शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नगरच्या हत्याकांडाने राजकीय वातावरण ढवळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:16 IST

या आठवड्यात महाराष्ट्रावर सावट होतं, नगरच्या राजकीय हत्याकांडाचं. काँग्रेस आणि भाजपनं एकमेकांविरोधात केलेल्या राजकीय उपवासानंही हा आठवडा गाजला.

-डॉ. उदय निरगुडकरया आठवड्यात महाराष्ट्रावर सावट होतं, नगरच्या राजकीय हत्याकांडाचं. काँग्रेस आणि भाजपनं एकमेकांविरोधात केलेल्या राजकीय उपवासानंही हा आठवडा गाजला. त्यातच बालभारतीनं दहावीच्या पुस्तकातून राजकारण घुसडल्याच्या आरोपामुळेही हा आठवडा चर्चेत राहिला.एका पोटनिवडणुकीच्या वादातून दोन राजकीय पदाधिकाऱ्यांचा भरदिवसा गोळ्या घालून आणि गुप्तीचे वार करून खून होतो. या हत्याकांडातले आरोपी हे वेगवेगळ्या राजकीय पक्षात असले तरी हे तिघेही एकमेकांची व्याही असतात. पहिल्या गुंडाच्या दोन मुली या इतर दोन राजकीय गुंडांच्या मुलांना दिलेल्या असतात. या तिघांनी मिळूनच हे राजकीय हत्याकांड घडवून आणल्याचा आरोप होतो. साहजिकच पोलिसांकडून त्यातल्या एकाच्या आमदारपुत्राला चौकशीला बोलावलं जातं. तर तिथे चक्क एखाद्या हिंदी चित्रपटालाही लाजवेल अशा पद्धतीने थेट पोलीस मुख्यालयावर हल्ला चढवला जातो. पोलीस मुख्यालयाच्या काचा फोडल्या जातात. पोलिसांना धक्काबुक्कीही होते. तीही जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखासमोरच. मी तुम्हाला कुठल्याही दाक्षिणात्य चित्रपटाचं कथानक सांगत नाहीय. तर हे आहे नगर शहरातल्या राजकीय गुन्हेगारीचं भयावह वास्तव. या नगर शहरात गुंडगिरी आणि सत्ता शब्दश: हातात हात घालून चालतायत आणि अभद्र युतीला कोणताच राजकीय पक्ष अटकाव करत नाहीय. कारण गुंडगिरीतून सत्ता आणि सत्तेतून दहशतीचं राजकारण हेच नगरमधल्या राजकारणाचं सूत्र आहे. काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर, शिक्षा भोगत असलेली त्याची मुलं, राष्ट्रवादीचा विधान परिषदेचा आमदार अरुण जगताप आणि त्याचा आमदारपुत्र संग्राम जगताप, भाजपचा आमदार शिवाजी किर्डले हे तिघेही या दुहेरी राजकीय हत्याकांडातले प्रमुख आरोपी आहेत. सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाºयांचा या राजकीय हत्याकांडात खून झाल्यानं शिवसेना प्रचंड खवळलीय. तर राष्ट्रवादीच्या अजित पवारांना या हत्याकांडात आपल्या पक्षाच्या आमदारांना केवळ राजकीय सूडापोटी अडकवल्याचं वाटतंय. या राजकीय आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी भाजपची मात्र कोंडी झालीय. हे सगळं नगरमध्येच का घडतंय? थेट पोलीस मुख्यालयावरच हल्ला करण्यासाठी ही मंडळी नेमकी धजावतातच कशी? आणि हल्ल्यासाठी आपल्याच मित्रपक्षाला जबाबदार धरणारी शिवसेना अजूनही सत्तेत कशी काय राहू शकते? असे अनेक सवाल यानिमित्तानं उपस्थित होतात.ज्या नगर जिल्ह्यानं सहकाराला आधार दिला, त्याच जिल्ह्यात नेत्यांनी सहकारनं गुन्हेगारी साम्राज्य उभारले. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती नगरजवळच्या नेवाशात. शिर्डीच्या साईबाबांनी जगाला समतेचा संदेश दिला. प्रेमाचा संदेश देणाºया मेहेरबाबांनी आपला शेवटचा श्वास नगरलाच घेतला. कवी रेव्हरंड टिळक, लक्ष्मीबाई टिळक, अच्युतराव पटवर्धन, बाळासाहेब भारदे, सदाशिव अमरापूरकर, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध लढणारे अण्णा हजारे, आदर्श गाव उभारणारे पोपटराव पवार, सेवाकार्यात नवा आदर्श निर्माण करणाºया गिरीश कुलकर्णींचं सेवालय, डॉ. राजेंद्र धामणे यांचे माऊली प्रतिष्ठान असा संपन्न वारसा या जिल्ह्याला आहे. नगरच्या किल्ल्यात तुरुंगवासात असतानाच पंडित जवाहरलाल नेहरूंना ‘भारताचा शोध’ लागला. आज याच संपन्न जिल्ह्याला कलंक लागलाय. आज नगरमध्ये राजकारणाच्या ‘गुन्हेगारीचा शोध’ लागतोय.काँग्रेस भाजपचा राजकीय उपवासदेशात सामाजिक अशांतता निर्माण झाल्याचा आरोप करीत त्याचा निषेध म्हणून काँग्रेसनं सोमवारी उपवास केला. दिल्लीसह देशभरात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी यात भाग घेतला. सकाळी साडेदहा ते साडेचार अशी उपवासाची वेळ. म्हणजे जेमतेम सहा तासांचा उपवास. आता साडेदहा ते साडेचार काहीच खायचं नाही, म्हणजे भरपेट खाल्लं तर चालतं, असा सोयीस्कर अर्थ काही जणांनी काढला. अजय माकन, अरविंद सिंह कोहली आणि अन्य काही काँग्रेस नेते छोले-भटुरेंवर यथेच्छ ताव मारत असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले. दिल्लीत महात्मा गांधींच्या समाधीच्या साक्षीनं आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भरल्यापोटी काँग्रेस नेत्यांचं उपोषण सुरू झालं. तर देशभरात तिथल्या स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली उपवासाचा हा इव्हेंट पार पडला. दुरावलेल्या दलितांना, अल्पसंख्याकांना जवळ करण्यासाठी उपवासाचा हा घाट घालण्यात आला. पण एकाही नेत्याला या उपवासाचं गांभीर्य नव्हतं. हा उपवास नाही तर अपहास आहे, काँग्रेस सत्याग्रह नाही तर मिथ्याग्रह करत असल्याचा टोला भाजपनं लगावला. विशेष म्हणजे भाजपनंही १२ एप्रिलला एक दिवसाच्या उपोषणाचा इव्हेंट पार पाडला. या दोन्ही उपवासांचं हसं झालं.काँग्रेसनं आणि भाजपनं हा इव्हेंट घडवून दलित, अल्पसंख्याकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण भरपेट खाऊन उपवास करणाºया या नेत्यांना पाहून लोकांची करमणूक तेवढी झाली. सत्तेत असताना लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं. सत्तेचा माज करायचा. आणि निवडणुका आल्या की मग उपास-तापास, देवदर्शनासाठी रांगा लावायच्या. केवळ भावनांचं राजकारण करायचं. हेच आजचं राजकीय वास्तव बनलंय. अशा भूलथापांना बळी पडण्याएवढी जनता दूधखुळी नाही.पाठ्यपुस्तकावरून वादआपल्या देशात न बघताच चित्रपटांवर बंदी घातली जाते. गोमांसाच्या संशयावरून घरात घुसून बेदम मारहाण केली जाते. रस्त्यांची नावं बदलली जातात. वास्तूंची नावं बदलली जातात. वसाहतवादाच्या खुणा पुसण्याचा प्रयत्न होतो. पुतळे खाली पाडले जातात. महापुरुषांना आपल्याला हव्या त्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न केला जातो. संसदेचं अधिवेशन वाया जातं. सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशांचे मतभेद चव्हाट्यावर येतात. न्याययंत्रणा आणि सरकारमध्ये खटके उडतात. नोकरशाही विरु द्ध राजकारणी अशा संघर्षात लोकांची कामं मागे पडतात. आता शिक्षणक्षेत्रातल्या एका ताज्या बातमीनं वाद निर्माण झालाय. जिला राजकीय वास येतोय. आतापर्यंत इतिहासाच्या पुस्तकावरून वाद व्हायचा. आता एसएससी बोर्डाच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकावरून वाद रंगलाय. राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात देशातल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची माहिती देण्यात आलीय. पण, असं करताना घराणेशाही आणि एकाच कुटुंबाच्या मक्तेदारीवर केलेली टीका वादाचा विषय बनलीय. यामुळे काँग्रेस डिवचली गेलीय. तर पुस्तकात कम्युनिस्टांच्या फुटीचा आवर्जून उल्लेख आहे. मराठी अस्मिता जपणारा पक्ष म्हणून शिवसेनेचं कौतुक करण्यात आलंय. भाजपचं वर्णन संस्कृती जपणारा आणि आर्थिक विकास साधणारा पक्ष असं करण्यात आलंय. दहावीच्या विद्यार्थ्यांचं वय जेमतेम १५ वर्षांचं असतं. तो मतदारही नसतो. त्यांना भावी मतदार घडवण्याचा भाजपचा हा डाव आहे का? जर भाजपची सत्ता नसती तर असे धडे दिले गेले असते का? रस्ता असो, वस्तू ७असो अथवा एखदी योजना, प्रत्येकाला गांधी-नेहरूंचं नाव देणाºया काँग्रेसनं आता भाजपला बोल लावणं योग्य आहे का? आता निवडणुकीत जिंकलेल्या पक्षांच्या प्रमाणं शैक्षणकि पुस्तकंही बदलली जाणार का? असे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतात.या सर्व गदारोळात तिकडे आॅस्ट्रेलियात कॉमनवेल्थ गेम्समधून प्रचंड उत्साही असं क्षणाक्षणाला काहीतरी घडतंय. हा लेख लिहितोवर तेजस्विनी सावंत, मधुरिका पाटकर, राहुल आवारे या मराठमोळ्या क्र ीडापटूंनी पदकांची अक्षरश: लूट केली. गावागावात आज उन्हाळ्याच्या सुटीत अशा खेळांचे छंदवर्ग भरवले जात आहेत. अशा छंदवर्गातून प्रेरणा घेऊन कुणी तेजस्विनी, कुणी मधुरिका किंवा कुणी राहुल पुढच्या कॉमनवेल्थ गेम्सची तयारी करत असतील. या आठवड्यात लक्षात ठेवावी, अभिमान वाटावी, अशी फक्त हीच घटना असावी.(न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक)