‘टीम इंडिया’चे पानिपत
By Admin | Updated: August 19, 2014 09:41 IST2014-08-19T09:41:16+5:302014-08-19T09:41:33+5:30
गेल्या महिन्यात लॉर्ड्सवर ज्या दमाने धोनीसेना लढली, जिंकली आणि तिने इतिहास घडवला, तो पाहून भारतीय चाहत्यांची छाती अभिमानाने भरून आली होती

‘टीम इंडिया’चे पानिपत
>गेल्या महिन्यात लॉर्ड्सवर ज्या दमाने धोनीसेना लढली, जिंकली आणि तिने इतिहास घडवला, तो पाहून
भारतीय चाहत्यांची छाती अभिमानाने भरून आली होती. कर्णधार असताना विजयी झाल्यावर टी-र्शट हवेत भिरकावणारा सौरव गांगुली प्रत्येकाला आठवला होता. क्रिकेटच्या मायभूमीवर इंग्लंडला हरविणे हा सुवर्णक्षण भारतीयांना अनुभवायला मिळाला. पण त्यानंतर सलग तीन कसोटींमध्ये जे घडले ते सारे भारतीय चाहत्यांना शरमेने, नामुष्कीने मान खाली घालायला लावणारे होते. लॉर्ड्स गाजवणारी ही धोनीसेना पुढील तीन सामन्यांत भुईसपाट होईल, याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. इंग्लंड दौर्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत नामुष्कीजनक पराभव पत्करणार्या टीम इंडियाच्या क्षमतेबद्दलच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लॉर्ड्सवर जिंकणारा भारतीय संघ एक ‘टीम’
म्हणून खेळताना दिसला होता. त्यांची देहबोलीही जिंकण्याच्या ईर्षेने मैदानात उतरलेल्या सैनिकांप्रमाणे होती. शांत आणि संयमी धोनीचे सर्व डावपेच कामी येत होते. मैदानावर प्रत्येक खेळाडू जिवाचे रान करताना दिसत होता. पण पुढील तीन सामन्यांमध्ये याच सार्या गोष्टींचा अभाव दिसला. जिंकण्याची जिद्द एकाही खेळाडूच्या चेहर्यावर, देहबोलीत दिसत नव्हती. सलामीलाच गौतम गंभीर, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, कर्णधार महेंद्रसिंह धोनी अशा दिग्गज फलंदाजांची फळी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर सपेशल लोटांगण घालताना पाहणे, भारतीय चाहत्यांसाठी लाजिरवाणेच होते. तिसर्या कसोटीत ज्या धावपट्टीवरून ४८६ धावांचा डोंगर उभा केला त्याच ठिकाणी भारताचे शेर दोन डावांमध्ये एकूण २४२ धावांच काढू शकले. एक काळ गाजवलेला अनुभवी गौतम गंभीर दुहेरी धावसंख्याही गाठू शकत नव्हता. अखेरच्या कसोटीत तर तो धावबाद झाला. कसोटीत चोरटी धाव घेण्याची बुद्धी त्याला कुठून सुचली असेल, तोच जाणो. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराचीही तीच गत. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तर त्यांची चांगलीच भंबेरी उडवली. गरम रक्ताच्या विराट कोहलीला तर सारा भारत ‘नेक्स्ट कॅप्टन’ असे मानतोय. पण गेल्या तीन कसोटी सामन्यांतील त्याची देहबोली, एखाद्या नवख्या खेळाडूलाही शोभणार नाही अशीच होती. या तीन कसोटींमुळे भारतीय संघावर आपल्या क्षमतेचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. टी-टष्द्वेंटी आणि एकदिवस प्रकारात मैदान गाजवणारे हेच खेळाडू कसोटीत मात्र नापास होत आहेत. डावपेचातही धोनी फोल ठरत आहे. क्रिकेटच्या प्रकारानुसार आपल्याला आपल्या खेळात बदल करता आला पाहिजे, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे. जंटलमन्स गेम म्हणून प्रसिद्ध असणार्या कसोटी प्रकारासाठी भारतीय खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करता आले पाहिजे. पण कमी वेळेत भरघोस प्रसिद्धी आणि भरमसाट पैसा मिळवून देणार्या अतिजलद क्रिकेटची भारतीय खेळाडूंना सवय लागली आहे. याच प्रकारांमुळे भारतीय खेळाडू कायम प्रसिद्धीच्या कळसावर राहिलेले आहेत. मोठमोठय़ा ब्रँडच्या जाहिराती मिळवून भरपूर पैसा कमावणारे हे खेळाडू जगात सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. सचिन तेंडुलकरसारख्या भारतरत्नालाही जाहिरातींतून पैसा कमावण्याचा मोह आवरता आलेला नाही. खरे तर या संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा आदर्श घ्यायला हवा. आठ वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळणार्या आणि आठ नवखे खेळाडू घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाने याच इंग्लिश भूमीवर तेथील महिलांना पराभूत करून इतिहास रचला. दुसरीकडे माध्यमांच्या पाठिंब्यामुळे कबड्डीसारख्या देशी खेळांनाही लोकप्रियता मिळू लागली आहे. भारतीय क्रिकेट संघ असाच पराभूत होत राहिला तर क्रीडा रसिक खेळाच्या आनंदासाठी इतर खेळांकडे वळतील, असे खेदाने का होईना नमूद करावेसे वाटते. अर्थात अन्य क्रीडा प्रकारांना नाहीतरी रसिकांच्या आश्रयाची गरज आहे. किमान यानिमित्ताने का होईना कबड्डी, खो-खो, कुस्ती अशा देशी खेळांना चांगले दिवस येतील.