शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

बळीराजाच्या आत्मक्लेषाचाअर्थ

By admin | Updated: April 12, 2016 04:03 IST

सातेफळ आणि जामदराच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देशातील शेतकऱ्यांच्या मनातला उद्रेक आहे, त्याच्या असंतोषाचे हे टोक आहे. पोशिंद्याचा हा नवा आत्मक्लेष अधिक भीतीदायक आहे.

- गजानन जानभोर सातेफळ आणि जामदराच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देशातील शेतकऱ्यांच्या मनातला उद्रेक आहे, त्याच्या असंतोषाचे हे टोक आहे. पोशिंद्याचा हा नवा आत्मक्लेष अधिक भीतीदायक आहे.माणसाना प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, दुष्काळ, नापिकीने त्रस्त शेतकरी रोज मरतोय, पण सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. कारण सरकार देशद्रोह्यांची जनगणना करण्यात मग्न आणि राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्यात तल्लीन. माध्यमाना देणे-घेणे यासाठी नाही, कारण त्यांनीही ‘भारत माता की जय’ जबरीने न म्हणणाऱ्यांना हुडकून काढण्याचे नवे कंत्राट घेतलेले. या वावटळीत विदर्भातील काही शेतकरी यंदा पेरणी न करण्याचा टोकाचा निर्णय घेतात, तेव्हा त्या अस्वस्थ करणाऱ्या बातमीचे मोल सरकार आणि माध्यमाना कळणे अपेक्षितही नाही. यवतमाळ जिल्ह्यातील सातेफळ आणि वाशिम जिल्ह्यातील जामदरा (कवठळ) या दोन गावातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात पेरणीच न करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील कर्जाने मरणप्राय यातना भोगत असलेल्या शेतकऱ्यांनी उचललेले हे टोकाचे पाऊल भविष्यातील भीषण संकटाचे सूचक आहे. या संतापामागील इशारा राज्यकर्त्यांनी आणि समाजाने समजून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी पुकारलेला हा संप आहे. बँकांच्या, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या धमक्यांना बळी पडणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या या बंडाचे गांभीर्य अजून लक्षात आलेले नाही. बळीराजाने उद्या अन्न-धान्य पिकविणे बंद केले तर या देशाची अवस्था किती भयानक होईल, सातेफळ आणि जामदरा या गावातील शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे लोण पुढे प्रत्येक गावात पोहोचले तर काय होईल, असे अनेक प्रश्न या निमित्ताने अस्वस्थ करीत आहेत. काही वर्षांपूर्वी शरद जोशींनी राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याचा एक अहिंसक मार्ग शेतकऱ्याना सांगितला होता, ‘‘तुम्ही काहीच करू नका, फक्त हातावर हात बांधून बांधावर बसून राहा, ‘आम्ही आमच्यापुरते पेरू, आम्हीच खाऊ, तुम्हाला देणार नाही,’ असे ताठर होऊन तेवढे सांगा’’. आज नाही, किमान उद्या तरी आपले चांगले दिवस येतील या आशेने त्यावेळी शेतकऱ्यांनी या द्रष्ट्या योद्ध्याचे ऐकले नाही. सातेफळ आणि जामदराच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देशातील लाखो शेतकऱ्यांच्या मनातला उद्रेक आहे. त्याच्या असंतोषाचे हे टोक आहे. घरातला कोपरा नि कोपरा दारिद्र्याने भरलेला असताना दारात आलेल्या भिकाऱ्यालाही आपल्या ताटातली चतकोर भाकर देणाऱ्या या पोशिंद्याचा हा नवा आत्मक्लेष अधिक भीतीदायक आहे. पूर्वी तो निमूटपणे शेतात गळफास घ्यायचा किंवा विष खाऊन चुपचाप झोपून जायचा, पण मातीशी शेवटपर्यंत इमान राखायचा. आता मात्र त्याला ही शेती नकोशी झाली आहे. आपण पिकवले नाही तर देशातील बांधव उपाशी राहतील, ही चिंताही त्याला भेडसावत नाही. तो स्वत:सोबतच जगाचेही सरण रचू लागला आहे. स्वातंत्र्यानंतर त्याच्या कल्याणाचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही. पूर्वी टाटा-बिर्ला आणि आता अंबानी-अदानी, या देशाच्या प्रगतीचे, विकासाचे हेच निर्देशांक! प्रत्येक वेळी तो वेगवेळ्या झेंड्यांखाली आपले गाऱ्हाणे मांडायचा. कधी पुढाऱ्यांना गावबंदी, दिंडी, रास्ता रोको, संसदेवर मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने... ही सगळी लोकशाहीनेच बहाल केलेली अस्त्रे. तरीही राज्यकर्त्यांनी त्याला बेदखल केले. मग तो गांधींच्या वाटेने निघाला, उपोषणाच्या आणि आत्मक्लेषाच्या. त्याने शेती-गाव विकायला काढले. किडनी विक्रीस ठेवली. राष्ट्रपतींकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागितली. शेवटी निराश झालेला हा बळीराजा पोट भरण्यासाठी शहरात आला आणि बांधकामांवर मजुरी करू लागला. शहराच्या बाहेर नव्या वस्त्या वसलेल्या दिसतात. त्या वस्त्या म्हणजे उद्ध्वस्त झालेल्या असंख्य खेड्यांची स्मशाने. शेतकऱ्यांच्या संयमाचे हे सगळे मार्ग आता संपलेले आहेत. म्हणूनच त्याला यापुढे शेतात काहीच पिकवायचे नाही. त्याच्या मनातल्या आक्रोशाची ही ठिणगी आहे. उद्या त्याचा वणवा होईल. सरकार, समाज म्हणून आपण त्यांना जगू देत नाही, मग ते आपल्याला कसे जगू देतील? ही चिथावणी नाही, वास्तव आहे. त्याच्या आत्मक्लेषाचा अर्थ आपण समजून घेतला नाही, त्याचा तळतळाट तरी आता समजून घेणार की नाही?