भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
By अतुल कुलकर्णी | Updated: October 5, 2025 07:55 IST2025-10-05T07:53:31+5:302025-10-05T07:55:06+5:30
आपण शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर किंवा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून आपली हकालपट्टी केल्यानंतर (दोन्हीपैकी एक झाल्यानंतर) आपण माध्यमांना मुलाखत दिली होती.

भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
प्रिय रामदास भाई
नमस्कार,
लोक काहीही बोलतील. तुम्हाला इतिहासाचे दाखले देतील. मेलेल्या माणसाविषयी बोलू नये असे सांगतील. जी व्यक्ती या जगात नाही, खुलासा करायला समोर नाही, त्यांच्याविषयी कसे बोलता..? असेही तुम्हाला सांगितले जाईल... अशावेळी आपण शाळेत शिकलेली माकडीण आणि तिच्या पिल्लाची गोष्ट लक्षात ठेवायची. नाका तोंडात पाणी जाऊ लागले की माकडीण स्वतःच्या पिल्लाच्या खांद्यावर पाय ठेवून उडी मारून निघून जाते... लहानपणापासून आपण हेच शिकलो. त्यामुळे ते खरे मानायचे. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवले होते, हाताचे ठसे का घेतले... असे आपण बोललात. उभ्या महाराष्ट्राने ही धक्कादायक माहिती ऐकली. आपण ज्या बाणेदारपणे हे बोललात त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडे.
आपण शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर किंवा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून आपली हकालपट्टी केल्यानंतर (दोन्हीपैकी एक झाल्यानंतर) आपण माध्यमांना मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत आपण, ‘तुटलेले कसे जोडता येईल याचा प्रयत्न करणार... महाराष्ट्रभर फिरणार... सभा घेणार... पण मातोश्री विरुद्ध कोणाला बोलू देणार नाही... उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध कोणाला बोलू देणार नाही...’ असे सांगताना आम्ही ऐकले होते. परवा दसऱ्याच्या दिवशीचेही आपले भाषण आम्ही ऐकले. इथे तुम्ही मातोश्री विरुद्ध बोललात की उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध..? शिवाय, उद्धव ठाकरेच खरे गद्दार आहेत, त्यांनी आमच्याकडून किती नमक खाल्ले असेही आपण म्हणालात... त्यामुळे आमचा पार केमिकल लोचा झाला आहे. तेव्हाचे खरे की आताचे..? असा संभ्रम मनात निर्माण झाला आहे.
खरे तर बाळासाहेबांविषयी आपण जे बोलला ते सत्य मानायला हवे. त्या विधानानंतर आपल्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे; मात्र एका गोष्टीचे आम्हाला दुःख वाटते. आपण सध्या ज्या शिवसेनेत आहात त्या शिवसेनेतून एकही नेता ठामपणे आपली बाजू घेताना दिसत नाही. आपण ज्या बाणेदारपणे बोलला तो बाणेदारपणा आपल्या सोबतचे नेते का दाखवत नाहीत..? हे काही बरोबर नाही. “तुम लढो, हम कपडे संभालते है..” असाच हा प्रकार म्हणावा लागेल... त्याच मुलाखतीत आपण, मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. कार्यकर्त्यांना जोडणार आहे, असेही सांगितले होते; मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत आपल्यासारख्या अनुभवी नेत्याला सध्याच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने का बोलावले नाही ? हा प्रश्न आम्हाला अस्वस्थ करतो.
‘खोके, खोके, खोके म्हणून बाप-बेटे थकले. ज्या दिवशी एकनाथ शिंदे आणि रामदास कदम तोंड उघडतील तेव्हा उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावे लागेल. नारायण राणे पण याचे साक्षीदार आहेत. असे अनेक खोके... मिठाईचे... आम्ही मातोश्रीवर पोहोचवले आहेत...’ असे आपण म्हणालात. त्यालाही बरेच दिवस झाले; मात्र आपण अद्याप काही बोलला नाहीत. नारायण राणे आपल्याला बोलायला लावतात. स्वतः काहीच बोलत नाहीत, अशीही चर्चा सुरू झाली आहे. आपल्याबद्दलच लोक अशी का चर्चा करतात याची आम्हाला चिंता वाटते. खरे तर आपण उत्तर द्यायला हवे. म्हणजे ‘उदु’ आणि ‘अदु’ परदेशात जाण्यासाठी बॅगा भरायला मोकळे होतील. एकदा का ते परदेशात गेले की आपलीच एकमेव शिवसेना मैदानात राहील. त्यामुळे हे काम लवकर करावे असे आपल्याला वाटत नाही का..?
शिवसेनेने आमदारकी दिली. मंत्रिपद दिले. विरोधी पक्षनेतेपद ही दिले. तेव्हा उद्धव ठाकरे चांगले होते का..? आणि आपल्याला पक्षातून काढल्यानंतर ते वाईट झाले का? असा प्रश्न आपले परममित्र अनिल परब विचारत आहेत. आपण कोकणात कोणाकोणाला बंगले बांधून दिले त्या बंगल्यात कोण राहत आहे, असे विचारण्याची अनिल परब यांना गरज होती का..? भाई, तुम्ही तर त्यांना कोर्टातच खेचा... तुमच्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक... असा आरोपांच्या फेऱ्यात अडकणे योग्य नव्हे...
महाराष्ट्राचा विकास, पावसा पुरात अडकलेला शेतकरी, त्यांचे उघड्यावर पडलेले संसार, वाहून गेलेल्या शाळेच्या दप्तरासाठी त्रासलेली मुलं, शेतकऱ्यांच्या खरवडून गेलेल्या जमिनी, पिकांचा झालेला चिखल, आयुष्याची झालेली माती... हे असले विषय लोकांनी काढू नये असे वाटत असेल तर ज्या पद्धतीची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे तीच चालू राहायला हवी... म्हणजे शेतकरी, मध्यमवर्गीय आपल्या सरकारला प्रश्न विचारणार नाहीत. तुमच्या बोलण्यामुळे सरकारवरचा रोख वेगळ्या दिशेने गेला. भाई, हा दूरदर्शीपणा खरंतर प्रत्येक नेत्याने तुमच्याकडून शिकायला हवा... अनिल परब नार्को टेस्टबद्दल बोलत होते, तर तुम्ही सीबीआय चौकशी झाली पाहिजे म्हणालात... या दोन्ही गोष्टीत पुढे काही घडेल का भाई...
- तुमचाच, बाबूराव