राज्यपाल, मंत्रीपद नाकारणारे पन्नालाल सुराणा, फाटलेल्या आकाशाला ठिगळं लावणारा माणूस!
By धर्मराज हल्लाळे | Updated: December 6, 2025 09:20 IST2025-12-06T09:18:30+5:302025-12-06T09:20:08+5:30
पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या निधनाने केवळ एक युग संपले नाही, तर एक आदर्श उभा राहिला आहे. ज्याचा मापदंड आजच्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांना झेपावणारा नाही.

राज्यपाल, मंत्रीपद नाकारणारे पन्नालाल सुराणा, फाटलेल्या आकाशाला ठिगळं लावणारा माणूस!
- धर्मराज हल्लाळे
फाटलेल्या आभाळाला ठिगळं लावणारा माणूस पाहून कोणीतरी म्हटलं —
“अरे बाबा, हे आभाळच पूर्ण फाटलंय… कुठे कुठे ठिगळं लावणार?”
त्या माणसाने शांतपणे उत्तर दिलं...
“मला माहीत आहे की आभाळ फाटलंय. पण त्याला आणखी छिद्र पाडणाऱ्या मणभर लोकांमध्ये उभं राहण्यापेक्षा, ते शिवणाऱ्या कणभर लोकांच्या रांगेत उभं राहणं मला जास्त मान्य आहे.”
हीच विचारधारा होती पन्नालाल भाऊ सुराणा यांची.
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील एक दुर्मिळ आणि निर्भय नाव.
वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरच्या श्वासापर्यंत “व्यवस्थेला बदलणं” हेच त्यांचे ध्येय.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने केवळ एक समाजसेवक गमावला नाही,तर सामाजिक नैतिकतेचे उगमस्थान असलेला एक अखंड वाहता झरा आटला आहे.
पद, सत्तेच्या मोहापासून दूर...
जनता पार्टीचे सरकार केंद्रात होते.
राज्यपालपद! पन्नालाल भाऊंना देण्याचा प्रस्ताव आला. बहुतेक जणांना हे पद म्हणजे आयुष्याचा शिखर क्षण. परंतु पन्नालाल भाऊं म्हणाले, “हे पद स्वीकारण्या पेक्षा, त्याहून अधिक मोलाचे कामं मला संघटनेचे वाटते. राष्ट्र सेवादल अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची आहे.'' आणि त्यांनी तो प्रस्ताव नाकारला.
१९७८ मध्ये ते विधानसभा निवडणूक लढले. १९०० मतांनी पराभूत झाले. यानंतर त्यांना विधानपरिषदेतून आमदार करून मंत्री करण्याची चर्चा झाली. परंतु त्यांनी एकच वाक्य सांगितले-
“जनतेने मला नाकारलं आहे. मागच्या दरवाजातून मंत्री बनणं स्वीकारार्ह नाही.”
धोरणापेक्षा पद महत्त्वाचं मानणाऱ्या गर्दीत पन्नालाल सुराणा हे जणू अजिंक्य पुरुष होते.
संघर्षाचा प्रवास...स्वातंत्र्य लढ्यातून आणीबाणीपर्यंत...
विनोबांच्या भूदान चळवळीत प्रत्यक्ष सहभाग.
आणीबाणीविरोधी आंदोलनात तुरुंगवास.
राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्षपद.
निव्वळ बोलक्या विचारांच्या पलीकडे कृतीशील कार्यक्रमांवर आग्रही भूमिका.
ते फक्त विचारवंत नव्हते. ते पथदर्शक होते.
किल्लारी भूकंपानंतर निराधारांसाठी ‘आपलं घर’...
१९९३ च्या किल्लारी भूकंपाने लाखो लोक उद्ध्वस्त झाले. त्याच काळात पन्नालाल भाऊ यांनी नळदूर्ग येथे ‘आपलं घर’ उभं केलं. आजपर्यंत ३,००० पेक्षा अधिक बालकं, तिथून शिकून स्वावलंबी झाली. भाऊंच्या पत्नी डॉ. विणाताई सुराणा, ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या.
भ्रष्टाचाराशी थेट भिडले
वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर पन्नालाल भाऊंचा लढा परवापर्यंतही सुरू होता. ‘आपलं घर’ संस्थेच्या अनुदानासाठी सरकारी यंत्रणेने लाच मागितली, तेव्हा भाऊंनी सरळ, स्पष्ट, निडर भूमिका घेतली. नाही म्हटले, दबाव मानला नाही, तडजोड केली नाही, आणि ते लढले, वयाच्या ९०+ वर्षी ! आज समाजात 'जाऊ तिथे खाऊ' ही व्यवस्था माजली आहे. त्या व्यवस्थेच्या तोंडावर पन्नालाल सुराणांनी दिलेली चपराक आजही घणाघाती आहे.
तरुणांसाठी विद्यापीठ
भेटायला आलेल्या प्रत्येक तरुणाच्या मनात ते लढण्याची उर्मी जागवून पाठवत. ते म्हणायचे, समाज ताबडतोब बदलत नाही. हिम्मत ठेवा. हळूहळू बदल होईल. त्यामुळे सर्व काही माझ्यासमोर बदलेले आणि ते मीच करेन असा आग्रह का? छोटी, छोटी अपयशं ही तुमची दिशा बदलायला कारण ठरू नयेत.
ते म्हणायचे, “अन्याय पाहून स्वस्थ बसणं म्हणजे अन्यायाला पाठबळ देणं.” आणि त्यांनी हा सिद्धांत अखेरच्या दिवसापर्यंत जगला.
अखरेचा सलाम...
पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या निधनाने केवळ एक युग संपले नाही, तर एक आदर्श उभा राहिला आहे. ज्याचा मापदंड आजच्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांना झेपावणारा नाही. तरी, अशा थोर पुरुषाला महाराष्ट्राचे कृतज्ञ नमन.
फाटलेल्या आभाळाला ठिगळं लावण्याची त्यांनी दाखवलेली उमेद आपल्याकडे राहिल...
हेच त्यांचं खरं स्मारक!