यावेळीही 'तहात गमावले'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:21 IST2025-05-14T08:18:55+5:302025-05-14T08:21:04+5:30
केवळ पाकिस्तान आणि दहशतवादीच नव्हे, तर मोदींनी जगालाही दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन गोष्टी ऐकवल्या.

यावेळीही 'तहात गमावले'?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेली युद्धसदृश स्थिती आता निवळली असली तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात दिलेल्या कठोर इशाऱ्यांनी हे स्पष्ट केले आहे, की भारताची पुन्हा कुरापत काढल्यास, पुन्हा तशी स्थिती निर्माण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. केवळ पाकिस्तान आणि दहशतवादीच नव्हे, तर मोदींनी जगालाही दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन गोष्टी ऐकवल्या. स्वतः दहशतवादाच्या विरोधात शक्तीचा वापर करायचा आणि भारताला मात्र वाटाघाटीतून मार्ग काढण्याचा सल्ला द्यायचा, हे अमेरिकेने यावेळीच नव्हे, तर यापूर्वीही अनेकदा केले आहे.
मोदींनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचा थेट नामोल्लेख टाळला असला तरी, दहशतवाद आणि चर्चा व व्यापार एकाचवेळी होऊ शकत नाही, हे ठणकावून सांगण्याला ती किनार नक्कीच होती. यापुढे आगळीक केल्यास यापेक्षाही जबर तडाखा देण्यास भारत मागेपुढे बघणार नाही, असा थेट इशाराही मोदींनी पाकिस्तानला दिला. ऊठसूट अण्वस्त्र वापराच्या धमक्यांना भारत यापुढे भीक घालणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. मोदींपूर्वी तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद मालिकेच्या माध्यमातून पाकिस्तानला पार उघडे पाडले.
भारताच्या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही, उलट आम्हीच भारताची लढाऊ विमाने पाडली, वायूतळ नष्ट केले, असे खोटेनाटे दावे पाकिस्तानने केले होते. सेनादल अधिकाऱ्यांनी पुराव्यांसह पाकिस्तानचे दात घशात घातले. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सेनादलांनीही पत्रकार परिषदेत त्यांच्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ कथित पुरावे सादर केले. त्यामध्ये समाविष्ट चित्रफिती विविध वॉर गेम्स'मधून घेतलेल्या असल्याचे स्पष्ट झाल्याने, पाकिस्तानची पुरती नाचक्की झाली. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी भारतीय आणि पाकिस्तानी पत्रकार परिषदांची तुलना करून, पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. उभय देशांनी बलप्रयोग थांबविण्याचे मान्य केल्यानंतर, प्रारंभीचे काही तास वगळता नंतर पाकिस्तानने सीमेवर कोणत्याही प्रकारे कळ काढली नसल्याने, तूर्त शांतता आहे; पण ही शांतता नेमकी कशी प्रस्थापित झाली, याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.
अमेरिकेकडे अत्यंत धोकादायक गुप्त माहिती पोहचली होती आणि त्यामुळे आपण मोदींना पाकिस्तानवरील हल्ले थांबवून चर्चा सुरू करण्याची विनंती केली, या अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या वक्तव्यामुळे, ती गुप्त माहिती नेमकी काय होती, यासंदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार आहे, अथवा भारताने पाकिस्तानच्या गुप्त अण्वस्त्र ठिकाणावर केलेल्या हल्ल्यामुळे आण्विक किरणोत्सर्ग सुरू झाला, ही ती माहिती असावी, अशी वंदता आहे. खरेखोटे भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेच्या सर्वोच्च नेतृत्वालाच ठाऊक, पण एक गोष्ट मात्र नक्की, की युद्धविरामाचा निर्णय अत्यंत तातडीने झाला. पाकिस्तानी सेनादले आणि भारतातील कडव्या राष्ट्रवाद्यांच्या काही तो पचनी पडलेला नाही.
पाकिस्तानी सेनादलांनी अवघ्या काही तासांतच युद्धविराम भंग करून त्यांची नाराजी दर्शवली, तर भारतातील कडव्या राष्ट्रवाद्यांनी समाजमाध्यमांचा सहारा घेतला. 'बांगलादेश युद्धात निर्विवाद विजय मिळवल्यानंतर, ९० हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी युद्धकैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात अवघ्या ५४ भारतीय युद्धकैद्यांची सुटका काव का करून घेता आली नाही' किंवा 'जिंकलेला १५ हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश पाकिस्तानला परत करताना, पाकव्याप्त काश्मीर का परत मिळवला नाही', असे प्रश्न त्यांना यापुढे त्यांच्या भाषेतील छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांना विचारता येणार नाहीत, ही त्यांची सल आहे. नाही पाकव्याप्त काश्मीर; पण किमान मसूद अजहर, हाफिज सईद आणि सलाउद्दीनसारख्या दहशतवादी नेत्यांना तरी युद्धविरामाच्या बदल्यात ताब्यात मागायचे होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट एअर स्ट्राइकनंतर काही विरोधी नेत्यांनी पुरावे मागितले होते. ते भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडले होते, तर विरोधकांना निवडणुकांत त्याचा फटका बसला होता. बहुधा त्यामुळेच यावेळी तमाम विरोधी पक्षांनी सरकारला पूर्ण साथ दिली; पण आता समर्थकांच्याच रोषास सरकारला बळी पडावे लागत आहे. युद्धात मिळवून तहात गमावण्याची परंपरा तुम्हीही कायम राखली का, हा समर्थकांकडूनच विचारला जाणारा प्रश्न, सरकारमधील धुरिणांसाठीही अडचणीचा आहे.