वैज्ञानिक क्षेत्राला प्रतिगाम्यांचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:06 AM2019-02-06T06:06:45+5:302019-02-06T06:08:25+5:30

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताला वैज्ञानिक विषयाची दिशा दिली़ इंडियन सायन्स काँग्रेसला १९६३ साली जवाहरलाल नेहरू, थोर शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर डी.एस. कोठारी उपस्थित होते़

Reclamation of the scientific field | वैज्ञानिक क्षेत्राला प्रतिगाम्यांचे ग्रहण

वैज्ञानिक क्षेत्राला प्रतिगाम्यांचे ग्रहण

googlenewsNext

-डॉ. सुभाष देसाई
धर्म व विज्ञानातील तज्ज्ञ

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताला वैज्ञानिक विषयाची दिशा दिली़ इंडियन सायन्स काँग्रेसला १९६३ साली जवाहरलाल नेहरू, थोर शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर डी.एस. कोठारी उपस्थित होते़ तेव्हापासून आजपर्यंत भारताचा प्रत्येक पंतप्रधान इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित असतो आणि त्यामध्ये देशाला एक नवा वैज्ञानिक आयाम देण्याचा प्रयत्न होतो़ १९९३ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी अशा एका परिषदेला उपस्थित होत्या. तिरुपतीत झालेल्या परिषदेला मी होतो. फिलासॉफी आॅफ सायन्स या विषयावरील पेपर सादर केला होता. हजारो शास्त्रज्ञ देशभरातून त्या परिषदेला उपस्थित होते. याच परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल पारितोषिक विजेते सर एन्डू हक्सले होत़े त्यांनाही मी भेटू शकलो. ही परिषद वैज्ञानिक पॉलिसी स्टेटमेंटसाठी शेवटची ठरली.
२०१४ साली भाजपा सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदी या परिषदेला उपस्थित राहतात़ परंतु दिवसेंदिवस या परिषदेतील वैज्ञानिक दृष्टी हरवत चालली आहे़ तेव्हापासून अंधश्रद्धेचा आणि संघ परिवारातील विचाराचा पगडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्याच महिन्यात जालंधरला झालेल्या या वैज्ञानिक परिषदेमध्ये छद्मविज्ञानाचा प्रवेश झाला आहे. यात मॅग्नेट थेरपी, पार्सलची पर्पेच्युअल मशीन्स आणि फ्लॅट अर्थ (सपाट पृथ्वी) असे विचार मांडणारे वैज्ञानिक होते. इतर क्षेत्रांप्रमाणे संघ परिवाराने आणि अनेक शाखांनी भाजपाच्या आशीर्वादाने राजकीय व धार्मिक अजेंडा या वैज्ञानिक परिषदेमध्ये घुसडला आहे़ मग मुंबईला २०१५ मध्ये झालेले सेशन असो. ‘प्राचीन भारतीय संस्कृतीमधले विज्ञान’ असा परिसंवादाचा विषय होता़ खुद्द नरेंद्र मोदींनी मुंबईच्या अधिवेशनामध्ये गणपती देवतेचे उदाहरण देऊन प्लॅस्टिक सर्जरी प्राचीन भारतात होती, असा दावा केला आणि महाभारतातील कर्णाचा जन्म स्टेमसेलमधला, असा दावा मोदींनी केला़ इतकेच नव्हे तर विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे मंत्रीच म्हणाले, वेदामधले जे सिद्धांत आहेत ते अल्बर्ट आइनस्टाइनच्या सिद्धांतापेक्षा खूपच प्रगत होते. युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनने आता ज्योतिषशास्त्राचे कोर्सेस विद्यापीठात चालू करायला परवानगी दिली़ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन बेस्ड आॅन नार्को अ‍ॅनालिसिस आणि पोलिग्राफ, गोमूत्र आणि गायीचे शेण यावर संशोधन. हे काय विद्यापीठाचे वैज्ञानिक संशोधन आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशल ब्रेन, सूर्य मालिकेपलीकडे झेप, पर्यावरणाचे प्रश्न, नद्यांचे प्रदूषण, मानवी आरोग्य, सकस आहार हे विशेष सोडून कुठल्या कुठल्या भूतकाळामध्ये रामायण-महाभारतामध्ये आम्हाला नेऊन सोडले आहे?
व्यंकटरामन रामकृष्णन हे नोबेल पुरस्काराने सन्मानित मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारतीय विज्ञान परिषदेला ‘एक सर्कस’ असे नाव दिले आहे. हा आता अर्थहीन मेळा बनला आहे. याला कारण भाजपा सत्तेवर आल्यापासून पंतप्रधानांचा लाळघोटेपणा केला की विज्ञान तंत्रज्ञान विभागात चांगली नोकरी मिळते. या भावनेने अनेक जण प्रतिगामी विचारांची री ओढायला लागलेले आहेत़ त्यामुळेच अनेक विद्यापीठांच्या कुलगुरूपदी संघ परिवारातील माणसे नेमण्यात आली आहेत. विज्ञान परिषदेसारख्या प्रचंड संख्येच्या परिषदांचा खर्च सरकारला करायचा नाही म्हणून खासगी विद्यापीठांना भाजपाने प्राधान्य दिले. जालंधरची परिषद ‘लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’ने प्रायोजित केली होती़ त्यामुळे पंतप्रधान येणार म्हटल्यावर अनेक सोयी-सुविधा या विद्यापीठाला मिळाल्या आणि मग त्याचा व्यावसायिकरीत्या उपयोग करून त्यांनी आपल्या खासगी विद्यापीठाचे प्रचंड उत्पन्न वाढवले़ परंतु मूलभूत वैज्ञानिक संशोधनामध्ये देश मागेच राहिला.
भारताच्या भावी पिढीला वैज्ञानिक शिक्षणाचे प्रगत ज्ञान मिळावे आणि मूलभूत संशोधन व्हावे असे जर वाटत असेल तर पंतप्रधानांना विज्ञान परिषदेला प्रमुखपदी बोलावण्याची प्रथा बंद करावी, असे काहींनी सुचवलेले आहे. विशेषत: भाजपा सरकारच्या प्रतिगामी विचारसरणीमुळे भारताची वैज्ञानिक आणि इतर पीछेहाट झालेली आहे. हे जर थांबवायचे असेल तर गुगलने चालवलेले संशोधन विचार करण्यासारखे आहे. त्याची जाहीर वाच्यता झालेली नाही़ पण नोव्हेंबर २०११ साली न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेल्या लेखामुळे ते उघड झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात या वैज्ञानिक प्रयोगशाळेने मोठी झेप घेतली आहे.
डॉक्टर दिलीप जॉर्ज हा भारतीय शास्त्रज्ञ परदेशात ब्ल्यू ब्रेन प्रोजेक्टवर काम करतो आहे़ लवकरच १०० बिलियन न्यूरॉन्सचे कृत्रिम मेंदू तयार होत आहेत़ याची जाण भारतीय तरुणांना देण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज होती. डॉक्टर स्टिफन हॉकिंग या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांशी माझा पत्रव्यवहार होता. या थोर शास्त्रज्ञांच्या मते देव, स्वर्ग, नरक या कल्पना खोट्या आहेत. मानव आपल्या कृतीने सुंदर पृथ्वी आणि मानववंशाचा नाश करीत आहे, असा इशारा त्यांनी दिला होता. परग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध घ्या, असेही त्यांनी सांगितले होते़ भारताचे आजचे जे वैज्ञानिक संशोधन सुरू आहे त्याचे फुकटचे श्रेय मोदी सरकारने घेण्याचे काहीच कारण नाही. कारण त्याचा पाया नेहरूंनी घातला होता़

Web Title: Reclamation of the scientific field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.