रुग्णांची पिळवणूक
By Admin | Updated: July 25, 2014 09:51 IST2014-07-25T09:49:59+5:302014-07-25T09:51:08+5:30
आयर्विंग वॉलेस या जगप्रसिद्ध लेखकाने त्याच्या ‘फायनल डायग्नोसिस’ या कादंबरीत शल्यचिकित्सक (सर्जन्स) व पॅथॉलॉजिस्ट यांच्यातील एका नैतिक तणावाचे विलक्षण प्रत्ययकारी वर्णन केले आहे.

रुग्णांची पिळवणूक
>आयर्विंग वॉलेस या जगप्रसिद्ध लेखकाने त्याच्या ‘फायनल डायग्नोसिस’ या कादंबरीत शल्यचिकित्सक (सर्जन्स) व पॅथॉलॉजिस्ट यांच्यातील एका नैतिक तणावाचे विलक्षण प्रत्ययकारी वर्णन केले आहे. हा तणाव उभा करणारे दोघेही आपापल्या क्षेत्रातील उच्चतर ज्ञानासाठी व त्यांच्या व्यक्तिगत नैतिकतेसाठी प्रसिद्ध असतात. आणि त्यांचा वादही सत्याच्या शोधाचा असतो. या कादंबरीच्या पार्श्वभूमीवर देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी संसदेत केलेला डॉक्टर्स व पॅथॉलॉजिस्टस् यांच्यातील अभद्र युतीविषयीचा आरोप गंभीर व अजाण रुग्णांना धक्का देणारा आहे. आजार साधाही असला तरी त्या रुग्णाला सर्वतर्हेच्या चाचण्या करायला लावणे, त्यासाठी त्याला वेगवेगळ्य़ा पॅथॉलॉजिस्टांकडे पाठविणे, त्या प्रत्येक चाचणीसाठी त्याला पैसे मोजायला भाग पाडणे आणि त्याने तेथे दिलेल्या पैशाचा ३0 ते ५0 टक्क्यांएवढा वाटा स्वत:कडे वळवून घेणे हा अनेक डॉक्टरांचा चोरधंदा आहे आणि तो कमालीच्या सराईतपणे देशभर केला जात आहे असे आरोग्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. हर्षवर्धन यांच्या या आरोपात काहीएक असत्य नाही. कोणत्याही खासगी रुग्णालयात जाणार्या वा दाखल होणार्या रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना दरदिवशी घ्यावा लागणारा हा संतापजनक अनुभव आहे. अशा डॉक्टरांकडे जाणारी धनवंत माणसे याविषयी बोलत नाहीत आणि गरीब माणसांमध्ये ते बोलून दाखविण्याची हिंमत नाही. कट प्रॅक्टिस म्हणून शहरांपासून खेड्यांपर्यंत सर्वत्र केला जाणारा हा डॉक्टरी गोरखधंदा सार्यांच्या माहितीचा आहे. डॉक्टरी हा सन्मानाचा पेशा आहे आणि तो करणार्यांच्या हाती आपले प्राण विश्वासाने सोपविणार्या भाबड्यांचा मोठा वर्ग समाजात आहे. नेमका हा विश्वास धंद्यासाठी व पैशासाठी वापरण्याचा येथील धंदेवाईकांचा व्यवहार त्यांच्या व्यवसायाला कमीपणा आणणारा आणि त्याला थेट कसायाच्या पातळीवर नेणारा आहे. रुग्ण दवाखान्यात असेपर्यंत त्याविषयी बोलू शकत नाही आणि बरा होऊन बाहेर पडल्यानंतर त्याविषयी बोलण्यात त्याला अर्थ वाटत नाही. परिणामी डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजिस्टस् यांची धंदेवाईक मैत्री बहरते आणि ते दोघेही अल्पकाळात बर्यापैकी संपन्न होतात. कट प्रॅक्टिसचा हा प्रकार एवढय़ावरच थांबत नाही. डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजिस्टस् जी औषधे सुचवतील ती कोणत्या फार्मसीतून आणायची हेही ठरले असते व ते सक्तीने सांगितले जाते. या फार्मसीवाल्यांवरही त्यांच्याकडे प्रिस्क्रीप्शन पाठविणार्या डॉक्टरांना काही टक्के रक्कम देण्याची सक्ती असते. दरदिवशी या रकमेचे हिशेब होतात आणि ते नेमके रात्रीच डॉक्टरांकडे पोहचते केले जातात. डॉक्टरांनी पॅथॉलॉजिस्टांना धंदा पुरविणे, फार्मसीवाल्यांना गिर्हाईके पुरविणे आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून असे कमिशन घेणे हा नित्याचा प्रकार आहे. मात्र डॉक्टर आणि दवाखाने हा अजूनही आदराचा व भीतीचा विषय असल्याने त्यांना याबाबतीत हात लावायला कोणी धजावत नाही. अशा डॉक्टरांना व दवाखान्यांनाच नव्हे तर पॅथॉलॉजिस्टांनाही मोठाली कमिशने देणार्या बड्या औषधी कंपन्याही सरकारला ठाऊक आहेत. अतिशय कमी दरात तयार होणारी औषधे प्रचंड किंमतीची लेबले लावून बाजारात आणायची आणि ती विकत घ्यायला या कंपन्यांच्या गळाला लागलेल्या डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना भाग पाडायचे असा हा व्यवहार आहे. या कंपन्यांना मिळणारा नफा मोठा आहे. तो आपल्या औषधांच्या जाहिरातींएवढाच अशा विकत घेतलेल्या डॉक्टरांवरही खर्च करणे त्यांना जमणारे आहे. डॉक्टरांच्या तथाकथित जागतिक परिषदा, चर्चासत्रे आणि त्यांचे पर्यटन स्थळी होणारे मेळावे यांचा खर्च कोण करतो हेही सरकारने कधीतरी तपासले पाहिजे. या मंडळीची विमान प्रवासापासून हॉटेलातील निवासापर्यंतची सारी व्यवस्था तिच्यावरील खर्चासकट या कंपन्यांकडून केली जाते. आपल्याला फुकट मिळणार्या या सोयीसाठी मग डॉक्टर्सही आपल्या परीने झटत असतात. त्यांना सवलती मिळत असतील, त्यांचे प्रवास भागत असतील आणि त्यांना कमिशने मिळत असतील तर त्याविषयीच्या तक्रारीचे कारण नाही. तिचे कारण या प्रकारात रुग्णांची होणारी पिळवणूक हे आहे. अनेक डॉक्टर्स आपले बिल चेकने घेत नाहीत. ते रोख स्वरूपात मिळावे असा आग्रह धरतात. कर बुडवेपणासाठीच हे केले जाते हे उघड आहे. तात्पर्य, डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजिस्टस् यांच्या संबंधांवरच हर्षवर्धन यांना थांबता येणार नाही. त्या क्षेत्रात शोधावे व सापडावे असे बरेच काही आहे.