शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

सरकारी बडव्यांच्या दरबारातील ‘प्रति विठ्ठल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 23:26 IST

उद्धव ठाकरे यांनी जिथं गाभाऱ्यात जाऊन पाद्यपूजा केली नाही, पदस्पर्शही टाळला, तिथं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यानं विठ्ठलासमवेत थेट गाभाऱ्यातच स्नान केलं.

पंढरपूरचा विठ्ठल तसा खूप शांत. विटेवरी पाय अन् कमरेवरी हात ठेवून युगानुयुगे स्थितप्रज्ञ. मात्र, त्याच्या अवतीभवतीच्या लोकांमुळे तो नेहमीच चर्चेत राहिलेला. आता परवाचंच बघा ना. बाहेरचा एकही वारकरी शहरात येऊ न देता पंढरीनं आषाढी एकादशी साजरी केली. सुनसान रस्त्यावरील सन्नाटा आषाढी यात्रेनं इतिहासात पहिल्यांदाच अनुभवला. ही नीरव शांतता सहन झाली नसावी की काय, म्हणूनच बहुधा वारीनंतरच्या प्रक्षाळपूजेनं अवघ्या वारकरी संप्रदायात हलकल्लोळ माजविला. एकादशीच्या पहाटे झालेल्या शासकीय महापूजेचा व्हिडिओही जेवढा पाहिला गेला नसेल, तेवढी एका अधिकाऱ्याच्या पूजास्नानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिथं गाभाऱ्यात जाऊन पाद्यपूजा केली नाही, पदस्पर्शही टाळला, तिथं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यानं विठ्ठलासमवेत थेट गाभाऱ्यातच स्नान केलं.  हे अधिकारी विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेताहेत अन् त्यांच्या पाठीवर सरकारी पुजारी देवाच्या तांब्यानं स्नानाचं पाणी ओतताहेत, हे दृश्य बहुतांश वारकऱ्यांना खटकलं. आयुष्यात प्रथमच वारी चुकवून घरी थांबलेल्या वयोवृद्धांनाही ही घटना आवडली नाही. तशातच पंढरपूरचे भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनीही या विधीवर जोरदार आक्षेप घेतला.

विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेनंतर गाभाऱ्यात साचलेलं पाणी भांड्यात घेऊन बाहेर मंडपात इतरांनी अंघोळ करायची असते, असं स्पष्ट करताना उत्पात यांनी गाभाऱ्यातील मूर्तीसोबत स्नान करण्याच्या या नव्या परंपरेबद्दल खंतही व्यक्त केली. मग काय, मंदिर समितीच्या सदस्यांनाही चेव आला. त्यांनी तत्काळ ‘ऑनलाईन मीटिंग’ घेतली अन् संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर थेट ‘गाभाराबंदी’ घातली. याउपरही हे प्रकरण इथंच थांबलं नाही. आता समितीच्या निर्णयाविरुद्ध मंदिरातील तमाम कर्मचाऱ्यांनी एक ऑगस्टपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय.

वरकरणी हे प्रकरण सरळसोट दिसत असलं तरी याला अनेक किचकट कंगोरे आहेत. मार्चपासून ‘देऊळ बंद’ असल्यानं बाहेरील भक्तांसाठी दर्शन ठप्प. सारे पूजाविधी कर्मचारीच करतात. पूजेवेळी अंगावर पाणी ओतल्यानंतर कार्यकारी अधिकारी मोठ्या कौतुकानं म्हणतात, ‘तुम्ही तर आमचीच प्रक्षाळपूजा केली.’ त्यावेळी पाणी ओतणारा कर्मचारीही ‘हे असंच असतंय देवाऽऽ’ असं उत्तरतो. त्याच्या या वाक्यातच मंदिराचा खूप मोठा इतिहास दडलाय, लपलाय. कित्येक दशकं पंढरीतल्या बडवे मंडळींच्या ताब्यात मंदिर होतं. या बडव्यांच्या एकेक कारनाम्यानं इथला कारभार नेहमीच वादग्रस्त ठरला होता.

विठ्ठल मूर्तीला चक्क मिठी मारून त्याच तांब्यात स्वत:ही स्नान करणारे महाभाग एकेकाळी पंढरीनं पाहिले होते. अखेर युती सरकारच्या काळात मंदिर समिती प्रत्यक्षात कार्यरत झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मधील मंडळींची समितीवर वर्णी लागली. आता महाआघाडी सरकार आलं. सध्याच्या काळात हे मंदिर कसं नेहमीच वादग्रस्त राहील, यासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्यांना इथल्या अधिकाऱ्यांनी आयतीच संधी उपलब्ध करून दिली.

प्रक्षाळपूजेतील कार्यकारी अधिकारी म्हणजे विठ्ठल जोशी. यांचं मूळ नाव सुनील हा भाग वेगळा. विठ्ठलाच्या सेवेसाठी या विठ्ठलाची निवड झाल्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम राबविले. लॉकडाऊन काळात मंदिराला प्राचीन वास्तूचा रंग देण्यापासून ते दर्शनरांगेतील चुकीचे मजले बदलण्यापर्यंत अनेक कामं त्यांनी राबविली. मात्र, ‘पूजेवेळी पुजाऱ्यांकडून चुकून पाणी टाकलं गेलं असावं’ हे त्यांचं स्पष्टीकरण क्षणात त्यांना खोटारडेपणाचं लेबल लावून गेलं. कारण, व्हिडिओतील ‘आमचीच प्रक्षाळपूजा केली कीऽऽ’ हे त्यांचं वाक्य लाखो वारकऱ्यांनी ऐकलेलं. एक चूक लपविण्यासाठी केलेली त्यांची दुसरी चूक समिती सदस्यांच्या पथ्यावरच पडली. त्यांनी ‘गाभाराबंदी’चा निर्णय घेतला. मात्र, यानंतर ‘अधिकाऱ्यांना टार्गेट करून शासन कसं बदनाम होईल, याची वाट पाहणाऱ्या विरोधी पक्षांचे पदाधिकारी या साध्या घटनेचा बागुलबुवा करताहेत,’ असा प्रत्यारोप झाला. तसंच मंदिरातील कर्मचारी संघटनेनं कामबंद आंदोलन जाहीर केलं.

आता मंदिरात कामबंद म्हणजे विठ्ठल-रुक्मिणीची पूजाही होणार नाही की काय, या अनाकलनीय भीतीनं सर्वसामान्य भक्तांच्या पोटात गोळा उठला. खरं तर, मंदिर समितीच्या सदस्यांनी केवळ ठराव करून शासनाकडे पाठवायचे असतात. त्यावर प्रत्यक्षात निर्णय प्रशासनाने घ्यायचे असतात, असाही दावा केला गेला. त्यामुळं मंदिर समितीच्या ‘गाभाराबंदी’ आदेशाला काहीच अर्थ नाही, असंही सांगितलं गेलं. काहीही असो. जुने बडवे गेले. मात्र, नव्या सरकारी बडव्यांच्या दरबारातील या प्रति विठ्ठलामुळं पक्षीय राजकारणाला उगाच चेव आला आहे, हेच खरं. अशातच सुरुवातीला या स्नान विधीवर जोरदार आक्षेप घेणाऱ्या वा. ना. उत्पातांनीही शुक्रवारी अधिकारी जोशींना पूर्ण क्लीनचिट देऊन टाकलीय. आता राहता राहिला विषय, हा धार्मिक कम राजकीय वाद मिटणार कसा? कारण, ‘आम्हाला मंदिरापेक्षा कोरोना महत्त्वाचा आहे,’ असं सांगणाऱ्या बारामतीकरांच्या ताब्यातच या सरकारचा रिमोट आहे ना!

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीUddhav Thackerayउद्धव ठाकरे