रेबेका बेबी म्हणते, असं कधीच झालं नव्हतं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 09:18 IST2025-08-02T09:17:21+5:302025-08-02T09:18:17+5:30
अचानक घडलेल्या या घटनेनं रेबेका अतिशय हादरून गेली. पण तशाही परिस्थितीत तिनं संपूर्ण विचारांती एक धाडसी निर्णय घेतला.

रेबेका बेबी म्हणते, असं कधीच झालं नव्हतं!
फ्रान्समधला लुलू व्हॅन ट्रॅप हा एक अतिशय प्रसिद्ध पॉप म्युझिक बॅण्ड. याच पॉप बॅण्डची रेबेका बेबी हीदेखील एक टॉपची गायिका. फ्रान्समध्ये या बॅण्डची आणि या गायिकेची फारच क्रेझ आहे. रेबेकाची एक सवय आहे, ती आपल्या कार्यक्रमात कायम प्रेक्षकांनाही सहभागी करून घेते. त्यामुळे कार्यक्रम सुरू झाला की गाता गाता मंचावरून उतरून ती थेट प्रेक्षकांमध्ये जाते आणि गाते. प्रेक्षकांनाही तिची ही अदा खूपच आवडते आणि मग तेही तिच्यासोबत गातात..
परवाचीच गोष्ट. फ्रान्समध्ये गौटे फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. लुलू व्हॅन ट्रॅप हा बॅण्ड परफॉर्मन्स सादर करत होता. थोड्याच वेळात रेबेका बेबी मंचावर आली आणि आपल्या गायकीनं अख्खं सभागृह तिनं ताब्यात घेतलं. तिच्या गाण्यावर अख्खं सभागृह डोलू लागलं.
नेहमीप्रमाणे थोड्याच वेळात ती रंगमंचावरून उतरली आणि सभागृहातील प्रेक्षकांच्या गर्दीत गेली. प्रेक्षकही तिच्या सोबत गात तिच्या अदाकारीला दाद देते होते. तेवढ्यात अघटित घडलं. सभागृहातील काही उत्साही आणि उत्तेजित प्रेक्षकांनी या गर्दीत तिला अडवलं आणि तिच्या शरीराशी काही लागट चाळे केले, नको तिथे स्पर्श केला. रेबेकानं या प्रेक्षकांपासून कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. सुरक्षारक्षकही तिच्या मदतीला आले.
अचानक घडलेल्या या घटनेनं रेबेका अतिशय हादरून गेली. पण तशाही परिस्थितीत तिनं संपूर्ण विचारांती एक धाडसी निर्णय घेतला. रेबेका पुन्हा रंगमंचावर आली. तिनं आपला परफॉर्मन्स थांबवला नाही; पण प्रेक्षकांसमोर उभं राहून तिच्यासोबत काय घडलं हे तिनं स्पष्टपणानं सगळ्यांना सांगितलं. याहीपुढे आणखी प्रचंड धाडसी निर्णय घेत या घटनेचा निषेध म्हणून पुढचा संपूर्ण कॉन्सर्ट तिनं टॉपलेस होऊन पूर्ण केला.
त्यानंतर रेबेकानं इन्स्टाग्रामवर एक भावपूर्ण पोस्ट लिहिली आणि त्यात म्हटलं, माझ्यापुढे दोन पर्याय होते, एकतर मी कॉन्सर्ट कायमचा थांबवावा आणि सगळ्यांचं नुकसान होऊ द्यावं, विशेषतः माझं. किंवा मी हा कॉन्सर्ट, शो सुरू ठेवावेत. शेवटी मी निर्णय घेतला, मी कॉन्सर्ट बंद करणार नाही; पण जोपर्यंत या गोष्टी ‘सामान्य’ होत नाहीत, लोकांच्या मेंदूला जोपर्यंत या गोष्टीची सवय होत नाही, की यात काहीही ‘लैंगिक’ नाही, तोपर्यंत मी टॉपलेस राहीन.. रेबेका म्हणते, मी गेली दहा वर्षे स्टेज शो करते आहे; पण असा प्रसंग यापूर्वी मी कधीच अनुभवला नव्हता...
प्रेक्षकांनीही रेबेकाच्या या कृतीला समर्थन दिलं. पुढच्या रांगेतील काही तरुणींनी या बेशरम प्रेक्षकांच्या निषेधार्थ आणि रेबेकाला समर्थन म्हणून त्याही टॉपलेस झाल्या. काही प्रेक्षकांनी विशेषत: महिलांनी ‘हार्ट साइन’ दाखवून रेबेकाच्या या धाडसी निर्णयाचं समर्थन केलं.
रेबेकाच्या या धाडसी निषेधाचं लुलू व्हॅन ट्रॅप या तिच्या बॅण्डनंही जोरदार समर्थन केलं. एवढंच नव्हे, आयोजक असलेल्या गौटे फेस्टिव्हलनंही प्रेक्षकांचं हे वर्तन अस्वीकार्य असल्याचं सांगून त्यांचा तीव्र निषेध केला. सोशल मीडियावर या घटनेमुळे प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे. बहुतेकांनी रेबेकाला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी रेबेकाची ही कृती आततायी असल्याचं म्हटलं आहे. या घटनेमुळे जगभरात नव्यानं चर्चा सुरू झाली आहे.