शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 08:28 IST2025-12-20T08:28:01+5:302025-12-20T08:28:47+5:30
'शिल्प साकारलं तुझ्या परिसस्पर्शातुनि... जणू प्राण ओतले तू पाषाणात या..' या सहज सुंदर ओळींची आठवण येते ती थोर शिल्पकार राम सुतारांच्या निर्मितीकडे पाहताना.

शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
काळाच्या पडद्याआड गेलेल्या कैक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना अमरत्व प्राप्त झाले ते त्यांच्या शिल्पांमुळे. निर्जीव छिन्नी-हातोड्यांनाही ज्यांचा परिसस्पर्श लाभला, अशा कैक शिल्पकारांच्या जादुई बोटांचं कौतुक करणारे शब्दही मराठी साहित्यात ओथंबून वाहिले. 'शिल्प साकारलं तुझ्या परिसस्पर्शातुनि... जणू प्राण ओतले तू पाषाणात या..' या सहज सुंदर ओळींची आठवण येते ती थोर शिल्पकार राम सुतारांच्या निर्मितीकडे पाहताना. वयाच्या एकशेएकव्या वर्षी त्यांनी नोएडा येथे बुधवारी शेवटचा श्वास घेतला. 'जगातील सर्वांत उंच पुतळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे ते शिल्पकार; परंतु इतरही अनेक सर्वोच्च उंचीच्या पुतळ्यांचा मान त्यांनाच लाभलेला.
अयोध्येत तब्बल ८२३ फूट उंचीच्या श्रीराम मूर्तीचे काम सुरू झाले ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली. मुंबईच्या समुद्रातही ६०० फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम प्रगतिपथावर आहे. मुंबईतीलच इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ४५० फूट उंचीच्या पुतळ्याचीही तयारी. हा पुतळा जगातील तिसरा उंच पुतळा ठरेल. राम सुतारांनी आयुष्यभर कैक पुतळे उभे केले; परंतु गेल्या दीड वर्षांत सर्वाधिक चर्चा झाली मालवणच्या शिल्पकृतीची. इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या तलवारीसह ८२ फूट उंचीच्या भव्य पुतळ्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली गेली. काम सुरू झाले डिसेंबर २०२४ मध्ये. काम पूर्णत्वास पोहोचले एप्रिल २०२५ मध्ये. म्हणजे अवघ्या पाच महिन्यांत छत्रपतींच्या दिमाखदार शिल्पकृतीची निर्मिती झाली. ११ मे २०२५ रोजी या पुतळ्याचे लोकार्पणही झाले. ताशी दोनशे किलोमीटर वेगाच्या समुद्री वाऱ्यांनाही तोंड देण्याची ताकद या शिल्पात आहे.
मध्य प्रदेशातील ४५ फूट उंच असे चंबल देवीचे भव्य शिल्प त्यांच्या सुरुवातीच्या काळातील एक मास्टरपीस मानले जाते. केवळ जिवंतपणाच नव्हे तर आजूबाजूच्या निसर्गाचा सखोल अभ्यास करून तेवढा मजबूत पुतळा उभारणं, ही खरी हातोटी सुतारांच्या बोटात. जगभरातील शिल्पसृष्टीत स्वतःचं नाव अजरामर करणारे राम सुतार मूळचे महाराष्ट्राचे. धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावी त्यांचा जन्म. वडील सुतारकाम करायचे. शाळेत खडूने चित्र काढताना त्यांना त्यांच्या गुरुजींनी पाहिले. त्यांच्यातील कलाकार ओळखून गुरुजींनीच वडिलांना शिल्पकलेच्या शिक्षणासाठी प्रवृत्त केले.
त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकलेचे शिक्षण घेतले. पित्यासोबत लाकडावर कोरीव काम करता करता समोर पाषाण कधी आले हेही त्यांना कळलं नाही. त्यांची बहुसंख्य शिल्पं ब्राँझ धातूतली. महात्मा गांधी, पंडित नेहरू, पंडित दीनदयाळ उपाध्याय, रफी महंमद किडवाई यांच्यासह कैक भारतीय नेत्यांची शिल्पे त्यांच्या बोटातून घडली. 'पद्मश्री', 'पद्मभूषण' अन् 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं त्यांना सन्मानित केले गेले. शिल्प बनविण्यापूर्वी ते संबंधित व्यक्तीच्या शरीरयष्टीतील बारीक-सारीक बारकावेही अचूक टिपत. सरदार पटेलांच्या शेकडो फोटोंचा अभ्यास केल्यानंतरच त्यांनी त्यांच्या शिल्पनिर्मितीला प्रारंभ केला होता. संबंधित व्यक्तीच्या डोळ्यांतील भाव अन् चेहऱ्यांवरील छटाही शिल्पकृतीत उमटत.
'शिल्प म्हणजे धातूचा तुकडा नसून इतिहासाचा जिवंत पुरावा असतो', यावर त्यांची नितांत श्रद्धा. भारताबाहेरही अनेक देशांत महात्मा गांधींच्या शिल्पांनी सुतारांचे नाव अजरामर केले. जगभरात खरी ओळख मिळाली ती गांधींच्या पुतळ्यामुळेच. संसद भवनातील ध्यानस्थ गांधी मूर्तीच्या चेहऱ्यावरील करुणा अन् दृढता अचूक टिपली ती याच सुतारांनी. त्यांच्या शिल्पकलेची खरी ओळख एकच. ती म्हणजे तंतोतंतपणा. चेहऱ्यावरील सुरकुत्या इतक्याच कपड्याच्या चुण्याही खऱ्या-खुऱ्या वाटत. अचूक शिल्पकलेसाठी बहुसंख्य शिल्पकारांच्या दृष्टीने ते जणू 'श्रद्धेचे विद्यापीठ' होते. हस्तकौशल्याच्या बाबतीत याच कलाकारांसाठी ते जणू देव होते.
१९५० च्या दशकात अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील मूर्तीच्या डागडुजीच्या कामातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुतारांनी अवघ्या महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविले. १९ फेब्रुवारी १९२५चा त्यांचा जन्म. आणखी दोन महिन्यांनी त्यांचा एकशेएकावा वाढदिवस जोरात साजरा करण्याची इच्छा त्यांना मानणाऱ्या अनेक कलाकारांची होती. मात्र, नियतीनं ती अपूर्णच ठेवली. त्यांच्या निधनाने सजीव शिल्पांमधला 'राम' हरपला. 'शिल्पकार तोच असतो, जो दगडातील अनावश्यक भाग काढून टाकतो अन् त्यातून देव प्रकट करतो', याची चिरंतन आठवण करून देणाऱ्या राम सुतारांना विनम्र अभिवादन!