किन गांग : आकाशाने गिळले की धरतीने खाल्ले?

By विजय दर्डा | Published: July 31, 2023 07:52 AM2023-07-31T07:52:21+5:302023-07-31T07:55:37+5:30

आपला कुरापतखोर शेजारी देश चीन ही ठसठसती जखम होय! भारताच्या नशिबी असलेल्या या डोकेदुखीशी झगडणे अपरिहार्य!

Qin Gang Swallowed by the sky or eaten by the earth | किन गांग : आकाशाने गिळले की धरतीने खाल्ले?

किन गांग : आकाशाने गिळले की धरतीने खाल्ले?

googlenewsNext

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -

चीनमधून आलेली ताजी बातमी अशी की परराष्ट्रमंत्री म्हणून संपूर्ण जगात ख्याती पावत असलेले किन गांग अचानक गायब झाले आहेत. महिना उलटला, त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. कम्युनिस्ट पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख वांग यी यांनी परराष्ट्रमंत्र्यांचा कार्यभार सांभाळला आहे. हे गांग राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे अत्यंत निकटचे मानले जात; परंतु ते गायब झाल्यानंतर चीन सरकारने मौन बाळगले आहे. 

अर्थात चीनसाठी अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत. यापूर्वी गायब झालेले मंत्री किंवा अधिकारी पुष्कळ !  त्यांच्यातल्या अनेकांचा नंतर काही तपासही लागला नाही. ऑक्टोबर २०२० मध्ये चीनचे सर्वात मोठे उद्योगपती जॅक मा एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले, देशातल्या बॅंका सरकारचे प्यादे झाल्या आहेत ! त्यानंतर जॅक मा अचानक गायब झाले. त्यांच्या कंपन्यांना ८५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले. तब्बल तीन वर्षांनी ते चीनमध्ये दिसले म्हणतात. कोणी कितीही प्रभावशाली असो त्याने जर सरकारी धोरणांवर थोडीही टीका केली तर चीनमध्ये ही अशी हालत होऊ शकते. गांग यांनी अशी काही टीका केली असेल तर त्याची माहिती कोणाजवळ नाही. पण मग ते गायब का झाले? एका टीव्ही प्रेझेन्टरसमवेत त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याची चर्चा समाजमाध्यमांवर होत आहे. परंतु, हा काही गुन्हा नाही. म्हणजे दुसरे काही तरी कारण असले पाहिजे आणि तेच चीन लपवत आहे.

चीन आपल्या देशांतर्गत गोष्टी बाहेर येऊ देत नाही. तिथला कम्युनिस्ट पक्ष हुकूमशाही पद्धतीने काम करतो. शी जिनपिंग राष्ट्रपती झाल्यानंतर ही हुकूमशाही वाढतच गेली. जिनपिंग एकीकडे आपल्या देशातल्या गोष्टी लपवतात आणि दुसरीकडे अन्य देशांवर कब्जा करण्याच्या कटकारस्थानात गुंतलेले असतात. एकीकडे चीन अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देतो, तर दुसरीकडे  तैवान गिळंकृत करण्याच्या खटपटीत राहतो. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर चीनचे मनोबल आणखी वाढले. सध्या चीन गप्प आहे, कारण तैवानला वाचविण्यासाठी अमेरिका पुढे आली तर चित्रच बदलेल ! युद्ध परवडणारे नाही, कारण चीनच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजतील. आज जगातल्या ६०पेक्षा जास्त देशांना गुलाम करण्याचे प्रयत्न चीनने चालवले आहेत.  श्रीलंका कर्ज फेडू न शकल्याने हंबनटोटा बंदर ९९ वर्षांसाठी चीनने वापरायला घेतले आणि भारतासाठी नवी डोकेदुखी तयार झाली.  

अमली पदार्थांचे तस्कर आणि म्यानमारमध्ये राहणारे बहुसंख्य दहशतवादी यांच्या माध्यमातून मणिपूर पेटते ठेवण्यात चीन प्रमुख भूमिका पार पाडतो आहे. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी गेल्याच आठवड्यात ही शंका बोलून दाखविली. चीनची आणखी एक ताजी कुरापत म्हणजे भारतीय मार्शल आर्टस संघाच्या तीन खेळाडूंना चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी स्टेपल व्हिसा जारी केला गेला. हा व्हिसा म्हणजे एक कागद असतो ! व्हिसा जारी करत असल्याचा शिक्का पासपोर्टवर न मारता त्या कागदावर मारला जातो. अरुणाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्यांची अशी खोडी चीनने यापूर्वी वारंवार काढली आहे. स्वाभाविक भारताने आक्षेप घेतला आणि संपूर्ण संघाचा दौरा रद्द केला. 

२०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दौरा आणि २०२० मध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल दौऱ्याला चीनने हरकत घेतली होती. सद्य:स्थितीत आपल्या नकाशात चीनने अरुणाचल प्रदेशातील अनेक शहरांची आणि गावांची नावे बदलली आहेत. ९० हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश आपला असल्याचा दावा चीन करतो. परंतु अक्साई चीनमध्ये त्याने आपली ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन हडपली हे उलटे वास्तव आहे. कधी डोकलाममध्ये, तर कधी तवांग किंवा सीमेच्या दुसऱ्या भागात चीन कुरापती काढत असतो. जवळपास ३ हजार ५०० किलोमीटर सीमारेषेच्या अगदी जवळ चीनने सैनिकी तळ उभारले आहेत. अर्थात, चीनला याचीही जाणीव आहे की भारत आता १९६२चा भारत राहिलेला नाही.

दुसऱ्या एका मोठ्या खेळीत चीनने भारताला फसविले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील आकडेवारी पाहिली तर दिसते की भारताच्या एकूण आयात खर्चातील सर्वाधिक १५.४२ टक्के खर्च चीनच्या वाट्याला गेला. अणुभट्टीपासून रसायने, खते, प्लास्टिकचे सामान, गाड्यांचे सुटे भाग, लोखंड, पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या बाबतीत भारत  चीनवर अवलंबित झाला आहे. चीनकडून खतांची आयात बंद झाली तर आपल्या शेतीचे बारा वाजतील, अशी अस्वस्था आहे. कूटनीतीमध्ये एक जुनी म्हण आहे: ज्या देशांकडून धोक्याची शंका असेल त्याच्यावर अवलंबून राहता कामा नये ! परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी की एकीकडे चीनबरोबर तणाव वाढत असताना दुसरीकडे व्यापारही वाढत चालला आहे. गतवर्षी दोन्ही देशांतील व्यापार ८.४ टक्क्यांनी वाढला. चीनमधून भारतात होणारी आयात २१.७ टक्के वाढली. भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीत ३७.९ टक्के घसरण झाली. भारताची व्यापार तूट १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. 

चीनवर अवलंबून राहणे आपल्याला थांबवावे लागेल; तरच आपण त्याचा सामना करू शकू. जगासाठी चिघळलेली जखम झालेल्या या देशाचा इलाज करणे अत्यंत गरजेचे आहे. ही जखम अतिशय वेदनादायी आहे.

Web Title: Qin Gang Swallowed by the sky or eaten by the earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.