संपादकीय: आपली ‘इयत्ता’ कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाळी असलेल्या बसमध्ये असा प्रकार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 07:12 IST2025-02-28T07:10:47+5:302025-02-28T07:12:22+5:30

Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case :

Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case Editorial: What is your 'class'? This is what happens in a bus bearing the name of Chhatrapati Shivaji Maharaj in Pune | संपादकीय: आपली ‘इयत्ता’ कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाळी असलेल्या बसमध्ये असा प्रकार...

संपादकीय: आपली ‘इयत्ता’ कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाळी असलेल्या बसमध्ये असा प्रकार...

ज्या पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली, तिथेच मुली असुरक्षित असाव्यात, यासारखी शोकांतिका आणखी कोणती असेल? हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी आहे आणि जिथे रोजची वर्दळ आहे, अशा ठिकाणी एका तरुणीवर बलात्कार होतो, हे शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. ‘माणूस’ म्हणून आपली ‘इयत्ता’ कोणती, असा प्रश्न पडावा, असे हे आहे. जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांत आज मुली आकाशाला गवसणी घालत आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षांचा हा काळ. दरवर्षी या परीक्षांचा निकाल येतो आणि मुलीच कशा आघाडीवर आहेत, हे सिद्ध होते. मुलींच्या कर्तबगारीने सगळी क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. अशा या काळात मुली असुरक्षित असाव्यात, याला काय म्हणावे? ज्या पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते, तिथे हे चित्र असेल, तर अन्यत्र काय अवस्था असेल? स्वारगेट हे पुण्यातील बसस्थानक. इथे अहोरात्र वर्दळ असते. इथे एका मुलीवर बलात्कार होतो. बसचे नाव ‘शिवशाही’. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाळी असलेल्या बसमध्ये पहाटे तरुणीवर अत्याचार होत असताना सगळ्या यंत्रणा काय करीत असतात? महिलांची सुरक्षितता हा मुद्दा तर चव्हाट्यावर आला आहेच; पण पुन्हा एकदा समाज म्हणून आपली मानसिकताही समोर आली आहे.

स्त्रीकडे ‘शरीर’ म्हणून बघणारी ही मानसिकता कधी बदलणार? पुण्यासारख्या प्रगत शहरात अगदी भल्यापहाटे एक मुलगी सुरक्षित नसेल तर आपण कोणत्या विकासाच्या बाता मारत आहोत? लाडक्या बहिणींच्या नावाने जिथे निवडणुका लढवल्या जातात, त्या बहिणींवर अशी वेळ ओढवत असेल तर आपण नक्की कुठल्या दिशेने चाललो आहोत? ही घटना अपवाद नाही. सर्वत्र आणि वारंवार अशा घटना घडत आहेत. असे काही घडले, की समाज म्हणून आपण जागे होतो. ‘ज्याने बलात्कार केला, त्याला फासावर द्या’, अशी मागणी होते. मात्र, स्थळ बदलते, व्यक्ती बदलतात आणि तेच पुन्हा घडते. मध्ययुगीन काळातही घडले नसेल, अशा घटनांनी वर्तमानपत्रांची पाने रंगतात. स्त्रीकडे केवळ ‘शरीर’ म्हणून बघणारी नजर असते, तेव्हाच या अशा घाणेरड्या घटना घडतात. लहान बालिकेपासून वृद्धांपर्यंत कोणीही त्यापासून सुटलेले नाही. रस्त्यावर स्त्री असुरक्षित आहे, असे मानावे, तर अन्यत्र काय चित्र आहे? सार्वजनिक ठिकाणे सोडा, अनेक घरांमध्ये काय अवस्था आहे? जिथे गर्भाशयातच ‘ती’ असुरक्षित असते, तिथे इतर ठिकाणांचे काय? जे तिला असुरक्षित  करतात, त्यांना जेरबंद करण्याऐवजी आपण काय करतो? आपण तिलाच बंद करून टाकतो. तिला असंख्य निर्बंधांमध्ये डांबून टाकतो. ‘सातच्या आत घरात’ यायला भाग पाडतो आणि तिला असुरक्षित करणारे मात्र रात्रभर मोकाट. ही मानसिकता बदलायला हवी.

स्त्रीला असुरक्षित करणारी नजरच आधी ठेचायला हवी. स्वारगेट बसस्थानकातल्या घटनेचे  तपशील हादरवून टाकणारे आहेत. या स्थानकाच्या परिसरात अनेक अवैध उद्योग सुरू असताना तिथले प्रशासन काय करीत आहे? शेजारी असणारे पोलिस काय करत आहेत? या मुलीचे मात्र कौतुक करायला हवे. कारण, या घटनेनंतर तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवली. ज्याने अत्याचार केला, त्याला जेरबंद करण्याऐवजी अनेकदा जिच्यावर बलात्कार झाला, तिच्याच चारित्र्याविषयी बोलले जावे, यासारखी निर्लज्ज गोष्ट नाही. अनेक मुली-महिला अत्याचार होऊनही गप्प बसतात आणि अशा नालायकांचे फावते.

सध्याच्या वेगाने बदलत्या  परिस्थितीत मुलींनी  हिंमत दाखवली पाहिजे. हे असले नराधम ओळखले पाहिजेत. काही घडत असेल तर त्वरेने बोलले पाहिजे. परंपरेने लादलेले मौन  सोडले पाहिजे. आपल्या दांभिकतेवरही या घटनेने बोट ठेवले आहे. एरवीी, बाईला देवीची उपमा देणारे आणि आईचे गोडवे गाणारे आपण स्त्रीकडे ‘माणूस’ म्हणूनही पाहत नसू, तर बाकी सगळ्या गप्पा व्यर्थ आहेत. आपण वारसा तर फार मोठा सांगत असतो. राजमाता जिजाऊंपासून सावित्रीमाईंपर्यंत आणि अहिल्यादेवींपासून आनंदीबाईंपर्यंत स्त्रियांचा इतिहास आपण सांगतो खरा; पण आजही या देशात स्त्रीकडे ‘माणूस’ म्हणून पाहिले जात नसेल, तर त्या देशाला प्रगत, पुरोगामी म्हणायचे तरी कसे? कशाच्या आधारावर? उष:काल होतानाच असे अंधारून आलेले असताना, वेळीच मशाली पेटवल्या नाहीत, तर येणारी काळरात्र आपले आयुष्य संपवून टाकणार आहे!

Web Title: Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case Editorial: What is your 'class'? This is what happens in a bus bearing the name of Chhatrapati Shivaji Maharaj in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.