पं. नेहरूंचा विसर नको

By Admin | Updated: November 17, 2014 01:40 IST2014-11-17T01:40:21+5:302014-11-17T01:40:21+5:30

पंडित जवाहरलाल नेहरूंची १२५ वी जयंती साजरी होत असताना आपल्या देशातील राजकारण्यांमध्ये त्यांच्या परंपरेविषयी मतभेद व्हावेत ही राष्ट्रीय शोकांतिका म्हणावी लागेल

Pt Nehru did not forget | पं. नेहरूंचा विसर नको

पं. नेहरूंचा विसर नको

विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन) - 

पंडित जवाहरलाल नेहरूंची १२५ वी जयंती साजरी होत असताना आपल्या देशातील राजकारण्यांमध्ये त्यांच्या परंपरेविषयी मतभेद व्हावेत ही राष्ट्रीय शोकांतिका म्हणावी लागेल. त्यांच्या धोरणांविषयी चर्चा होऊ नये, असे नेहरूंचे समर्थक म्हणणार नाहीत; पण त्यांनी जो वारसा मागे ठेवला आहे त्याला कमी लेखून त्याला उद्ध्वस्त करण्याचे काम कृपा करून करू नका. त्यांच्या मनात लोकशाही प्रक्रियेविषयी अविचल श्रद्धा होती आणि त्यांनी सामाजिक सहिष्णुता आणि विविधतेचा सन्मान यावर भर देणाऱ्या राष्ट्राची निर्मिती केली हे मान्यच करावे लागेल. राष्ट्राचे पंतप्रधान या नात्याने ते १७ वर्षे या देशाच्या सत्तेत होते. हा काळ स्वातंत्र्यानंतरचा रचनात्मक काळ होता. त्यांनी सर्वांना समान संधी असणाऱ्या राष्ट्राची निर्मिती केली. हे राष्ट्र सर्व तऱ्हेच्या वंश, धर्म, जात, वर्ग, लिंगभेद आणि भौगोलिक विविधता यापलीकडे जाऊन कठोर परिश्रम करणारे होते. या देशातील लाखो लोकांच्या सर्व क्षेत्रातील यशासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यातूनच आजचे आधुनिक राष्ट्र उभे झाले आहे. या राष्ट्राचा पाया त्यांच्या प्रयत्नातूनच घातला गेला.
त्यांच्या १२५ व्या जयंतीला आपले राष्ट्र एक परिपक्व राष्ट्र झालेले आहे. त्यामुळे त्यांनी संपादन केलेल्या यशाचा आपण गौरव करायला हवा; पण आपण त्यांच्याबद्दल राजकीय वाद निर्माण करून त्यात वेळ घालवीत आहोत. त्यांनी या राष्ट्राचा जो मजबूत पाया घातला त्यावर उत्तुंग इमारत उभारण्यासाठी मार्ग शोधण्याचा आपण खरेतर विचार करायला हवा; पण सध्याच्या परिस्थितीत हे काम सोपे नाही. सत्तेचे राजकारण आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा यामुळे सुबुद्ध विचार मागे पडला आहे. आणि देशहिताकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
गेल्या ६७ वर्षांपासून हा देश नेहरूंचा भारत म्हणून ओळखला जातो, ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावीच लागेल, मग या देशाचे पंतप्रधान कोणीही असोत. मग ते भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी असोत की अन्य कोणी या सर्वांनी नेहरूंची विचारसरणीच पुढे नेली; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही नेहरूवादी राजकारणी नाहीत. नेहरूंच्या विचारधारेवर त्यांचा विश्वास नाही. तसेच, ते नेहरूंचे समर्थकही नाहीत; पण नेहरूंची लोकशाहीविषयीची जी बांधिलकी होती त्यातूनच मोदींची निर्मिती झाली आहे. प्रौढांच्या मताधिकारातूनच मोदींचा उदय झाला आहे. नेहरूंनी या विचाराचा सतत पुरस्कार केला. देशातील अशिक्षित जनतेवर कितपत विश्वास ठेवायचा याविषयी अनेकांच्या मनात शंका होती. त्यांना सरकारची निवड करण्याचा अधिकार देण्याविषयी संभ्रम होता. शिवाय, आपण ही गोष्ट मान्य करायला हवी की, नेहरू लोकशाहीवादी होते, म्हणूनच मोदी पंतप्रधान होऊ शकले; पण त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सामर्थ्य लागते. तोंडदेखल्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त होत नसते. राष्ट्रीय नेत्यांना कमी लेखणे, त्यांचा अवमान करणे हा आपला लोकप्रिय राष्ट्रीय उद्योग आहे; पण नेहरूंवर टीका करायचे काम मोदींनी सुरू केले, असे म्हणता येणार नाही. बिगरकाँग्रेसी राजकारण्यांनी अनेक दशकांपासून नेहरूंवर टीका केली आहे; पण तरीही त्यांना सत्तेवर येता आले नाही. मोदींनी ते साध्य केले हाच महत्त्वाचा फरक आहे. सुमारे पाच दशके पं. नेहरू हे राष्ट्रीय मंचावर दिमाखाने वावरत होते. ते लेखक होते तसेच राजकारणी, विचारवंत, तत्त्वज्ञ आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे योगदान साऱ्या जगाने मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद असतानाही आपण त्यांच्याविषयी आदरभाव बाळगायला हवा. आपल्या सामूहिक राष्ट्रीय वारशामध्ये त्यांनी घातलेली भर अलौकिक म्हणावी लागेल. ते केवळ भारताचे हीरो नव्हते. त्यांच्या जीवनातून, शब्दांतून आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले होते. सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी नेल्सन मंडेला म्हणत, ‘ते माझे नेते होते.’ स्वातंत्र्य मिळवणे काही सोपे नाही हे त्यांनी आयुष्याच्या सुरुवातीलाच जाणले होते. आणि त्यासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला म्हणूनच त्यांना हीरो म्हणून दर्जा प्राप्त झाला होता.
नेहरूंच्या यशापयशाची चर्चा करण्याची समीक्षा करण्याची ही वेळ नाही. या विषयीचे भरपूर साहित्य उपलब्ध आहे; पण तो सगळा इतिहास आहे. आता आपल्याला भविष्यातील आव्हानांचा सामना करायचा आहे. दोन भिन्न विचारधारा असणारी द्विध्रुवीय लोकशाही निर्माण करण्याचे हे आव्हान आहे. राष्ट्रीय हिताचा विचार करून भिन्न विचारधारांना एका मुशीत विरघळवून टाकणे हेच लोकशाहीचे वैशिष्ट्य असते. नेहरूंनी लोकशाहीवादी या नात्याने त्यांनी लोकशाहीतले राजकारण कसे असावे, हे स्पष्ट केले होते. त्यांच्या लोकशाही संकल्पनेत विविधतेचा आदर हा महत्त्वाचा मुद्दा होता. नेहरूंनी घराणेशाहीचे राजकारण चालवले, असा त्यांच्यावर आरोप करण्यात येतो; पण यासंदर्भात पूर्वग्रह बाजूला ठेवून विचार केला तर हे लक्षात येईल की, महात्मा गांधींनी आपला वारसदार म्हणून नेहरूंची निवड केली, तशी निवड नेहरूंनी इंदिरा गांधींची केली नव्हती. लालबहादूर शास्त्रींच्या आकस्मिक निधनामुळे इंदिराजी पंतप्रधानपदावर पोचल्या होत्या. तेव्हा नेहरूंचे वारसदार हे खऱ्या अर्थाने लालबहादूर शास्त्री हेच होते; पण गांधी घराण्यातील इंदिरा, राजीव, सोनिया आणि राहुल यांच्या सत्तेत राहण्याच्या इच्छेतूनच घराण्याची सत्ता निर्माण झाली होते; पण इंदिराजींनंतर राजीव आणि राजीवजीनंतर सोनिया हे एका शोकांतिकेतूनच समोर आले आहेत. इंदिराजींची हत्या झाली तशी राजीवजींचीही झाली. गांधींशिवाय काँग्रेस पक्ष चालवण्याविषयी असलेल्या काँग्रेसजनांच्या उदासीनतेतूनच घराणेशाही अस्तित्वात आली आहे. तेव्हा घराणेशाहीचा दोष गांधी घराण्यावर ठेवणे योग्य होणार नाही. देशातील अन्य राजकीय कुटुंबांनी सत्तेवर आपली पकड कायम राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. गांधी कुटुंब हे त्याला अपवाद नाही.
यापुढे आपल्या देशाच्या लोकशाहीत दोन विचारधारांचा संघर्ष राहणार आहे. नेहरूंच्या विचारधारेचे प्रतिनिधित्व राहुल गांधी करतात ( ते या कामासाठी नाखुश जरी असले, तरी त्यांना अपरिहार्यपणे ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.) आणि नेहरूविरोधी विचारधारेचे प्रतिनिधित्व नरेंद्र मोदी करीत आहेत. सध्यातरी मोदींनी निवडणुकीत विजय मिळवला आहे; पण पर्यायी विचारधारा काय राहील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही विचारधारा नेहरूविरोधी असेल असे बोलले जाते; पण प्रत्यक्षात कोणता पर्यायी विचार अस्तित्वात येतो ते आपल्याला पाहावे लागणार आहे.
जाता जाता... मोठ्या प्रमाणात माणसे मरत आहेत आणि आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. लोकांचा जीव मोलाचा आहे, हे आपल्याला कधी कळणार? नुकतेच छत्तीसगडमध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी १३ महिलांचा मृत्यू घडला. या शस्त्रक्रिया शिबिराची अवस्था, त्या वेळी वापरलेली औषधे, अत्यंत वेगाने करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया आणि दिलेले लक्ष्य पूर्ण करण्याची धडपड यातून मानवी जीवनाविषयी असलेली अनास्था पाहावयाला मिळाली. या असाहाय्य गरीब महिलांच्या जीवनाशी खेळ करून, आपण त्यातून सहज सुटून जाऊ, असे मुख्यमंत्र्यांपासून तळाच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना वाटत होते. ही स्थिती कधी बदलेल?

Web Title: Pt Nehru did not forget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.