पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 05:28 IST2025-05-08T05:27:50+5:302025-05-08T05:28:51+5:30
Operation Sindoor संघर्ष चिघळणे पाकिस्तानच्या हिताचे नाही; पण जिहादी मनोवृत्ती स्वस्थ बसणार नाही. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटना आता सुडाने पेटल्या असणार.

पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
-दिवाकर देशपांडे, आंतरराष्ट्रीय
घडामोडींचे अभ्यासक
भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गतपाकिस्तानवर कारवाई करून आश्चर्यचकित केले आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानला शिक्षा देणे आवश्यक होते. सिंधू पाणीवाटप करार स्थगित करून, तसेच अन्य निर्बंध लादून ही शिक्षा दिली गेली होती; पण या शिक्षेने भारतीय जनतेचे समाधान झालेले नव्हते. यापेक्षा कडक शिक्षेची मागणी होत होती, जनमानसाच्या इच्छेला मान देऊन भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई केली असली तरी ती नियोजनपूर्वक केली आहे. या कारवाईची व्याप्ती व परिणाम यांचा पूर्ण विचार ती करण्यापूर्वी झालेला आहे.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील पाच, तर पाकिस्तानातील चार दहशतवादी केंद्रांवर हल्ले करून ही ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. या हल्ल्यासाठी भारताने क्षेपणास्त्रे, ड्रोन, लॉइटर म्युनिशन्स व लढाऊ विमानांचा वापर केला असावा, असे हल्ल्याच्या स्वरूपावरून लक्षात येते. भारताने दावा केलेल्या सर्व नऊ ठिकाणांवरील हल्ल्याला पाकिस्तानकडून पुष्टी मिळाली आहे, याचा अर्थ हे हल्ले १०० टक्के यशस्वी झाले आहेत. या हल्ल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत या हल्ल्याचे व्हिडीओही दाखवण्यात आले. कोणतेही क्षेपणास्त्र अडवून पाडल्याचा किवा ड्रोन पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला नाही, याचा अर्थ पाकिस्तानची चिनी बनावटीची क्षेपणास्त्र रोधक यंत्रणा हे हल्ले रोखण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे, असे म्हणावे लागेल. पाकिस्तानने भारताची कधी तीन, तर कधी पाच विमाने पाडल्याचा दावा केला आहे; पण त्याचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही किवा भारतानेही या दाव्यांचा इन्कार केलेला नाही.
यातले सत्य यथावकाश बाहेर येईल; पण भारताने आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता पाकिस्तानातील ज्या चार दहशतवादी केंद्रांवर हल्ले केले आहेत, ते हवाई दलाच्या राफेलसारख्या विमानातून क्षेपणास्त्रे डागून केले असावेत असे सकृतदर्शिनी दिसते. हा हल्ला पाकिस्तानची हद्द न ओलांडता या विमानांनी ‘बियाँड द व्हिज्युअल रेंज’ क्षेपणास्त्रे वापरून केला असे दिसते. राफेल विमानांवर स्काल्प व हॅमर ही अशी क्षेपणास्त्रे बसविता येतात. ही क्षेपणास्त्रे अत्यंत अचूक आहेत, त्यामुळे हा हल्ला यशस्वी झाला आहे.
भारत असा हल्ला करणार आहे, असा अंदाज पाकिस्तानी माहितीमंत्र्यांनी आधीच वर्तविला होता, त्यामुळे पाकिस्तानने सर्व दहशतवादी केंद्रांवरील आपली साधनसामग्री व माणसे आधीच हलवली असणार यात काही शंका नव्हती. असे असताना या केंद्रांवर हल्ले करून काय फायदा झाला असणार असा प्रश्न पडतो; पण बहावलपूरच्या हल्ल्यात ‘कु’प्रसिद्ध दहशतवादी मसूद अझर याच्या कुटुंबातील दहा लोक व चार निकट सहकारी मारले गेल्याचे मसूद अझरनेच मान्य केले आहे. तसे असेल तर या हल्ल्याने मसूद अझरला मोठा धक्का दिला आहे, असे म्हणावे लागेल. शिवाय बिलाल या दहशतवादी केंद्राच्या हल्ल्यात याकूब मुघल हा दहशतवादी ठार झाला आहे, हे लहानसहान यश नव्हे. अन्य हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, हा प्रश्न अनुत्तरित असला तरी आता ही ठिकाणे पुन्हा सुरू करताना पाकिस्तानला अडचणी नक्कीच येतील.
पाकिस्तानने भारताच्या या हल्ल्याला अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाही; पण त्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तोफांचा भडीमार सुरू केला आहे व त्यात जीवितहानी झाल्याच्या बातम्या आहेत. भारतही या भडिमाराला, तसेच प्रत्युत्तर देत आहे. हा हल्ला फक्त दहशतवादी केंद्रांवर केला आहे व पाकची लष्करी ठाणी कटाक्षाने टाळली आहेत, हे सांगून भारताने संघर्ष पुढे वाढविण्याची इच्छा नाही, हे स्पष्ट केले आहे; पण त्याचबरोबर पाकिस्तानने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले तर भारत आणखी कारवाई करण्यास कचरणार नाही, हेही स्पष्ट केले आहे.
या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देऊन भारताने पहलगाम हल्ल्यात ज्या पुरुषांना वेचून ठार मारले होते, त्यांच्या विधवांना न्याय देण्याचा हेतू स्पष्ट केला आहे. आता प्रश्न असा आहे की, पाकिस्तान या कारवाईचा बदला घेण्यासाठी भारतावर प्रतिहल्ला करील काय व तो कसा करील हा. खरे तर हा संघर्ष चिघळणे पाकिस्तानच्या हिताचे नाही; पण पाकिस्तानची जिहादी मनोवृत्ती त्याला स्वस्थ बसू देणार नाही. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटना आता अधिक सुडाने पेटल्या असणार. त्यामुळे भारतावर प्रतिहल्ला होण्याची शक्यता दृष्टीआड करता येणार नाही. उलट भारताला आता डोळ्यांत तेल घालून सज्ज राहावे लागणार आहे.
diwakardeshpande@gmail.com