पवारांची पॉवरगिरी

By Admin | Updated: October 22, 2014 04:47 IST2014-10-22T04:35:46+5:302014-10-22T04:47:39+5:30

शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वाधिक बलाढ्य आणि निसरडे नेते आहेत. गेली ४० वर्षे त्यांनी महाराष्ट्राचे एकहाती राजकारण केले आणि सत्तेच्या खुर्चीवर कोणीही असले तरी त्यांनी तिच्यावर आपलाच वचक राखला

Powerfulness of Pawar | पवारांची पॉवरगिरी

पवारांची पॉवरगिरी

शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वाधिक बलाढ्य आणि निसरडे नेते आहेत. गेली ४० वर्षे त्यांनी महाराष्ट्राचे एकहाती राजकारण केले आणि सत्तेच्या खुर्चीवर कोणीही असले तरी त्यांनी तिच्यावर आपलाच वचक राखला. पक्ष सोडणे व पुन्हा धरणे, टीका करणे व मागाहून मैत्री करणे, वैर दाखविणे आणि तडजोडी करणे हे सारेच त्यांनी या काळात अनेकवार केले आणि तेवढे करूनही आपले राजकारणातील वजन व वर्चस्व कायम राखले. सन १९७८ मध्ये त्यांनी प्रथम काँग्रेसपासून फारकत घेतली व ते तेव्हाच्या पुलोदच्या सरकारचे मुख्यमंत्री झाले. पुढे राजीव गांधींसोबत काँग्रेसमध्ये परतून त्याही पक्षाचे मुख्यमंत्रिपद स्वीकारणे त्यांना जमले. सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावर ते काँग्रेसपासून पुन्हा दूर झाले आणि काही काळातच सोनिया गांधींच्या नेतृत्वातील डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात ते सामील झाले. त्यांनी बाळासाहेब ठाकऱ्यांशी दोन हात केले आणि त्यांच्याशी मैत्रही कायम राखले. परवापर्यंत नरेंद्र मोदींवर ते धर्मांध राजकारण करीत असल्याची टीका पवारांनी केली आणि काल त्यांनीच मोदींच्या पक्षाला राज्य विधानसभेत आपल्या पक्षाचा बिनशर्त पाठिंबाही देऊन टाकला. पवार असे इकडे आणि तिकडे सर्वत्र असतात. त्यांची गरजही साऱ्यांनाच नेमक्या वेळी पडत असते. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्याला बहुमतासाठी शिवसेनेची मनधरणी करावी लागेल असे चित्र उभे राहताच पवारांनी आपले आमदार भाजपासोबत देण्याची तयारी जाहीर करून त्या पक्षाला एकीकडे उपकृत केले आणि त्याच वेळी शिवसेनेची नको तशी गोचीही केली. सत्तेवर जो कोणी असेल वा येण्याची शक्यता असेल त्याच्या बाजूने वा त्याच्यासोबत राहणे ही त्यांच्या आजवरच्या राजकारणाची दिशा राहिली. सत्ताधारी बदलले तरी पवार मात्र त्यांच्या स्थानासह राजकारणावर आरूढ, स्थिर व मजबूत राहिले. भाजपाच्या पुढाऱ्यांनी त्यांच्या पाठिंब्याचे अद्याप स्वागत केले नाही. त्यांच्यातल्या काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसची ‘नॅचरली करप्ट पार्टी’ (एनसीपी) अशी निर्भर्त्सनाही नुकतीच केली. पण ती मनावर न घेण्याएवढे राजकीय निबरपण दाखविणे पवारांना जमते. त्यांचा पाठिंबा घेऊ नका असे लालकृष्ण अडवाणींनी भाजपाच्या आताच्या कर्त्या पुढाऱ्यांना सांगितले आहे. त्यांना बाजूला वा सोबत घेतल्यामुळे त्यांच्या पक्षावरील आजवरच्या आरोपांचे समर्थन करण्याची वा त्यावर पांघरूण घालण्याची जबाबदारी भाजपावर येईल असेच अडवाणींना वाटले असणार. पण त्यांच्याही पक्षाची ती गरज आहे. पवारांचे कार्ड पुढे करून शिवसेनेला वाकविता आले तर ते त्या पक्षालाही हवेच आहे आणि त्या तडजोडीत आपल्या पक्षाभोवती सुरक्षेचे कवच उभे करणे पवारांनाही हवे आहे. त्यांच्या पक्षाचे एक नेते प्रफुल्ल पटेल हे तर भाजपाशी तडजोड करायला फार पूर्वीपासून व्याकुळ होते. अजित पवारांना, तटकऱ्यांना आणि राष्ट्रवादीतल्या अनेकांना स्वसंरक्षणार्थ ही तडजोड हवी आहे. निवडणुकीचा निकाल भाजपाच्या बाजूने एकतर्फी न लागल्यामुळे त्या स्थितीचा फायदा करून घेण्याची नामी संधीही पवारांना उपलब्ध झाली आहे. शिवसेनेशी असलेली युती तुटल्यामुळे भाजपाला ऐनवेळी जेव्हा जास्तीची तिकिटे वाटावी लागली तेव्हा ती मिळवायला पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक जण भाजपाच्या तिकीट खिडकीसमोर रांगेत उभे असलेले आपण पाहिले. त्यातली काही माणसे राजीखुषीने तिकडे गेली असे सांगितले जात असले तरी काही जण त्यांना नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार ते तिथे उभे राहिले असेही सांगणारे लोक बरेच आहेत. आलेल्या कोणत्याही संधीचा वेळीच व योग्य तो उपयोग करून घेण्याएवढी अनुभवी बुद्धिमत्ता पवारांएवढी दुसऱ्या कोणाजवळही नाही. त्यांच्या अशा हिकमतीमुळे त्यांना ‘राष्ट्रीय’ होता आले नसले तरी महाराष्ट्रावर आपली पकड कायम ठेवण्यात व सत्तेच्या मागच्या सीटवर बसून राज्याची गाडी हाकण्यात (बॅकसीट ड्रायव्हिंग) ते नेहमीच यशस्वी ठरत आले. भाजपाला पाठिंबा देण्याची त्यांनी केलेली खेळी भाजपाचे नेते स्वीकारतात की त्यांना ताटकळत ठेवून दरम्यानच्या काळात पुन्हा शिवसेनेशी बोलणी करतात ते आता पाहायचे. भाजपाला पाठिंबा देण्याच्या पवारांच्या निर्णयाला त्यांच्या पक्षाच्या केरळ व दिल्लीतील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. मात्र पवारांना त्याची फारशी पर्वा नाही. आपल्या पक्षात सर्वेसर्वा असणे ज्यांना जमते त्यांनाच असे ‘पॉवरगिरी’चे राजकारण करणेही जमत असते.

Web Title: Powerfulness of Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.