महाराष्ट्राच्या फाळणीचा केक
By Admin | Updated: April 16, 2016 04:12 IST2016-04-16T04:12:10+5:302016-04-16T04:12:10+5:30
अॅड. श्रीहरी अणे यांच्या वाढदिवशी महाराष्ट्राचा नकाशा असलेल्या केकचे तुकडे करायचे, त्यातून विदर्भ वेगळा करायचा आणि चाहत्यांनी आपल्या नेत्याने महापराक्रम केल्याच्या

महाराष्ट्राच्या फाळणीचा केक
- गजानन जानभोर
(सहाय्यक संपादक, लोकमत)
अॅड. श्रीहरी अणे यांच्या वाढदिवशी महाराष्ट्राचा नकाशा असलेल्या केकचे तुकडे करायचे, त्यातून विदर्भ वेगळा करायचा आणि चाहत्यांनी आपल्या नेत्याने महापराक्रम केल्याच्या अविर्भावात जल्लोष साजरा करायचा?
ही पोरकट मानसिकता कशाची द्योतक आहे?
स्वतंत्र विदर्भ राज्य आपल्याला कशासाठी हवे? पश्चिम महाराष्ट्र, पुण्या-मुंबईतल्या नागरिकांचा द्वेष करण्यासाठी की विदर्भाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी? विदर्भ राज्याची चळवळ ऐरणीवर असताना प्रत्येक विदर्भवाद्याने हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारावा आणि त्यानंतरच विदर्भवादी अॅड. श्रीहरी अणे यांच्या वाढदिवसाचा महाराष्ट्राची ‘फाळणी’ केलेला केक तोंडात घालावा. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी महाधिवक्तापद बाणेदारपणे भिरकावून देणाऱ्या श्रीहरी अणेंना वैदर्भीयांनी डोक्यावर घेतले आहे. त्यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. पण विदर्भ राज्याच्या चळवळीच्या नेतृत्वाला एक शाप मिळालेला आहे. वैदर्भीय जनता मोठ्या विश्वासाने ज्यांच्या हातात या चळवळीची धुरा सोपविते त्या माणसांना जसजशी गर्दी वाढू लागते तसतसा कैफ चढू लागतो आणि ते नंतर भरकटत जातात. अणेंचेही असेच होणार का? अशी भीती जाणकारांना वाटू लागली आहे.
परवा अणेंनी कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी केक कापून वाढदिवस साजरा केला, ही बाब तशी स्वाभाविक. पण महाराष्ट्राचा नकाशा असलेल्या केकचे तुकडे करायचे, त्यातून विदर्भ वेगळा करायचा आणि चाहत्यांनी आपल्या नेत्याने महापराक्रम केल्याच्या अविर्भावात जल्लोष करायचा? ही पोरकट मानसिकता कशाचे द्योतक आहे? हा पराक्रम नाही, विदर्भाच्या अभिमानाचा तो विषयही नाही. यातून विदर्भ राज्याचा अभिमान प्रकट होतो, असे या मंडळींना वाटत असेल तर त्याएवढा या सुसंस्कृत प्रदेशाचा दुसरा अपमानही नाही. या केकच्या फाळणीला महाराष्ट्रातील इतर प्रदेशांतील लोकांबद्दलच्या द्वेषाची, दुस्वासाची आणि असूयेची किनार आहे. वाढदिवसाच्या केकवरील महाराष्ट्राचे तुकडे होताना असुरी आनंद उपभोगणाऱ्या अणेभक्तांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्याला ‘वेगळे राज्य’ हवे, ‘वेगळा देश’ नाही. आपल्याला राज्याची फाळणीही करायची नाही. आपले मागासलेपण दूर करण्यासाठी, आपल्याला विदर्भ राज्य हवे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचा द्वेष करून आपल्याला वेगळा विदर्भ होऊ द्यायचा नाही. कारण अशी विघटनवादी मानसिकता देशाच्या एकात्मतेसाठी घातक ठरत असते. विदर्भ राज्य झाल्यानंतर इतर प्रदेशातील नागरिकात आणि आपल्यात कुठलीही ‘वाघा बॉर्डर’ निर्माण होणार नाही, याची काळजी विदर्भवाद्यांनी घेण्याची गरज आहे. पण ती ‘बॉर्डर’ नकळत बांधण्याचे पातक अतिउत्साहाच्या भरात अॅड. अणे यांच्या हातून घडले आहे. विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक असलेल्या आजवरच्या थोरामोठ्यांनी हे राज्य निर्माण करताना हा देश एकसंध राहायलाच हवा, ही भावना वेळोवेळी पोटतिडकीने मांडली होती. त्यात अणे यांचे पणजोबा लोकनायक बापूजी अणे यांचाही समावेश होता. पण सवंग लोकप्रियतेच्या नादात हा सुविज्ञ, सुसंस्कृत विचारवंत या गोष्टी विसरला. या कायदेपंडिताला राज्यघटनेतील मूल्यांचाही अशावेळी विसर पडला. परवा विदर्भवाद्यांच्या एका कार्यक्रमात नितीन रोंघे या अभ्यासू विदर्भवादी तरुणाने विदर्भावरील अन्यायाची आकडेवारी पुराव्यानिशी, संदर्भासह सादर केली. ती बघितल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकही विदर्भावर अन्याय झाल्याचे मान्य करतील. नितीन रोंघेसारखा तरुण विदर्भ चळवळीतील एक विवेकी आशास्थान आहे.
विदर्भवादी चळवळीचे नेतृत्व करताना कुणाला बळ द्यायचे? केक कापण्यासाठी चाकू घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना की विदर्भ राज्याची चळवळ विवेकाच्या मार्गाने पुढे नेणाऱ्या तरुणांना? ज्यांच्यामुळे विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत, त्या अॅड. श्रीहरी अणे यांनीच या प्रश्नाचा शोध घेणे गरजेचे आहे. चाहत्यांचे मन राखण्यासाठी नेत्यांना असे उथळ वागता येत नाही. आपल्या सहज आणि एरवी क्षुल्लक वाटणाऱ्या कृतीचे प्रतिकूल पडसाद जनमानसावर उमटू शकतात आणि त्यामुळे चळवळीचे नुकसान होऊ शकते, याचे भान नेतृत्वाने बाळगायला हवे. ज्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांचे नेतृत्व याच विदर्भातील जनतेने अव्हेरले आहे, हा या चळवळीचा इतिहास आहे. मराठवाड्यातील लातूरच्या तहानलेल्या जनतेला रेल्वेने पाणी पाठविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीकरांनी उद्या असाच फाळणी करणारा केक कापला तर रेल्वेने तिथे पाणी कधीच पोहोचू शकणार नाही. विदर्भ राज्य स्थापन करताना ते आर्थिकदृष्ट्या समृद्ध करायचेच आहे, पण ते सुसंस्कृत आणि कुणाबद्दल वैरभाव न बाळगणारेही असावे. विदर्भ चळवळीचे साध्य ठरविताना अॅड. अणे यांनी त्याच्या साधनांचाही शोध घ्यायला हवा. नेत्यांवर चप्पल फेकणाऱ्या महिलेचा सत्कार करणे किंवा लोकशाही मूल्यांची फाळणी करणारा केक कापणे, ही विदर्भ राज्याच्या चळवळीची साधणे कधीच होऊ शकत नाहीत.