- विजय सिद्धावार, सामाजिक कार्यकर्ते

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या नफा-तोट्याचा आढावा घेण्यासाठी पुनर्निरीक्षण समिती नेमण्याची घोषणा केली आहे. लोकशाहीत अशा व्यापक विचार व चर्चा करण्याच्या व्यासपीठाचे स्वागतच करायला पाहिजे. मात्र पूर्वग्रहदुषित हेतूने केवळ दारूबंदी हटविण्यासाठी देखावा म्हणून अशा समितीची स्थापना होण्याऐवजी वास्तव जाणून घेण्यासाठी आणि घेतलेल्या निर्णयातील त्रुटी दूर करून आदर्शवत व्यवस्था कशी निर्माण करता येईल, या सकारात्मक भूमिकेतील समिती झाली तर, ते राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.

दारूबंदी म्हणजे केवळ, दारूची दुकाने बंद करण्याची प्रक्रिया नाही तर तो विचार आहे. दारूमुळे लाखो मद्यपी उद्ध्वस्त होतात. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांचीही फरफट होते. समाजात गुन्हेगारीपासून इतर अनेक अनिष्ट बाबी या दारूमुळेच घडतात. अनेक सामाजिक संस्था दारूबंदी आणि व्यसनमुक्तीसाठी काम करीत आहेत. मात्र त्यामुळे पूर्ण दारूबंदी झाली, असे दिसून येत नाही. परिणामी, दारूबंदीचा विचार हा समाजात रुजला पाहिजे याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक आणि तेही वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. मात्र इतरत्र याच्या विपरीतच अनुभव येत आहे.महाराष्ट्रात दारूला राजमान्यता आहे, आणि ही राजमान्यता एवढी आहे की, हळूहळू याला समाजमान्यताही मिळू लागली आहे. पूर्वी दारू हा विषय वाईट प्रवृत्तीचा आणि गुन्ह्याचा होता. मात्र सरकारी धोरणामुळे, शासनाच्या ‘नफा’ थिअरीमुळे दारूला समाजमान्यता मिळून कुटुंबासह एकत्र दारू पिण्याचे ‘बीयरबार’ राज्यात सर्वत्र तयार झाले. दारू पिण्यालाच प्रतिष्ठा आल्याचे चित्र विदारक आहे. चंद्र्रपूर जिल्हा दारूबंदीनंतर, मात्र जिल्ह्यात ‘दारू’ या विषयाला राजमान्यता नसल्याने तो समाजमान्यतेचा राहिला नाहीच तर तो गुन्ह्याचाही विषय झाला आहे. आज चंद्रपूर जिल्हा दारूबंदीवर जी टीका किंवा चर्चा केली जाते, ती याच बाजूने केली जाते. दारू ही वाईट असेल तर त्याकडे पाहण्यांचा दृष्टिकोनही तसाच असायला हवा, हे चंद्रपूर जिल्हा दारूबंदीने निश्चितच दाखवून दिले आहे.दारू दुकानांमुळे, अपघातांचे प्रमाण वाढते, हे सुप्रीम कोर्टाने मान्य केले. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीतही अपघात कमी झाल्याचे आकडे पोलीस प्रशासनाने जाहीर केले आहेत. राज्यात सगळीकडे अपघाताचे प्रमाण वाढत असताना, ते चंद्रपूर जिल्ह्यात कमी होणे हे दारुबंदीचे यश नक्कीच आहे. एक जीव जरी वाचला, तरी त्या जीवाचे मोल आपण पैशात कसे मोजणार? दारुबंदीनंतर, पहिल्या वर्षभरात पोलिसांनी पाच लाख लीटर दारू पकडल्याची आकडेवारी जाहीर झाली. पकडलेल्या दारूपेक्षा दहापट अधिक दारू प्रत्यक्षात विकली गेली, असे गृहीत धरले तरी, ती पन्नास लाख लीटर होईल. दारूची दुकाने सुरू असताना, २ कोटी २५ लाख बल्क लीटर दारू वर्षाला विकल्याची अधिकृत आकडेवारी आहे.
 दारुबंदीनंतर, पोलीस सतर्क होतात आणि अवैध व्यावसायिकांवर नजर ठेवतात आणि त्यातून अनेक प्रकारचे गुन्हेगार नजरेत येतात हे चंद्रपूरच्या दारुबंदीतून दिसून आले. अर्थात, यामुळे इतरही काही प्रकारचे गुन्हे कमी झाले असतील. असेच अनेक अप्रत्यक्ष विधायक परिणाम खचितच झाले असतील. दारुबंदीनंतर, दारुबंदीची अंमलबजावणी करताना, पोलिसांनी अवैध दारू तस्करी शोधताना, ड्रग्ज तस्करही पकडले. मुंबई-ठाणेसह राज्यात सर्व जिल्ह्यात ड्रग्जची विक्री होत असताना, ते केवळ चंद्रपुरात सापडत असेल तर, ते दारुबंदीच्या अंमलबजावणीकडे पोलिसांच्या पाहण्याच्या नजरेमुळेच आहे.

दारुबंदीचे अभ्यासक आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी, चंद्रपूर जिल्हा दारुबंदीच्या पूर्वी आणि नंतर दारू पिणाऱ्यांचे सर्वेक्षण केले. दारुबंदीपूर्वी जिल्ह्यात वर्षाला १९२ कोटीची दारू प्यायचे. दारुबंदीनंतर एका वर्षात हा आकडा ९0 कोटी रुपयांनी कमी झाला. दारुबंदीच्या पूर्वीपेक्षाही सध्या जिल्ह्यातील दारूचे प्रमाण जास्त आहे, हा केवळ न मोजताच बोलला जाणारा तर्क आहे. सर्च या संस्थेने दारुबंदीमुळे तेथे दारू पिणाऱ्यांवर आणि दारूच्या प्रमाणावर काय परिणाम झाला हे मोजण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यात काय दिसले तर पुरुषांमध्ये दारू पिणाºयांचे प्रमाण ३७ टक्क्यांहून २७ टक्क्यांवर आले होते, दारू मिळण्याचे अंतर ३ किलोमीटरहून ८.५ किलोमीटर एवढे वाढले होते आणि दारू विकत घेण्यावर जिल्ह्याचा खर्च ८६ कोटी रुपयांनी कमी झाला. हे दारुबंदीचे यश नाही काय?

Web Title: positive Approach is necessary with liquor ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.