ड्स


फेक न्यूजचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बातमी तयार करून प्रसारित करण्याची सामान्य माणसाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आपल्या हाती जी बातमी पडते ती खरीच आहे का, हे सांगणे कठीण होत चालले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात विचारांचे ध्रुवीकरण झाले असल्याने प्रत्येकाला घडलेल्या घटनेचे स्वत:चे आकलन हेच योग्य असल्याचे वाटते!
फेक न्यूजचा स्वीकार करण्याचे प्रमाणही जे वाढले आहे, त्याची अनेक कारणे आहेत. बातमीचे स्वरूप निश्चित असते, हा समजच चुकीचा ठरला आहे. लोक बातमीपेक्षा त्यामागे काय असावे, हे जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत. त्यामुळे आहे तशी बातमी वाचून त्यांचे समाधान होत नाही. त्यांच्यापुढे जे वास्तव सादर होते ते रचलेले आहे असे त्यांना वाटून, त्यांना काय वाटते ते त्या बातमीशी जोडतात. येणारी प्रत्येक बातमी मीडियाकडून वेगवेगळ्या स्वरूपात मांडण्यात येते. ही मांडणी त्या त्या मीडियाचे संबंध आणि हिताला धरून केलेली असते. ही बातमी कोण पुरवतो आणि पूर्वी त्याविषयी कोणतेही प्रश्न उपस्थित केले जात नव्हते, ते आजच का उपस्थित केले जातात?
मीडियाने प्रयत्नपूर्वक स्वत:भोवती अधिकाराची आभा निर्माण केलेली आहे. त्यासाठी अनेक साधनांचा वापर करण्यात आला आहे. काही वृत्तपत्रांच्या नावात किंवा त्यांच्या संपादकांच्या नावाभोवती आभा निर्माण होते. त्या वृत्तपत्रातील बातम्यांच्या आणि भाषेच्या अचूक वापराबद्दल लोकांना विश्वास वाटतो. वास्तविक मीडिया हा कधीच वस्तुनिष्ठ असू शकत नसला तरी, त्या संस्थेभोवती जे वलय निर्माण होते तेच त्या संस्थेला ताकद आणि विश्वासार्हता देत असते. तिने पत्रकारितेच्या मूल्यांची निर्मितीही केलेली असते.
पण डिजिटल मीडियाच्या आगमनानंतर बातम्यांविषयी अविश्वासाची भावना निर्माण झाली आणि वृत्तपत्रांभोवती असलेले वलय कोसळू लागले. बातमीच्या वस्तुनिष्ठतेविषयीची भावना पंक्चर झाल्यामुळे वस्तुस्थितीची भिन्न भिन्न रूपे पाहायला मिळू लागली. जगाकडे विशिष्ट नजरेने बघण्याची दृष्टी ‘तयार’ करण्यात आली. बातम्यांचे पावित्र्य नष्ट झाल्याने स्वत:ची भूमिका मांडणाऱ्या बातम्यांचा लोकांकडून अधिक स्वीकार होऊ लागला!
खरी समस्या आणखी गंभीर आहे. मनुष्य या नात्याने सत्याला आपल्या लेखी काही किंमत उरली नाही. वस्तुस्थितीला तोंड देण्यापलीकडे आपल्याला अनेक गरजांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे स्वत:चे समाधान करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. तसेच नकोशा वाटणाºया गोष्टींविषयी आपण संताप व्यक्त करीत असतो. त्यामुळे आपण जे ऐकतो आहोत तेच खरे आहे याविषयी खात्री मिळावी, अशी आपली अपेक्षा असते. कधी कधी ते खरे नाही हे आपणास ठाऊक असते, तरीही आपण ते खरे असल्याची समजूत करून घेतो. आपण आपल्याच आयुष्याकडे बघितले तर कोणत्याही घटनेच्या दोन वर्णनात साम्य आढळणार नाही किंवा आपण आठवणीतून लिहिलेल्या दोन संवादांतही सारखेपणा नसतो. प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून त्या घटनेचे वर्णन करीत असतो. त्यात स्वत:ची भर घालून ते अधिक रोचक करीत असतो. प्रत्येक वेळी सत्यापासून दूर जाण्याचाच आपला प्रयत्न असतो. सत्य शोधण्याचा प्रयत्न करणे दुरापास्तच असते!
पत्रकाराचा स्पर्श न झालेली बातमी ही एखाद्या घटनेभोवती गुंडाळलेल्या झग्यासारखी असते. थोडी काव्यात्म, थोडी गद्यात्मक, अवास्तवात गुंडाळलेली ती असते. त्याचे बाह्य जगावर काय परिणाम होतील, याची कुणी काळजी करीत नाही. मग स्वत:ला आवडेल तशा स्वरूपात बातमी सादर होते. काश्मीरमध्ये काय सुरू आहे, हे समजल्याने आपल्या दैनंदिन जीवनात कोणता फरक पडतो? मग ज्यामुळे आपले समाधान होते तेच बातमीचे स्वरूप स्वीकारले जाते! घटनेचे यथातथ्य चित्रण म्हणजे बातमी, हे पत्रकारांचे संशोधन आहे. आजच्या काळात मनोरंजन आणि गुन्हेगारी यांना अधिक मागणी आहे. तपशिलापेक्षा सादरीकरण महत्त्वाचे झाले आहे.
डिजिटलच्या आगमनापूर्वीच हा प्रवाह दिसू लागला होता. पण सोशल मीडिया हा लाखो लोकांच्या नेटवर्कशी जुळलेला आहे. त्यातून प्रत्येक जण आपली भूमिका मांडू लागला आहे. या नव्या विकेंद्रित जगात पत्रकारही वाहवत गेले आहेत. तपशील महत्त्वाचा आहे ही पत्रकारांनी वर्षानुवर्षे जपलेली वस्तुस्थिती, त्यांनी स्वत:च त्यागली असून त्यांनी आपल्या व्यवसायाशी तडजोड करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हताच संपुष्टात आली आहे. आता ते केवळ नट म्हणून शिल्लक राहिले आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हेच त्यांचे ध्येय उरले आहे. त्याचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे वस्तुनिष्ठ बातम्यांपासून ते दूर जाऊ लागले आहेत. बातम्यांतील तथ्य तपासण्यासाठी तपासनीस नेमावे लागत असतील तर पत्रकारिता ही संस्था कशासाठी निर्माण झाली होती?
फेक न्यूजसंबंधी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, लोकांना तो प्रश्नच वाटत नाही! आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मग सरकारही खोटी आकडेवारी तयार करू लागते, चॅनेल्स बनावट घटना तयार करतात, त्यामुळे वृत्त-तपासनीस हे अनावश्यक बोअर वाटू लागतात. ग्राहक या नात्याने वाचक आणि दर्शक खूश आहेत ना, एवढेच बघितले जाते.

Web Title: Reliability of journalism in the abyss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.