नि:संकोच पुढे होऊन बहुमोल प्राण वाचवा!

By विजय दर्डा | Published: February 11, 2019 12:46 AM2019-02-11T00:46:20+5:302019-02-11T00:46:48+5:30

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेली व्यक्ती रस्त्यावर प्राणांतिक वेदनांनी विव्हळते आहे, बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे; पण त्यांच्यापैकी कोणीही त्या जखमीला तातडीने इस्पितळात नेण्यासाठी पुढे येत नाही.

Relax and save precious life! | नि:संकोच पुढे होऊन बहुमोल प्राण वाचवा!

नि:संकोच पुढे होऊन बहुमोल प्राण वाचवा!

Next

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेली व्यक्ती रस्त्यावर प्राणांतिक वेदनांनी विव्हळते आहे, बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे; पण त्यांच्यापैकी कोणीही त्या जखमीला तातडीने इस्पितळात नेण्यासाठी पुढे येत नाही. हे चित्र आपल्या देशात नेहमी पाहायला मिळते. बऱ्याचदा या दिरंगाईमुळे जखमीचे प्राण गेले की लोक पुढे सरसावतात, म्हणूनच जोश मलिहाबादी यांनी लिहिले आहे.
जंगलों मे सर पटकता 
जो मुसाफिर मर गया
अब उसे आवाज देता
कारवां आया तो क्या
अशा अपघाताच्या वेळी मदत करण्याच्या बाबतीत लोकांच्या उदासीनतेचा कटू अनुभव मी आणि माझ्या कुटुंबाने घेतला आहे. अलीकडेच माझी सून रचना सहा लेनच्या मथुरा-दिल्ली हायवेवरून मोटारीने जात होती. माझे दिल्लीतील ड्रायव्हर गजेंद्र सिंग मोटार चालवत होते. अचानक गजेंद्र सिंग यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला व त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. तशा अवस्थेतही १००-१२० कि.मी. वेगाने धावणारी मोटार गजेंद्र सिंग यांनी सुरक्षितपणे पहिल्या लेनमध्ये आणली. त्यांनी मोटार थांबवली व स्टिअरिंग व्हीलवर डोके टेकून ते बेशुद्ध झाले. मोटार तिसºया किंवा चौथ्या लेनमध्ये असताना गजेंद्र सिंग बेशुद्ध झाले असते तर भयंकर अपघात झाला असता; पण त्यांनी मोटार सुरक्षित जागी नेऊन उभी करण्याचे प्रसंगावधान राखले. गजेंद्र सिंग बेशुद्ध होताच रचना लगेच मोटारीतून खाली उतरली. पुढची १५ मिनिटे रचना येणाºया-जाणाºया वाहनांना हात दाखवून मदतीची याचना करत राहिली. काही वेळाने दोन जण थांबले; पण तेवढ्यात मी व चिरंजीव देवेंद्र तेथे पोहोचलो. आम्ही गजेंद्र सिंग यांना इस्पितळात नेले; पण तोपर्यंत त्यांनी अंतिम श्वास घेतला होता. त्या १५ मिनिटांत रचनाच्या हाका ऐकून एखाद्याने गाडी थांबवून गजेंद्र सिंग यांना त्वरेने इस्पितळात नेले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते.
‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने अलीकडेच देशातील ११ मोठ्या शहरांमध्ये एक सर्वेक्षण केले. रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्यात पुढाकार घेणाºयांना कायद्याने कसे संरक्षण दिले आहे व कोणत्या सुविधा दिल्या आहेत, याची ८४ टक्के लोकांना कल्पनाही नाही, असे या सर्वेक्षणातून दिसून आले. एवढेच नव्हे तर डॉक्टर, वकील व इस्पितळ कर्मचाºयांनाही या बाबींची माहिती नसते.
या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांशी मी पूर्णपणे सहमत आहे. रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी लोक पुढे का येत नाहीत, हे या सर्वेक्षणावरून स्पष्ट होते. लोकांच्या मनात पोलिसांची भीती असते. मदत करायला पुढे गेलो तर ‘आ बैल मुझे मार’सारखी आफत आपल्यावर ओढवेल, अशी प्रत्येकाला काळजी असते. लोकांना वाटत असते की, पोलीस अपघाताविषयी आपल्याला विचारतील, वारंवार पोलीस ठाण्यात खेटे घालावे लागतील, एखाद्याचे प्राण वाचविले म्हणून कौतुक करण्याऐवजी आपल्यालाच गुन्हेगार असल्यासारखी वागणूक मिळेल. एखाद्याने अपघातातील जखमीला जवळच्या इस्पितळात नेले तरी तेथील डॉक्टर व कर्मचाºयांचा दृष्टिकोनही काही करून हे झंझट टाळण्याचाच दिसतो. एखाद्याचा जीव आपण वाचवू शकलो ही अनुभूती अद्भूत असते; पण आपण संवेदनशून्य झालो आहोत. मदत करायला आपण उदासीनता दाखवतो. याला जबाबदार कोण?
अशी दुर्दैवी परिस्थिती येण्यास केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहेत. रस्ते अपघातांमधील जखमींचे प्राण वाचविण्यासाठी पुढे येणाºयांना संरक्षण देणारे कायदे व नियम केले आहेत, हे खरे. मदत करणाºयाची व्यक्तिगत माहिती पोलीस विचारू शकत नाहीत, चौकशीच्या नावाखाली वारंवार खेटे घालायला लावूू शकत नाहीत, असे हे नियम सांगतात. खासगी व सरकारी इस्पितळांनाही पोलिसी सोपस्कार होण्याची वाट न पाहता तातडीने जखमींवर उपचार सुरू करण्याची सूट देण्यात आली आहे. या बाबतीत मी दिल्ली पोलीस व दिल्ली सरकारचे अभिनंदन करीन. रस्ते अपघात कसे टाळावेत, अपघातातील जखमींना मदत करणाºयांना कायद्याने कसे संरक्षण दिलेले आहे, याविषयी दिल्ली पोलीस व दिल्ली सरकार माध्यमांमधून सतत जनजागृती करत असते. केंद्र किंवा अन्य राज्यांच्या सरकारांमध्ये मला ही संवेदनशीलता दिसत नाही.
रस्ते अपघातांमधील जखमींना मदत करण्यास लोक उत्सूक असतात; पण त्यांना त्या संबंधीच्या कायदेशीर अधिकारांची माहिती नाही. मनात असूनही लोक मदतीला पुढे येत नाहीत, यामुळे दरवर्षी अपघातांमधील हजारो जखमींचे प्राण वाचविता येत नाहीत. अपघातग्रस्तांना मदत करायला संकोच न करता पुढे या, त्याने तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, याचा प्रचार केंद्र व राज्य सरकारने युद्ध पातळीवर करायला हवा. माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, कितीही अडचणी असल्या तरी अपघातांमधील जखमींना मदत करण्यासाठी पुढे होण्यात संकोच करू नका. याने अनेकांचे प्राण वाचू शकतील आणि माणुसकी हरवलेल्या हल्लीच्या काळातही म्हणता येईल:
चंद हाथो मे ही सही महफूज हैं।
शुक्र है इंसानियत का भी वजूद हैं।

Web Title: Relax and save precious life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात