पुस्तकं सांगतात गोष्ट: दिनकर मनवरांची 'वामांगी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 10:58 IST2025-03-09T10:57:36+5:302025-03-09T10:58:13+5:30

फारच कमी पुरूष लेखकांना बाई लिहिता आलेली आहे. तिचं म्हणणं संपूर्ण ताकदीनिशी मांडता आलेलं आहे. कवी दिनकर मनवर अशा लेखकांपैकी एक आहेत. स्वतःला वजा करून रख्मायचा आवाज होण्याची किमया त्यांना साधली आहे...

Pustak Goshta Sangtat Article on Dinkar Manwar Wamangi book | पुस्तकं सांगतात गोष्ट: दिनकर मनवरांची 'वामांगी'

पुस्तकं सांगतात गोष्ट: दिनकर मनवरांची 'वामांगी'

अक्षय शिंपी

पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. चारचौघांसारखेच दिसणारे, दोनच हात -दोनच पाय असणारे, काळा-सावळा रंग असणारे हे दोघे मराठी माणसाला आपापल्या घरातील सदस्यच वाटत आले आहेत. नुसते सदस्यच नव्हे तर कुटुंबप्रमुख. सुख-दुःखं, हार-जीत, गा-हाणी, साकडे सारं... सारं... याच जोडप्याच्या पायांवर आणून घातलं जातं. पंढरपुरात एक अर्थपूर्ण परंपरा आहे, विठ्ठल-रखुमाईला पत्र लिहिण्याची. त्यातून आपापलं क्षेमकुशल, अडचणी कळवण्याची. रात्र झाली की हे जोडपं आपापली पत्रं चंद्रभागेच्या काठी बसून परस्परांना वाचून दाखवतात म्हणे। असं हे या दोघांचं स्थान!! अविचल. पण, हे जोडपं एकत्र नांदत नाही.

पंढरपुरात त्यांची घरं वेगवेगळी. इतरांसाठी हे दोघे एकाच विटेवर उभे असले तरीही आपापल्या पायांखाली आपापली स्वतंत्र वीट राखून आहेत. विठोबा रख्मायच्या घरचा उंबरा ओलांडत नाही, की रख्माय विठोबाच्या घरच्या भिंतींना कान लावत नाही. दोघांची भेट बाहेर. नदीकाठी.

दोघांबद्दलच्या अनेक आख्यायिका महाराष्ट्राला तोंडपाठ. देवत्वाची झूल फेकून मातीचे पाय असणाऱ्या माणसांसारखंच यांचं वर्तन. लंगोट, कांबळ आणि काठी अशा वेशात विठ्ठल तर साधं नववार पातळ अन् गळ्यात डोरलं ल्यालेली रख्माय ही साध्या कष्टकरी वर्गातल्या स्त्री-पुरुषांची प्रातिनिधिक रूपं. यांच्यावर पराकोटीचा जीवही लावता येतो आणि कडाडून भांडणंही करता येतात. हे दोघेही परस्परांशी भांडूनच अलग राहिलेत, की लव्ह - हेट रिलेशनशिप. विठ्ठलाबद्दल जेवढं कवित्व झालं आहे तुलनेत रखुमाई क्वचितच उगवून आलेली दिसते. अरुण कोलटकरांची 'वामांगी' कविता आपल्या सर्वांच्या जवळची आहे. रख्माय आणि कवीचं संभाषण असलं तरी रख्मायचं स्वगतच आहे ते ! आत आत खोलवर दडवलेलं काहीतरी भस्सकन् उजेडात आलेलं आहे तीत! 'वामांगी' वाचल्यानंतर स्त्री असो वा पुरुष कुणीही व्याकूळ होतो. वामांगी. डाव्या अंगाला असणारी. फक्त हाताला हात लावून 'मम' म्हणणारी. कमी महत्त्वाची? ठाऊक नाही. मराठीत 'वाम' शब्द बऱ्या अर्थछटा घेऊन येत नाही....

कवी दिनकर मनवर हे मराठी कविता विश्वातलं अग्रणी नाव. स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा असणाऱ्या कविता हे ठसठशीत वैशिष्ट्य. फ़ैज़ अहमद फ़ैज़ची शायरी जशी दुरूनही ओळखता येते तशीच मनवरांची कविताही आहे, असं म्हणण्यात कुठलीही अतिशयोक्ती नसावी.

इथे रख्माय भरभरून बोलते. जणू माहेरचं माणूस भेटावं तशी. चिडते, हताश होते, हक्क सांगते. मनवरांशी बोलता-बोलता विठ्ठलाशीही बोलते. प्रश्न विचारते. या प्रश्नांची उत्तरं आहेत काय आपल्याकडे? असलीच तर ती द्यायची हिंमत आहे काय? असे प्रश्न रख्मायची स्वगतं वाचता-ऐकताना पडत राहतात.

रख्माय नद्यांना आवाहन करून म्हणते 
-या गं या वाहत सगळ्याजणी थेंबाथेंबानं भरा ओटी माझी माझ्या एकटीनं भागत नाही तहान या वाळवंटाची.
 

Web Title: Pustak Goshta Sangtat Article on Dinkar Manwar Wamangi book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.